एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆत्वद्वन्दनॆषु सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ ।
सान्निद्ध्यमुद्यदरुणायुतसॊदरस्य
त्वद्विग्रहस्य परया सुधयाप्लुतस्य ॥ २ ॥
अत्युत्तम साधकाची मानसिक अवस्था कशी असते? याचे नेमके वर्णन करताना आचार्यश्री या श्लोकात म्हणतात,
एतावदेव जननि स्पृहणीयमास्तॆ- हे आई माझी एवढीच स्पृहा म्हणजे इच्छा आहे. कोणती ते सांगताना आचार्यश्री म्हणतात,
त्वद्वन्दनॆषु – तुझ्या वंदन समयी, अर्थात नमस्कार करीत असताना, सलिलस्थगितॆ च नॆत्रॆ- डोळ्यात येणाऱ्या अश्रूंनी माझे नेत्र स्थगित होतील, अर्थात यामुळे मला दिसणे बंद होईल.
ज्यावेळी असा साधक आईची चरण वंदना करण्यासाठी वाकेल त्यावेळी डोळ्यात आलेल्या आनंदाश्रूंनी त्याला ती चरणकमले देखील दिसणार नाहीत. त्यावेळी त्याची प्रार्थना आहे की,
उद्यत् – उगवणाऱ्या
अरुण- सूर्य सारथी, प्रभातीचा लालिमा.
अयुत- कोट्यावधी
सॊदरस्य- समान.
अर्थात प्रभाती पसरलेल्या अरुणोदय कालीन लालिम्याच्या कोट्यावधी पट अधिक तेजस्वी असलेल्या,
परया सुधयाप्लुतस्य- परम म्हणजे श्रेष्ठ सुधा म्हणजे अमृताने अर्थात आनंदाने प्लुत म्हणजे परिपूर्ण भरलेल्या.
त्वद्विग्रहस्य सान्निध्यम् – तुझ्या विग्रह म्हणजे स्वरूपाचे, सान्निध्य म्हणजे जवळीक, मला प्राप्त होवो.
अर्थात ज्या वेळी मी वंदन करेल आणि माझ्या डोळ्यातील अश्रूंनी तुझी चरणकमले मला दिसणार नाही, त्यावेळी हे आई जगदंबे ! मला दिसत नसले तरी, तुझ्या शिवाय मला कोणीही नाही हे, तुला दिसत असल्याने तू दूर जाऊ नकोस.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply