सर्वज्ञतां सदसि वाक्पटुतां प्रसूतॆ
दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः ।
किं च स्फुरन्मकुटमुज्ज्वलमातपत्रं
द्वॆ चामरॆ च महतीं वसुधां ददाति ॥ ७ ॥
आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की कोणकोणते अतिदिव्य लाभ होतात, हे सांगतांना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः- हे आई जगदंबे तुझ्या अंघ्री म्हणजे चरण, सरसीरूहयो: म्हणजे कमलावर जो कोणी वंदन करतो, त्याला या जगात,
सर्वज्ञतां – सर्व प्रकारच्या विद्या आणि कलांमध्ये अक्षुण्ण गती,
सदसि वाक्पटुतां- सभेमध्ये वाक कौशल्य,
प्रसूतॆ- प्राप्त होते.
यातील सभेतील वाक् कौशल्य हा शब्द महत्त्वाचा आहे. बोलता तर सगळ्यांनाच येते. पण सभेत याचा अर्थ विद्वानांच्यासमोर, शास्त्रशुद्ध, मुद्देसूदरीत्या, अकाट्य तर्कपूर्ण रीतीने बोलता येणे. अशावेळी अनेकांची फक्त त -त ,प -प होते. आई च्या कृपेने माणसाला अशा ठिकाणी वक्तृत्व संपन्नता येते.
किं च- आईच्या कृपेचे आणखीन काय लाभ सांगू? शेवटी सर्व एकत्र करून सांगण्याची माऊलींची ‘किंबहुना’ शब्द रचनेतील भूमिका या ‘किं च’ मध्ये आली आहे.
स्फुरन्मकुट- देदीप्यमान मुकुट अर्थात साम्राज्य पद.
उज्ज्वलमातपत्रं- चमचमते छत्र. त्यात उज्ज्वल शब्दात पांढरा रंग अपेक्षित आहे. एकछत्री सम्राटाचे छत्र पांढऱ्या रंगाचे असते.तो भाव.
द्वॆ चामरॆ च – दोन्ही बाजूला चवऱ्या. राजाच्या दोन्हीकडे उभ्या राहून त्याला वारा घालणाऱ्या सेविका, हा सामान्य अर्थ. हा कोणत्याही लहानसहान राजाला लागू पडतो.
येथे जणू सूर्य आणि चंद्र याच दोन चवऱ्या आहेत महान अर्थ अपेक्षित आहे.
महतीं वसुधां – विशाल पृथ्वी. अर्थात समुद्र वलयांकित साम्राज्य.
ददाति- आईची कृपा हे सर्व काही प्रदान करते.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply