ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ – महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः – अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply