कन्नुदादाशी आणि माझी ओळख कशी झाली, आणि तो आमच्याकडे कधीपासून येऊ लागला हे आता आठवतही नाही. घरात काही मोठं काम करायला काढलं, म्हणजे संपूर्ण घराची स्वच्छता, माळ्यावरचं सगळं जड सामान काढून माळा स्वच्छ करून पुन्हा जागच्या जागी ठेवणे, घरात काही समारंभ असला किंवा लग्नकार्य असलं की सामानाची ने आण करणं अशा कामांसाठी मी त्याला मदतीला बोलावून घेत असे. पण काम सुरू केल्यावर तोच कामाचा पूर्ण ताबा घेत असे, आणि उलट मी त्याचा मदतनीस होऊन जात असे. विश्वासार्हता हा कन्नुदादामधला मोठ्ठा गुण होता. त्याला सुपारीच्या
खांडाचंही व्यसन नव्हतं. एका लहानशा कंपनीत तो नोकरीला होता, अचानक कंपनी बंद झाली आणि कन्नुदादाची नोकरी गेली. तेव्हापासून तो मिळेल ते काम करत होता.
त्याची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. काम पूर्ण झाल्यावर त्याला मोबदला मिळायचाच, पण ते करत असताना तो पैशासाठी करतोय असं जराही वाटत नसे. आपल्या घरातलं काम असल्यासारखं तो ते निपटायचा. पूर्ण झाल्यावर, सगळीकडे एक समाधानाची नजर फिरवायचा, आणि मान हलवून स्वतःशीच बोलल्यासारखा ,
“झालं सगळं…”
असं एकदा म्हणायचा.
कन्नुदादा वयाने ४५-५० च्या आतला, त्याला नुसतं कन्नू म्हणावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व नव्हतं. तसा वयाने माझ्यापेक्षा लहान, तरीही एकेरी हाक मारावीशी वाटत नसे. दिसायला काळ्याभोर पाषाणासारखा. मूळची अंगकाठी बळकट असावी, कारण आता बिकट आर्थिक परिस्थितीने तो बराच वाळला होता. तरी मूळचं हाडपेर मजबूत असावं हे त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवायचं. बारीक केलेले केस, त्याचे डोळेही बारीक होते. ढगळ फुल पँट नेहमी गुढग्यापर्यंत दुमडलेली असायची. बहुधा काम सुरू केल्यावर त्यामध्ये आणखी वेळ जायला नको ही दूरदृष्टी असावी. अंगात धुवट रंगाचा शर्ट आणि शर्टाच्या कॉलरमध्ये रुमाल. तो ही घाम आल्यावर चटकन मिळावा हाच उद्देश असावा. चेहऱ्यावर फारसं हास्य नाही, वायफळ बडबड नाही. पण काय काम करायचंय ते व्यवस्थित समजून घेण्याची सवय. कामाचं स्वरूप ऐकत असतानाच , ते कसं करायचं, कुठून सुरवात करायची याचा आराखडा डोक्यात तयार असायचा. मुळात मेंदू तल्लख होता, पण आई बापाची परिस्थिती हलाखीचीच असल्यामुळे शिक्षण घेणं जमलच नाही. मग पडेल ते काम मनापासून, प्रामाणिकपणे करणं हा खाक्या. वेळ न दवडता किंवा पैशाची घासाघीस न करता तो कामाला भिडायचा. त्याला विचारलं,
“कन्नुदादा, किती द्यायचे पैसे कामाचे ?”
यावर आजकाल कुणी असं म्हणत नाही तसा तो म्हणायचा,
“ते बघू की नंतर, तुम्ही काय समजून देणारच की.”
सुरवातीला मला हे उत्तर व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला अडकवणारं वाटायचं. पण नंतर कळू लागलं, की तसं नव्हतं, कारण काम झाल्यावर जे देऊ त्यात तो समाधान मानून, पैसे खिशात सरकवत आणि मान हलवत चालता व्हायचा. त्याची घरची स्थिती फारच हलाखीची होती. घरात त्याची एका पायाने अधू बायको, तीन पोरं आणि कायम बिछान्यावर असलेली म्हातारी आई, अशी कन्नुदादा धरून सहा माणसं. या सगळ्यांचं पोट कन्नुदादावर अवलंबून होतं. अधू पायामुळे बायकोला मिळकतीसाठी काही काम करणं शक्य नव्हतं. घरातलच ती कशीतरी सांभाळत होती. कन्नुदादा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पडेल ते काम स्वीकारून करत होता.
मधल्या दोन अडीज वर्षाच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात माणूस माणसापासून तुटला. प्रत्येकाला दुसऱ्याची भिती वाटू लागली. दिवसभराच्या मजुरीवर पोट असणाऱ्या गरिबांची तर पार वाताहत झाली. कन्नुदादा या काळात कुठे होता , काय करत होता, कुटुंबाचं पोट कसं भरत होता, गावाला गेला की इकडेच होता, काहीही कळलं नव्हतं. तसाही तो कामाला बोलावल्याशिवाय उगाच येऊन आपलं तोंड दाखवत नसे. तोंड वेंगाडण्याची सवयही नव्हती त्याला. गरिबितही स्वाभिमान जपत होता कन्नुदादा. कोरोना ओसरला आणि मला कन्नुदादाची आठवण झाली. म्हटलं एकदा संपूर्ण घराची साफसफाई करून घेऊया. त्याच्याकडे मोबाईल नव्हताच. आमच्या सोसायटीच्या वॉचमनला सांगितलं की तो निरोप देत असे, आणि लगोलग मान हलवत कन्नुदादाची स्वारी हजर होत असे. यावेळीही माझा निरोप जाताच कन्नुदादा हजर झाला खरा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी. हे एक मोठं आश्चर्यच होतं. म्हटलं व्यस्त होता असेल दुसऱ्या कामात. येताच नेहमीप्रमाणे मान हलवत समोर उभा राहिला. मी त्याला निरखत होतो, आज त्याच्या चेहऱ्यावरचा भाव मात्र वेगळा होता. म्हटलं,
“काय कन्नुदादा, कसा आहेस ?” यावर
“ठीक” इतकंच बोलून तो गप्प राहिला.
तरीही मी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण “हो” “नाही” एव्हढ्याच उत्तराशिवाय हाती काही पडलं नाही. माझं बोलणं ऐकताना मध्येच तो खाली दोन पायांवर बसला. म्हटलं, “कन्नुदादा खुर्चीत बस.”
पण माझ्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. मी कामाबद्दल सांगत असतानाही त्याचं सगळं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं. हे सगळंच मला नवीन होतं. कामाचं स्वरूप ऐकून घेतल्यावर जराही वेळ न दवडता, ताडकन उठणारा कन्नुदादा आज दोन्ही गुडघ्यांवर हातांचा जोर देत उभा राहिला आणि केरसुणी, फडका घेऊन कामाला लागला. नेमकं काय झालंय हे विचारावं असं वाटत होतं, पण म्हटलं काम झाल्यावरच विचारू आणि कामाचे पैसे देताना काही नड असेल तर मदत करू, असा विचार करून मी ही माझ्या कामाला लागलो. साधारण अर्ध्या पाऊण तासाने मी, कन्नुदादा काम करत असलेल्या खोलीत सहज डोकावलो तर तो डोकं धरून दोन पायांवर उकिडवा बसलेला होता. काम अर्धवट ठेवून असा बसलेला आजवर त्याला मी कधीच पाहिला नव्हता. याचा सोक्षमोक्ष लावावा असा विचार करून, मी खोलीत जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं,
“कन्नुदादा, काय झालंय ?”
माझ्या या प्रश्नाने त्याचा बांध फुटला आणि तो हमसून हमसून रडू लागला. त्याचं शरीर घामाने भिजून गेलं. काही न बोलता त्याला पाणी प्यायला दिलं, पण ते ही त्याने घेतलं नाही. मी पुन्हा एकदा विचारलं ,
“कन्नुदादा, मला आधी सांग काय झालंय ? त्याशिवाय तुला कामाला हात लावू देणार नाही.”
माझ्या प्रश्नातल्या ओलाव्याने गदगदून येत तो म्हणाला,
“काल तुमचा निरोप आला, त्याआधीच काही वेळापूर्वी म्हातारी गेली होती. झोपेतच गेली. त्यातच गेले दोन दिवस कुठेच मजुरी मिळाली नाही. पोरांच्या पोटात अन्नाचा कण नाही. म्हातारी झोपेतच आचके देत होती, आणि अचानक गार पडली. तिला स्मशानात न्यायचंय, पण कनवटीला फुटका पैसा नाही. तशीच पडलीय घरात. पोरही भुकेने कळवळत पडलीयत. पाणी तरी किती पाजयचं त्यांना ? तुमचा निरोप आला आणि हायसं वाटलं. म्हटलं दिवसभराची मजुरी मिळाली की म्हातारीला स्मशानात नेऊ आणि पोरांच्या पोटात घालू काहीतरी. म्हणून धावत आलो खरा, पण उपाशी पोट, म्हातारीचा मेलेला चेहरा आणि बायको पोरांची उपासमार यामध्ये ताकदच संपली. माफ करा साहेब, मी करतो पूर्ण सगळं काम.”
कन्नुदादाचं बोलणं ऐकून मी सुन्न होऊन गेलो. दोन क्षण विचार केला. त्याच्या कामाच्या होणाऱ्या मजुरीचे आणि वर असे पाच हजार रुपये त्याच्या हातावर ठेवले, आणि जरा आवाज चढवून म्हटलं “कन्नुदादा, तुझ्या आजच्या होणाऱ्या कामाचा advance आणि मुलांसाठी आमच्याकडून असे पैसे दीलेयत. काही न बोलता उठायचं, आणि घरी जायचं.”
तितक्यात बायकोने लेकाला पाठवून,काही खाण्याचे जिन्नस मागवून घेतले आणि ते पुडकं त्याच्या हातात ठेवलं.
म्हटलं, “आधी बायको पोरांच्या पोटाला घाल, आणि मग आईचं कर.”
मान हलवत , हात जोडत कन्नुदादा नाईलाजाने उठला आणि जाऊ लागला. आज त्याचा स्वाभिमान दुखावला होता. जाताना म्हणाला “येतो साहेब उद्या परवाला, आणि करून टाकतो काम.”म्हटलं,
“तू सगळं निस्तरून सावकाश ये. आता आधी घरी जा.”
कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली. म्यूनसिपालिटीच्या इस्पितळात भरती केलं. काय होतंय, कसा आहे कळायला काहीच मार्ग नव्हता. बायको एक दोन वेळा गेली इस्पितळात बघायला, पण तिला कोण दाद देतय ? बाहेरूनच घालवून दिलं तिला.
चार दिवसांनी वॉचमनकडून कन्नुदादा गेल्याची बातमी कळली, आणि मनात एकच विचार आला, advance घेतलेले कामाचे पैसे काम पूर्ण करून न फेडता आल्याने, प्राण सोडताना कन्नुदादाच्या आत्म्याला किती यातना झाल्या असतील ???
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply