नवीन लेखन...

गीतकार कमर जलालाबादी

ओमप्रकाश भंडारी हे कमर जलालाबादी यांचे मूळ नाव. अमृतसरनजीकचे जलालाबाद हे त्यांचे मूळ गाव.

कमर यांना लहानपणापासूनच कवितेची आवड. लहानपणी त्यांच्या या छंदाला वेडेपणा म्हणून हिणवण्यात आले. मात्र अमर नावाच्या एका शायराने कमर यांच्या शब्दांतील जादू हेरली. त्यांनी कमरच्या काव्यलेखनाला प्रोत्साहन दिले. कमर शिक्षणासाठी लाहोरला गेले. शिक्षण घेत असतानाच पत्रकारितेकडे ओढा वाढला. लाहोरच्या अनेक नियतकालिकांतून त्यांची मुशाफिरी चाले. मात्र चित्रपटांचे वेड आणि आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच मनासारखे लिखाण करता यावे, यासाठी त्यांनी स्वत:चे ‘स्टार’ नावाचे चित्रपटविषयक साप्ताहिक सुरू केले. मात्र चित्रपटांबद्दल लिहिण्यापेक्षा चित्रपटांसाठी लिहावे, ही ईर्षा वरचेवर उचंबळून येत होती. चित्रपटाच्या या वेडानेच पुढे त्यांना पुण्यात आणले. दलसुख पांचोली तेव्हा ‘जमीनदार’ नावाच्या चित्रपटात व्यग्र होते. त्यांनी कमरविषयी ऐकले होते. ‘जमीनदार’च्या गीतलेखनाची जबाबदारी त्यांनी कमरवर टाकली. कमरने मग ‘दुनिया मे गरीबों को आराम नहीं मिलता…’ अशा आशयघन गाण्यातून सर्वांना बेचैन केले. या संधीने कमरला चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. कमर या प्रतिभावंताला मग विष्णुपंत दामले-फत्तेलाल-व्ही. शांताराम यांच्या ‘प्रभात फिल्म्स’मध्ये संधी मिळाली.

‘चाँद’ या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी केले. ‘चाँद’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हुस्नलाल-भगतराम या पहिल्या संगीतकार जोडीने दिलेले संगीत. यातील ‘दो दिलों को ये दुनिया मिलने नहीं देती’, ‘मेरे दिलरुबा आ जा’ आणि ‘ए दिल मुझे रोने दो’ ही कमर यांची गाणी चांगलीच गाजली. नंतर ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांसाठी कमर यांनी संवाद, गीतलेखन केले. ‘प्रभात’च्या अस्तानंतर कमर यांचे सूर जुळले ते फेमस स्टुडिओशी. ओघवती शैली, सरळसाधे परंतु काळजाला भिडणारे शब्द, भाव-भावनांना उपमांनी सजवलेला साज व त्यातून सहज लयीत गुंफलेल्या शाब्दिक फुलो-यातून रसिकांच्या हृदयाला घातलेला हात हे कमर जलालाबादी या शायराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य.

इक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा, बहते हुए आँसू रुक न सके, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा..(प्यार की जीत)मधली प्रेमभंगाची भावना, त्याच चित्रपटातले ओ दूर के जानेवाले वादा न भूल जाना, रोते हुई अंधेरी तुम चांद बन के आना…मधली प्रेमाची भावना हीच तर आहे कमर यांच्या लेखणीची जादू. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी कमर यांची वेव्हलेंथ ख-या अर्थाने जुळली होती. पिया पिया न लागे मोरा जिया(फागुन), मैं सोया अंखियाँ मीचे, तेरी जुल्फों के नीचे, इक परदेसी मेरा दिल ले गया (फागुन), छून-छून घुंगरू बोले (पतंगा), छोटा सा बलमा, मैं बंगाली छोकरा, मेरा नाम चिन-चिन चू (हावडा ब्रीज), आइए मेहेरबां बैठिए जानेजां (हावडा ब्रीज), रुक रुक कहा चली दीवानी अशा अनेक माइलस्टोन गीतरचना कमर-ओपी या कॉम्बिनेशनचे प्रत्यंतर देतात. ओपींनंतर कमरचे सूर जुळले ते संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याशी. डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा, छलिया मेरा नाम, मेरे टूटे हुअेय दिल से, तेरी राहों में खडे हैं (छलिया), मंै तो एक ख्वाब हूँ, इस ख्वाब से तू प्यार न कर (हिमालय की गोद में), तुम ही मेरे मीत हो (प्यासे पंछी), दीवानों से ये मत पूछो (उपकार) अशी अनेक अवीट गोडीची गाणी या कॉम्बिनेशनने दिली. ‘शहीद भगतसिंग’मध्ये सरफरोशी की तमन्ना… सारखे देशभक्तिपर गीत लिहिणा-या कमर यांनी हमने तेरी जफा का वफा नाम रख दिया (चले हैं ससुराल) असा टोकाचा भावही अनेक गाण्यांतून व्यक्त केला.

पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या गीतरूपी चांदण्यातून कमर जलालाबादी यांच्या गाण्यांनी नेहमीच रसिकांच्या मनाला शीतलता दिली. मात्र प्रेमात धोका देणा-यांना खडसावण्यात त्यांच्या लेखणीने कधीच कसूर केली नाही. दोनों ने किया था प्यार मगर, मुझे याद रहा तू भूल गयी (महुआ) अशा कमर म्हणजे चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्रमा. चंद्राची शीतलता, चंद्राला ग्रहण लागल्यानंतरचा विरक्त भाव, टिपूर चांदण्यातील प्रेमळ झुळूक आणि अर्थपूर्ण गीतांतून चंद्रप्रकाशाचा हवाहवासा शिडकावा कमर जलालाबादी यांच्या प्रत्येक गीतातून अनुभवाला येतो. ‘कमर’ गीतांच्या चांदण्याने रसिकांच्या मनाचे अंगण नेहमीच चमकत राहील. ‘दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है’ हे गाणे अजून ही एक तारीखेला रेडीओ सिलोन लागते. ते गाणे कमर जलालाबादी यांचेच. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेल्या आणि किशोरकुमारच्या आवाजाने नटलेल्या या गाण्याचे रसिकांच्या मनात वेगळे स्थान आहे.

रसिकांच्या मनातील भाव-भावनांना सोप्या, आशयसंपन्न शब्दांत गुंफणारा गीतकार हीच कमर जलालाबादी यांची खरीखुरी ओळख होती. कमर जलालाबादी यांचे निधन ९ जानेवारी २००३ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ अजय कुलकर्णी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..