कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद,संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा पुरेपुर उपयोग पुढे कमलाबाईंना मुकपट तसेच संगीत नाटकांसाठी झाला. भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्यां कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती. पण, त्याकाळी एक उणीव मात्र या नाटकांमध्ये कायमची जाणवायची ती म्हणजे स्त्री पात्रांची. अर्थात स्त्री भुमिकाही त्याकाळी पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते राजा हरिश्चंद्र पासून. त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा मोहिनी भस्मासुर या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्र ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मतांचे दादासाहेब फाळके होते. त्याचवेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं.
फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रुपानं, रुपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांची सुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान ही चढतीच राहिली. पुढे अनेक मुकपटांमधून त्यांनी परिपूर्ण भूमिका साकारुन स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रुपानं ठेवलं असं ही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशावेळी संगीत नाटकांतील महत्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे चित्ताकर्षकची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरु केली. पुंडलिक तसेच मृच्छकटिक ही नाटकं चित्ताकर्षक तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भुमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. त्यावेळेला कमलाबाई यांच्या खाजगी जीवनात मोठे परिवर्तन झाले. चित्ताकर्षकचे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध होऊन कमलाबाई गोखले झाल्या.
पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिर्हा्डही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानित आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते. पण कमलाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्र स्त्रियाच सादर करत. या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते उ:शापच्या माध्यमातनं जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखुन या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली. पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्र मधील सुभद्रा व अर्जुन, मानापमान मधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करुन दिला.
तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि चाळीस वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. रिना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते व चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रुपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकिर्द घडवतेय मा.मा.कमलाबाई गोखले यांचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सागर मालाडकर
Leave a Reply