लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनंकारुण्यकन्दलित कान्तिभरं कटाक्षम् ।
कन्दर्पकॊटिसुभगास्त्वयि भक्तिभाजः
सम्मोहयन्ति तरुणीर्भुवनत्रयॆऽपि ॥ ४ ॥
खरी बुद्धिमत्ता ती जी इतरांना बुद्धी संपन्न करते. खरे वैभव ते जे इतरांना वैभवसंपन्न करते. त्याच प्रमाणे खरे सौंदर्य तेच की ज्याच्या संपर्काने इतरांना सौंदर्य प्राप्त होते. आई जगदंबेचे सौंदर्य तसेच आहे. तिच्या नेत्र कटाक्षांचे हे आगळे वैभव सांगताना, पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
लब्ध्वा सकृत् त्रिपुरसुन्दरि तावकीनं-
त्रिपुरसुन्दरि- हे त्रिभुवनसुंदरी !
तावकीनं- तुझी
लब्ध्वा- प्राप्त करून
सकृत्- एकदाच, सहजपणे.
कारुण्यकन्दलित- कारुण्याने परिपूर्ण भरलेली, कारुण्य ओसंडून वाहत असलेली,
कान्तिभरं -तेज:पुंज
कटाक्षम् – नेत्र कटाक्ष.
अशाप्रकारची आई जगदंबेची दृष्टी प्राप्त झाल्यावर होणारा अद्वितीय लाभ आचार्यश्री सांगत आहेत. त्या दृष्टीचे सौंदर्य सांगताना ते म्हणतात,
कन्दर्पकॊटिसुभगा- कंदर्प म्हणजे मदन. सौंदर्याचे आपल्यासमोर असलेले सगळ्यात मोठे परिमाण. त्याच्या कोट्यावधी पट सुंदर अशी ती, कन्दर्पकॊटिसुभगा.
त्वयि भक्तिभाज:- तुझ्या भक्तीला पात्र असणारी.
तरुणी- अन्य समस्त सुंदरी.
सम्मोहयन्ति- मोहित करतात.
भुवनत्रयॆऽपि- तीनही लोकांना.
अर्थात आई जगदंबेच्या वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असलेली कृपादृष्टी प्राप्त झाल्याने त्या सौंदर्याने क्षमता प्राप्त झालेल्या स्वर्गीच्या रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरा संपूर्ण त्रिभुवनाला मोहित करतात.
त्यांच्या नजरेतील ती मोहन शक्ती मूलतः आदिशक्तीची आहे.
तिच्या भक्तीने इतरांना ती शक्ती प्राप्त होते हे आईचे खरे वैभव आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply