हन्तॆतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ
भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु ।
त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि
त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव ॥ ९ ॥
आई जगदंबेच्या एकमेवाद्वितीय सर्वश्रेष्ठत्वाला अधोरेखित करताना आचार्य श्री म्हणतात,
हन्त- अरेरे! या अर्थाचा हा उद्गार. कितीही समजावून सांगितले तरी न ऐकणाऱ्या सामान्य दीन जनांकडे पाहून आलेला हा कनवाळू उद्गार आहे.
काय समजावून सांगत होते आचार्य? काय ऐकत नव्हते सामान्य जन? तर,
इतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ
भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु – हे आई जगदंबे, हे सर्व तुला सोडून इतर सामान्य दैवतांच्या ठाई मन एकवटून उपासना करतात.
यातील पामर देवता हा शब्द मोठा चिंतनीय आहे. अन्य अनेक देवता आपल्यापेक्षा जरी श्रेष्ठ असल्या तरी त्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा असतात. श्रीअग्नीदेवांना फक्त जाळण्याची शक्ती आहे ते पाणी देऊ शकत नाहीत तर भगवान वरूणांना पाणी देण्याची शक्ती आहे ते काडिपेटी देणार नाहीत.
या अर्थाने या देवतांना पामर असे म्हटले आहे. जर अशा स्वरूपात या देवताच मर्यादित असतील तर त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने, कृपा अमर्याद कशा असतील? याच अर्थाने आचार्यश्री वरील कथन करीत आहेत. ते या सर्व देवतांना पामर देवता म्हणताहेत. सामान्य जन अशा दैवतांच्या मागे लागतात.
आई मला मात्र वास्तविकता कळली आहे. माझी परिस्थिती विचारशील तर,
त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि- हे आई मी मनाने फक्त तुझेच स्मरण करतो.
त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव- मी केवळ तुलाच शरण आलो आहे तूच माझी आई आहेस.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply