कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! मागील आठवडयात तो योग आला. भव्य शिवमंदीर येथेही आहे. माहीत नसलेल्या किंवा विस्मृतीत जायला निघालेल्या परंपरा ,संस्कृती येथे recreate करण्यात आलेली आहे. माझ्या पिढीला “बारा बलुतेदार ” परंपरा माहीत आहे. नंतरच्यांचे काय ? त्यामुळे यावेळी नातही बरोबर होती. सगळं समजण्याच्या अलीकडे आहे ती , पण काहीतरी रुजणं, नोंदलं जाणं याच्या जवळपास नक्कीच आहे. भविष्यात होईल म्हणे पाया भक्कम !
अतिशय सुंदर राखलेला परिसर ! मठाची तीक्ष्ण देखरेख. एखादया पिकनिक स्पॉट सारख्या सोयी – कोल्हापुरातून सिटी बस, उपाहारगृह, आईस्क्रिम स्टॉल, सिक्युरिटी , दिशादर्शक फलक, मठातील उत्पादनांची विक्रीकेंद्रे यामुळे पर्यटकांची तुडुंब गर्दी ! सुरुवातीला २०० रू (माणशी ) तिकीट जरा जास्त वाटले, पण दोन तासांहून अधिक फेरफटका मारल्यावर (आणि हाती पडलेले बघितल्यावर ) ती बोच मागे पडली. एका भुयारी मार्गिकेतून होणारे इतिहास दर्शन – काळाच्या ललाटी स्वतःचे कर्तृत्व रेखाटलेले ऋषि -मुनी ! त्यांच्याबद्दल सुयोग्य माहिती देणारे फलक ! समृद्ध वारशाची जाणीव- श्रीमंत करणारी आणि आत्मनिंदेकडे (आपण काहीच योग्यतेचे नाहीत टाईप ) नेणारी.
बाहेर आल्यावर मोकळ्या जागेवर शेत -नांगरणी /कोळपणी , पाटाचे पाणी , पखाल, पारावरील गप्पा , तालीम , वेगवेगळी मंदिरे या सगळ्यांचे सुखद दर्शन ! माझ्या पिढीचे बालपणीचे खेळ -लगोरी ,विटी -दांडू , भोवरा, मांडोळी. मनाने भुसावळला गेलो – १९६५ ते १९७२ च्या कालखंडात ! मग तिथे राजू /अवी /कमलाकर /रवी /बापू / बाळ्या /सुनील हे सवंगडी अवतरले.
पाटील वाडा आकर्षण केंद्र असले तरीही ,लोहाराचे /सुताराचे / नाभिकाचे- घर आणि कामाचे ठिकाण अत्यंत बारकाव्याने उभारलेले ! भाजी -मंडई , लहान बाळाला न्हाऊ घालणारी /त्याचे कान टोचणारी बाई , बाळंतिणीची खोली असे एक ना दोन सूक्ष्म ठावठिकाणे – सगळे अस्तंगताच्या वाटेवर ! ही down memory lane सफर मस्त ! स्वामीजींना भेटायचा प्रयत्न केला पण जमले नाही. मठाच्या कार्यालयात एका खोलीवर HR असा बोर्ड दिसला – मस्त वाटलं .
बालोद्यान ,कलामांचे विज्ञान -विश्व ,प्रेरणा पार्क अशी ठिकाणे पाहावयाची राहून गेली कारण आमचा बालसैनिक थकला होता. पुढील भेटीसाठी हे राखून ठेवलेले आहे. आदल्या दिवशी पाहिलेली खिद्रापूरची अनावस्था आणि त्या पार्श्वभूमीवरील हा सुखद अनुभव ! दोन्हीकडे भूतकाळ – पण एका ठिकाणी निगुतीने जपलेला आणि दुसरीकडे अनास्थेचा साक्षीदार !
वाटले कण्हेरी मठाकडेच खिद्रापूरचे व्यवस्थापन सोपविले तर ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply