
‘मन कि बात’चा या वर्षीचा शेवटचा लेख आज नाईलाजाने ‘गन के साथ’ लिहून या सदराचा शेवट करतोय. हे सदर नविन वर्षात नविन नावाने येईल..
“सौ में से नब्बे बेईमान,
मेरा भारत सच मे महान..!”
आजच भल्या पहाटे मुंबईच्या कमला मिल्स कम्पाऊन्डमध्ये एका पबला आग लागून १४ बळी गेल्याची बातमी झळकली.. टीव्हीवर राजकीय नेते मुलाखती देत अधिकाऱ्यांवर दोष ढकलत आहेत, हे रीतीला धरूनच आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अश्या दु:खद प्रसंगी जनतेप्रती अशी संवेदना प्रकट केली, हे ही परंपरेला धरून आहे.
कमला मिल्स कम्पाउन्ड हा काय प्रकार आहे, ते कुणाला माहित आहे की नाही, ते माहित नाही आणि असल्यास कितपत माहित आहे, ते ही मला माहित नाही. माझी इथे अनेकदा कुतूहलापोटी फेरी होत असते आणि तिथे वावरणारी ती तुपाळ चेहेर्याची माणसं, गोबऱ्या गालाची आणि गोऱ्या तुकचुकीत कांतीची तरुणाई, त्यांचे कपडे, त्यांची देहबोली, त्यांच्या त्या लांबलचक आलिशान गाड्या, तिथली हॉटेलं हे सारं मला माझ्या जगातलं वाटत नाही हे खरं. ही एरवी आपल्यातच असणारी, परंतु आपली न वाटणारी एक वेगळीच ‘इंडीयन’ संस्कृती आहे. माझ्यासारख्या देशी माणसाला इथलं वातावरण नेहेमीच विचित्र वाटल्याने खटकत आलं आहे.
जेंव्हा मुंबईच्या सर्वसामान्य जनतेची रात्र होते व थकून भागून झोपायची वेळ होते, तेंव्हा कमला मिल्स आणि त्याच्या शेजारच्या फिनिक्स मिल्स परिसराला जाग येते. हा परिसर मुंबई ज्यांनी ‘मुंबई’ म्हणून घडवली, त्या कापडगिरण्यांचं स्मशान आहे, असं म्हटलं तर चुकू नये. आणि स्मशानात रात्री भुतांचा दिवस सुरू होतो, तसं काहीसं मला इथल्या ह्या गिरण्यांच्या स्मशानात उगवलेल्या कल्चरविषयी वाटतं..इकडची ‘नाईट लाईफ’ एन्जाॅय करण्यासाठी येणारं क्राऊड (हो. धनाढ्य लोकांच्या गर्दीला ‘क्राऊड’ असं प्राऊडने म्हणतात, सामान्यांची होते ती ‘गर्दी’ किंवा ‘रश’!) मला स्मशानातल्या भुतावळीपेक्षा वेगळं वाटत नाही. असतो माझ्यासारख्या एखाद्याचा माईंडसेट मागासलेला, त्याला कोण काय करणार..!
या परिसरात रात्रीच्या अंधारात येथे जे ‘क्राऊड’ येतं, विशेषत: दक्षिण मुंबईच्या पारंपारिक धनाढ्य आणि मध्यमुंबईतल्या नव्याने धनाढ्य झालेलं. रात्रीच्या अंधारात इथं अवतरते रंगरागीली, नशीली दुनिया.. इथे या क्राऊडचे सर्वप्रकारचे चाळे आणि चोचले पुरवायला सर्व सुखं हात जोडून उभी असतात..ही दुनिया आहे पैसेवाल्यांची. त्यातही बहुतकरून काळे पैसेवाल्यांची. यात पिढ्यानपिढ्या धनाढ्य असलेल्या उद्योगपतींची मुलं आणि आई-बापही असतात, त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात लाचखोरीवर गबर झालेल्या अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांचीही मुलं असतात. आणि त्यांचे चोचले पुरवण्यासाठी जी हॉटेल, पब किंवा क्लब आहेत, त्यांचे मालकही पुन्हा तेच लाचेच्या घाणीवर श्रीमंत आलेले राजकारणी, अधिकारी आहेत. प्रत्येक काळ्या धंद्यात त्यांची अशी छुपी मालकी असणे हे, आता मुंबईतच कशाला, आपल्या देशातही नवीन नाही. उगाच नाही जो पक्ष सत्तेवर असतो, त्यात प्रवेश घ्यायला रांग लागत. आपल्या खुर्चीचा, अधिकाराचा वापर सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या धाकात राहायला राबवायचा आणि आपण मात्र त्याच अधिकाराचा आणि खुर्चीचा वापर आपल्याच छुप्या मालकीच्या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी करायचा, हे आता सर्वविदित आहे. किंबहूना असं केलं नाही तर आयुष्य फुकट गेलं, असं समजण्याची वृत्ती बळावत चालली आहे..
आज ज्या पबला आग लागून १४ बळी गेले तो पबही असाच एका निवृत्त आय पी एस अधिकाऱ्याच्या मुलाच्या मालकीचा असल्याच्या बातम्या आहेत, तर काही बातम्या तो पब महानगरपालिकेच्याच एका बड्या अधिकाऱ्याच्या नात्यातल्या कोणाचा तरी आहे अशाही आहेत. आय पी एस अधिकारी असो किंवा महानगर पालिकेचा अधिकारी, यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की त्या पबला सरकारातील कोणा बड्याचा वरदहस्त होता आणि आहे. त्याशिवाय राजरोस कायदा धाब्यावर बसवण्याची कोणाची हिंम्मतच होणार नाही. टिचभर घरात केवळ कुस बदलायला सोयीचं जावं म्हणून ऑल्टरेशन केलं किंवा पानाची टपरी ११ नंतर चालू ठेवली, तर बीएमसी आणि पोलीस दरडवत, दंडूका उगारत दंड करायची धमकी देत येतात, अशा या भारतमातेच्या कर्तव्यदक्ष अंमलदारांना या पबमधे कायदा फाट्यावर मारून रात्रीच्या अंधारात जे काही चालायचं, ते का दिसलं नाही..? की ते त्यांना दिसूच नये याची चखोट काळजी घेण्यात आली होती.? की ते त्यांना दिसलंही असेल, परंतु त्यांनी त्यांच्याकडे पाहाताच, त्यांच्या सत्ता-अधिकार तेजाने या अंम्मलदारांचे डोळे दिपून त्यांना काहीच दिसेनासं झालं असेल. हे असं का याचं उत्तर आपापल्या वकुबाप्रमाणे ठरवावं..’
हा पब कशाला, मुंबईतल्या दहा मधल्या किमान आठ कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या धंद्यांची मालकी किंवा भागीदारी, थेट वा आडून, सरकारी उच्च अधिकारी किंवा राजकारण्यांकडे आहे हे आता नवीन नाही. यात बिल्डरचा व्यवसाय पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर नव्याने उगवलेली भली मोठी हाॅटेलं, दारूचे बार्स, हुक्का पार्लर्स यांचा नंबर लागतो. हातातल्या अधिकाराचा उपयोग किंवा दुरुपयोग अश्या आपल्या अनौरस धंद्यांना संरक्षण देण्याकडे करायचा आणि प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाला स्टेजवरून सामान्यांना देशप्रेमाची लांबी चौडी भाषणं देणं म्हणजे प्रतिष्ठेची नविन व्याख्या झाली आहे.
या पबमधे काय किंवा अशा हाय प्रोफाईल ठिकाणी कुठेही अशी दुर्घटना घडली, की मालक असलेली सरकारी अधिकारी-राजकारण्यांची औरस-अनौरस पिलावळ सहीसलामत सुटते आणि कोणीतरी किरकोळ अधिकारी किंवा त्या आस्थापनातला कर्मचारी फाशी दिला जातो. आपणही नंतर विसरून जातो, ते पुन्हा अशी दुर्घटना घडल्यावर आपल्याला जाग येते.. कमला मिल कंपाऊन्ड प्रकरणातही हेच होणार, या विषयी खात्री बाळगा. एव्हाना अपराध्यांची ‘सेटींग’ झालीही असेल. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या बड्यांचं, त्यांच्या खिशातले पैसे सरकारातल्या दुसऱ्या एखाद्याच्या खिशात जाण्याव्यतिरिक्त शष्पही वाकडं होणार नाही याची २०० टक्के गारंटी..!
हे सर्व लाचखोरीचे परिणाम आहेत व पुढे पुढे यापेक्षाही गंभीर होत जाणारे आहेत..’न खाऊंगा न खाने दुंगा’ ही घोषणा आकर्षक आहे आणि भ्रष्टाचाराने गांजलेल्या सामान्य माणसाला आशा दाखवणारी आहे, परंतु ती प्रत्यक्षात येणं तेवढंच अवघड आहे. सत्य परिस्थिती खुप वेगळी आहे. लोककल्याणाच्या नांवाखाली सुरु केलेल्या सरकारी आस्थापनांत आजही सर्रास पैसे खाल्ले जात आहेत आणि यात वरपासून खालपर्यंत सर्वांचा आपापल्या पदानुसार वाटा आहे आणि तो त्या त्या पदावरल्या व्यक्तींपर्यंत व्यवस्थित पोहोचवला जातो आणि म्हणून तर राधेशाम मोपलवारांना क्लिन चिट देऊन परत कामावर घेतलं जातं.
या देशात कोणीही क्लिन असेल यावर माझा तरी विश्वास पार उडाला आहे. काहीजण मला निराशावादी म्हणतील, म्हणू देत.! समाजात सकारात्मक संदेश जावा यासाठी सरकारने, न्यायालयाने नव्हे, एखाद्या अपराधी उच्चपदस्थाला शिक्षा केल्याचं एकतरी उदाहरण दिसेपर्यंत मी असाच राहाणार..काहीजण भुजबळांकडे बोट दाखवतील, पण भुजबळांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्याहीपेक्षा ते भ्रष्टाचारापेक्षा राजकारणाचे बळी आहेत. तसं नसतं तर, त्यांच्याबरोबरची इतर नांवं कशी काय बाहेर राहीली?
या लेखाच्या सुरुवातीला मी जे बडे अधिकारी आणि राजकीय धेंडावर जे भाष्य केलंय, ते त्यामुळेच. काही दुर्घटना घडली, की ही पात्र मिडिया नांवाच्या हिजडखान्यात (हिजडा शब्दाबद्दल किन्नरांची माफी मागतो. ते नाईलाजाने त्यांच्या नशिबी आलेलं काम करत असतात.) जी काही ज्ञानाचे आणि शिस्तीचे वायफळ घडे सर्वसामान्यांना देत असतात, ते प्रथा म्हणून. या प्रथेशीही ‘त्या दोषींकडून स्वत:ची किंमत वसूल करणे’ हाच उद्देश असतो. जनतेची व देशाची फिकीर तुम्हा-आम्हाला. या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांना तर आपल्या भावी पिढ्यांची फिकीर पडलीय.. मग तुमच्या आमच्या कितीही पिढ्या बरबाद झाल्या किंवा ढेकणासारख्या चिरडून मेल्या किंवा वांग्यासारख्या खरपूस भाजून मेल्या तरी चालतील..!!
“सौ में से नब्बे बेईमान,
मेरा भारत सच मे महान..!”
एका अनपढ ट्रक ड्रायव्हरच्या ट्रकवरच्या या वाक्याला आपल्या देशाचं ब्रिदवाक्य म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही..!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply