नवीन लेखन...

कांगारूंचे गर्वहरण

सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे. क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवणारी ही लढत सतराव्या षटकापर्यंत समसमान होती परंतु भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने ऐन मोक्याच्या वेळी ट्रॅव्हीस हेड चा हेडेक दुर करत पारडे भारताच्या बाजुने झुकवले आणि तमाम क्रिकेट रसिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या विजयासोबतच भारताने उपांत्य फेरीत धडक दिली असून तिथे इंग्लंडशी त्यांची गाठ पडणार आहे.

झाले काय तर कांगारू संघ म्हणजे जन्मजात चॅम्पिअन, किलर इंस्टिंक्ट ठास्सून भरलेला, दिमतीला त्यांचा प्रोफेशनल अॅप्रोच. यामुळेच पॅट कमीन्सने टी ट्वेंटीच्या उपांत्य फेरीत त्यांचा संघ हमखास पोहोचणार, इतर तीन संघ तुमच्यानुसार निवडा असे उद्दाम उद्गार काढले होते. त्यातही छोटे मियां अफगाणने त्यांना लोळवले तरी अॅासींची गुर्मी कायम होती आणि त्यांचा कर्णधार मिचेल मार्शने उपांत्य फेरीसाठी केवळ एक विजय हवा, त्यासाठी भारतीय संघ उपयुक्त आहे अशा वल्गना केल्या होत्या. अर्थातच अॅासींनी टीम इंडियाला डिवचून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. त्यामुळेच काही झाले तरी चालेल पण कांगारूंना धडा शिकवायचा विडा भारतीय संघाने उचलला होता.

मात्र परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. विराटला सलामीला धाडून विराट अडवा, विराट जिरवा ही योजना लागू करण्यात आली होती. विराट तिसर्या क्रमांकचा सर्वोत्तम खेळाडू असुनही त्याला सलामीला का कुजवले जाते हे समजत नाही. तसेही सध्याचा सलामीचा विराट खोया खोया चांद वाटतो. प्रत्येक सामन्यात विराटचाच नैवेद्य द्यायचा ठराव बहुतेक पास झाला असावा. खरेतर विराटची फलंदाजी हळुवारपणे सुरू होऊन तिला नंतर अग्निपंख फुटतात. मात्र सध्या त्याच्या फलंदाजीची कोवळी पानगळ पाहून मन व्यथीत होते. दुसर्या षटकातच विराटचा बळी जाताच कर्णधार रोहीतचा हिटमॅन जागा झाला. अभी नहीं तो कभी नहीं आणि अब की बार दो सौ पार चा निश्चय करत त्याने अॅासींवर प्रतिहला सुरू केला.

वास्तविकतः डावखुरे गोलंदाज म्हटले की रोहीत हमखास बळी पडतो पण यावेळी त्याने डावखुर्या मिचेल स्टार्कचा फडशा पाडला. डावखुर्यांची दहशत तुडवत त्याने डर के आगे जीत है हे दाखवून दिले. स्टार्क अॅन्ड कंपनीच्या चिंधड्या उडवत त्याने दणकेबाज फलंदाजी करत ४१ चेंडूत ९२ धावा कुटल्या. तळहातावर शीर घेऊन लढणे काय असते, जिंकू किंवा मरू च्या भावना काय असतात हे त्याची वादळी खेळी पाहून सहज लक्षात येते. भलेही रोहीत सोबत पंत मैदानात ठाण मांडून होता मात्र पंत म्हणजे मानवी बॅाम्ब, तो कधी शत्रूच्या गोटात फुटतो तर कधी स्वपक्षात. त्यातही आजकाल निट परिक्षेत विद्यार्थी ज्या सहजतेने ७२० पैकी ७२० गुण मिळवतात, त्याच सहजतेने तो आपली विकेट फेकतो.

रोहीतच्या मजबूत पायव्यावर कळस चढवणे अत्यंत गरजेचे होते आणि त्यासाठी शिवम दुबे, पांड्या, जडेजा आणि अक्षर पटेल या अष्टपैलूंची रसद दिमतीला होती. या सामन्यात सूर्या, दुबे आणि पांड्याने छोट्या परंतु उपयुक्त खेळी करत रोहीतच्या जांबाज खेळीला कळस चढवला. खरेतर रोहीतच्या दणक्याने अॅासीचे क्षेत्ररक्षण थोडेफार ढेपाळले होते. पंत आणि पांड्याला कांगारूंनी जीवदान दिले होते. एकंदरीत काय तर रोहीतने लिडींग फ्रॅाम दी फ्रंटचा आदर्श घडवत आपल्या संघाला फ्रंटफूटवर नेले. यांत रोहीत पंत ८७ धावा, रोहीत सूर्या ३४ धावा, सूर्या दुबे ३२ धावा आणि दुबे पांड्या ३५ धावा ह्या भागिदार्या महत्वपूर्ण ठरल्या.

कांगारूंना उपांत्य फेरीच्या तिकिटासाठी २०६ धावा हव्या होत्या तर टीम इंडीयाला कांगारूंना वेसन घालायसाठी गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि कर्णधार या तिघांचा म्हणजेच सबका साथ सबका विकासची गरज होती. बुमराह आणि कुलदीपवर आपल्या आशा होत्या तर अॅासी चे प्राण ट्रॅव्हीस हेड या पोपटात दडले होते. प्रारंभीच अर्शदीपने वॅार्नरला चालता करून झकास सुरूवात केली होती. पण पंत आणि अर्शदीपने मिचेल मार्शला जीवदान देत रोहीतच्या चिंता वाढवल्या होत्या. काही केल्या हेड, मार्श भारतीय गोलंदाजांना जुमानत नव्हते, वरून हे दोघेही दहाची सरासरी राखत पाठलाग करत होते. भारतीय संघासोबतच पाठीराख्यांची घालमेल वाढत होती. अखेर कुलदीपने भारतीयांच्या आशा दिपवत टीम इंडियाला सामन्यात वापस आणले. अक्षर पटेलने मार्शचा सिमारेषेलगत अफलातून झेल घेत भारतीय विजयाचे लॅाग इन केले.

तरीपण धोका टळला नव्हता, खतरनाक मॅक्सवेल आणि हेड दातओठ खात परत आपल्या गोलंदाजांवर हल्ले चढवू लागले होते. इथेच मॅक्सवेलचा उताविळपणा कांगारूंच्या मुळावर आला. कुलदीपला भिरकावण्याच्या नादात त्याची दांडी गुल झाली. त्याची विकेट टीम इंडियासाठी विजयाचा पासवर्ड होती. पन्नास टक्के काम फत्ते झाले होते मात्र हेड चा हेडेक काही केल्या कमी होत नव्हता. १९ नोव्हेंबर २०२३ ते २४ जून २०२४ ये दुख काहे खतम नहीं होता बे अशी परिस्थिती होती. हेड गले की हड्डी बनला होता. त्यातही तो चौकार षटकार सहज ठोकत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळत होता. जणुकाही त्याला अमरत्वाचे वरदान मिळाल्या सारखा तो उन्मुक्त फलंदाजी करत होता. त्याची खेळी टीम इंडियासाठी त्राही माम त्राही माम करणारी होती. अख्खा इंडिया हेड च्या विकेटसाठी देव पाण्यात घालून बसला होता.

शेवटी वद जाऊ कुणाला शरण तर बुमराहला, बुमराहचा चेंज अॅाफ पेस बॅाल कांगारूंचे अकाऊंट खाली करणारा ओटीपी होता. हेड चा अंदाज चुकला आणि नियतीने आपला हिशोब चुकता केला. ज्या हेडने रोहीतचा झेल घेतला होता, त्याच रोहीतने हेडचा झेल टिपत कांगारूंना रिटर्न गिफ्ट दिले. हेड बाद होताच कोणालाही कायमचुर्णाची निकड भासली नाही, फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश अशी देशभरात फिलींग जाणवली. आपल्या डोळ्यादेखत रोहीत अॅन्ड कंपनीने कांगारूंचा फडशा पाडत देशभरात हर्षोल्लासाच्या सरी बरसवल्या. तब्बल २१८ दिवसांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची खदखद शांत झाली होती.

अॅासीच्या या पराभवाने आणि सुपर ऐटच्या अंतिम सामन्यात अफगाणीस्तानने बांगला देशला हरवल्याने कांगारूंना टी ट्वेंटी विश्वचषकातला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. अफगाणने अनपेक्षीतपणे मुसंडी मारत सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. टीम इंडियाच्या विजयात रोहीतची घणाघाती फलंदाजी, मध्य फळीत उपयुक्त भागीदारी, अर्शदीप कुलदीप बुमराहची टिच्चून गोलंदाजी तर सूर्या अक्षर पांड्या कुलदीप आणि बुमराहने टिपलेले अप्रतिम झेल मुख्य प्वाइंट्स ठरले. कांगारूंची गोलंदाजीत भट्टी जमलीच नाही. तर फलंदाजीत हेड आणि कर्णधार मार्श वगळता इतर फलंदाज कुचकामी ठरले. हा पराभव कांगारूंची मिजास, माजोरडेपणा, उन्मत्तपणा थोड्याफार प्रमाणात का होईना कमी करण्यास पुरेसा असणार असे वाटते.

डॅा अनिल पावशेकर
दिनांक २५ जून २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

आम्ही साहित्यिक चे लेखक 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..