हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानःक्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः ।
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य ॥ ६ ॥
आई भगवतीच्या साहचर्याचा अद्भुत वैभवशाली परिणाम सांगताना आचार्यश्री समुद्रमंथन प्रसंगाचा संदर्भ घेतात.
अमृताच्या प्राप्तीसाठी झालेल्या या समुद्रमंथनात त्या मेरू पर्वताच्या भोवती गुंडाळलेल्या वासुकी सर्पाने ती पीडा सहन न झाल्याने भयानक गरळ ओकले.
जोपर्यंत हे कोणी घेणार नाही तोपर्यंत दुसरे काहीही निर्माण होणार नाही अशी आकाशवाणी झाली. त्यामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर भगवान शंकरांनी ते विषप्राशन केले. वास्तविक त्याने त्यांचा विनाश झाला असता. पण !
या पण चे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
हन्तुः पुरामधिगलं परिपीयमानः
क्रूरः कथं न भविता गरलस्य वॆगः- पूर्वी ज्यावेळी भगवान शंकरांनी समुद्रमंथनात निर्माण झालेले हालाहल नावाचे विषप्राशन केले त्यावेळी त्या भयानक विषाचा आवेग त्यांना का मारू शकला नाही?
आरंभीच्या दोन चरणात असा प्रश्न निर्माण करून पुढील दोन चरणात आचार्यश्री त्याचे उत्तर देतात. ते म्हणतात,
नाश्वासनाय यदि मातरिदं तवार्धं
देहस्य शश्वदमृताप्लुतशीतलस्य – हे आई जगदंबे ! कायम अमृताने भरलेल्या तुझ्या शीतल शरीराच्या अर्ध्या अंगाचा आश्वासक संगच नसता .
भगवान शंकरांचे स्वरुप अर्धनारीनटेश्वर आहे. श्रीशंकर आणि आदिशक्ती अभिन्न आहेत.
भगवान शंकर त्या विषाने संपले नाही कारण त्यांच्यासोबत अमृतमय असलेला आई जगदंबेचा अर्धा देह आहे.
त्या विश्वविनाशक विषाचा परिणाम आईच्या अमृतमय स्पर्शांनी नष्ट झाला.
हे आचार्य श्रींचे कथन कमालीचे मनमोहक आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply