कल्पद्रुमैरभिमतप्रतिपादनॆषु
कारुण्यवारिधिभिरम्ब भवत्कटाक्षैः ।
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मामनाथम्
त्वय्यॆव भक्तिभरितं त्वयि बद्धतृष्णम् ॥ ८ ॥
आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाचे वैभव सांगतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत की दृष्टीनेच या जगात सर्व काही प्राप्त होऊ शकते. आई सर्वकाही देते पण त्यासाठी आपण तिचे भक्त असणे अपेक्षित आहे.
अभिमत- साधकाला, भक्ताला, उपासकाला, जे जे हवे असते ते. मनोवांच्छित
प्रतिपादनॆषु- प्रदान करण्याच्या बाबतीत,
कल्पद्रुम- कल्पवृक्ष. अशी आई जगदंबेची दृष्टी आहे. अर्थात एकदा ही दृष्टी प्राप्त झाली की भक्ताच्या मनात जे येते ते सर्व प्राप्त होते.
जसा एकच कल्पवृक्ष सर्व काही देतो, तशी आईची एकच कृपा सर्व काही प्रदान करते.
अम्ब भवत्कटाक्ष- हे आई तुझे नेत्र कटाक्ष,
कारुण्यवारिधी- वारी म्हणजे पाणी त्याचा धी म्हणजे साठा.अर्थात समुद्र. आईची दृष्टी म्हणजे कारुण्याचा जणूकाही समुद्र. सागर जसा अथांग असतो , अपार असतो, जसे त्यात केवळ पाणीच पाणी असते, तशी आईची करूणा अथांग, अपार आहे. त्या दृष्टीत कारुण्याशिवाय अन्य काहीच नाही.
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मामनाथम्- हे त्रिपुरसुंदरी, अनाथ असलेल्या माझ्याकडे पहा. तू माझ्याकडे पाहिले नाही तर तीच अनाथता.
हे आई माझ्याकडे पहा कारण,
त्वय्यॆव भक्तिभरितं- मी केवळ तुझ्याच भक्तीने भरलेला आहे. मला अन्य काही समजतच नाही.
त्वयि बद्धतृष्णम्- माझ्या सगळ्या इच्छा तुझा ठिकाणी बांधलेल्या आहेत. मला अन्य कोणाचाही आश्रय नाही. मग मी मागू तरी कोणाला?
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply