ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ
यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥
आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात,
ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति
ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः-
इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
कृत-त्रेता -द्वापार- कली ही चार युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अर्थात एक कल्प होतो. असे भगवान ब्रह्मदेवांचे आयुर्मान शंभर वर्ष असते.
ब्रह्मदेव इत्यादिक सर्व देवता, अशा कालगणनेच्या आरंभी निर्माण होतात आणि त्या काल मर्यादेनंतर त्यांचाही लय होतो.
अर्थात या सगळ्यांना उत्पत्ती आणि नाश आहे त्यामुळे आचार्य त्यांना ईशत्वनामकलुष अर्थात नावापुरतेच ईश्वर, शाश्वत नसलेले, असे म्हणत आहेत.
कति वा न सन्ति- अर्थात् कितीतरी आहेतच ना? असे म्हणत, अशा स्वरूपात स्वतःला ईश्वर म्हणणारे ब्रह्मदेवां सारखे कितीतरी देव आहेतच ना? असे आचार्य म्हणताहेत.
अर्थात अशा कितीतरी देवता या परमसत्य, चिरंतन नाहीत हे सांगून ते म्हणतात,
एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ- हे आई या जगामध्ये कायम सिद्धी संपन्न तो एकच आहे,
यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति- ज्याने एकदा तुझ्या चरणी वंदन केले आहे.
अर्थात बाकी देवता शाश्वत नसल्याने त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने देखील तशीच अशाश्वत आहेत. आई फक्त तुझ्या चरणाशी आला तोच शाश्वत सुख प्राप्त करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply