कसारा घाट उतरल्यावर आसनगावच्या पुढे रस्त्याच्या कडेला काही आदिवासी महिला पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या विकायला घेऊन बसल्या होत्या. कोवळ्या लुसलुशीत काकड्या लहान लहान टोपल्यात एकावर एक रचून ठेवलेल्या. बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या होत्या. त्या रानभाज्यांची नावं मला माहिती नव्हती त्यांचे औषधी गुणधर्म माहिती नव्हते की त्या घरी नेऊन खाव्यात किंवा खायला घालाव्यात असेही वाटत नव्हते. एक काकड्या सोडल्या तर कंटोळी शिवाय मला दुसऱ्या कुठल्याच भाज्या ओळखता आल्या नव्हत्या.
कंटोळी हा प्रकारच एवढा आकर्षक आहे की ती भाजी बघता क्षणी लक्ष वेधून घेते. डार्क किंवा लाईट पोपटी आणि हिरवा रंग. पातळ आणि लांब सडक देठ, एखाद्या खात्या पित्या घरच्या व्यक्तीच्या सुटलेल्या पोटासारखा गोल गरगरीत आकार आणि त्यावर असणारे संपूर्ण मऊ टोकदार काटे.
नाशिकडून मुंबई कडे निघालेल्या मध्यमवर्गीयांच्या साधारण फोर व्हीलर पासून ते गर्भ श्रीमंतांच्या आलिशान फोर व्हीलर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या होत्या. भाज्या घेणारे सगळेच सुशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत याउलट भाज्या देणारे अशिक्षित आणि आर्थिक दृष्टया मागासलेले.
कोणी ताज्या आणि हिरव्यागार भाज्यांचे तर कोणी भाज्यांसोबत स्वतःचे फोटो घेत होते. कोणी घासाघीस करत भाव करत होते तर कोणी एकमेकांस रानभाज्यांचे महत्व आणि औषधी गुणधर्म समजावत होते.
भाज्या विकणाऱ्या महिला अत्यंत साधारण कपड्यात होत्या काही जणींकडे हजार बाराशे वाले साधे कि पॅडचे मोबाईल होते हीच काय त्यांना लाभलेली प्रगती दिसत होती. घासाघीस करणारे गिऱ्हाईक बघून त्यांचे चेहरे हिरमुसले होत होते.
कोणी पन्नास रुपयांची तर कोणी जास्तीत जास्त शंभर रुपयांची भाजी घेत होते. गाड्यांमध्ये हजारो रुपयांचे पेट्रोल डिझेल आणि हजारो रुपयांचा टोल भरून नाश्ता आणि जेवणावर हॉटेलांमध्ये सुद्धा हजारो रुपये खर्च करून त्याच हॉटेल च्या वेटर किंवा पार्किंग मधल्या सिक्युरिटीच्या हातात वीस किंवा पन्नास ची नोट प्रेस्टिज म्हणून कोंबणाऱ्या सुशिक्षित आणि प्रगत लोकांना आदिवासी महिलांकडून पन्नास शंभर रुपयांची औषधी भाजी घेताना घासाघीस करावी लागत होती.
वर्षातील बारा महिन्यातील दीड दोन महिन्यात उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या विकून असे किती पैसे त्यांना मिळत असतील. जंगलात, पाण्या पावसात, ओढ्या नाल्यात, काट्या – झुडपांना आणि चिखलाला तुडवून रानभाज्या गोळा करुन शिकलेल्या लोकांना शंभर रुपये किलो सांगितल्यावर त्यांनी पन्नासला देतेस का विचारल्यावर काय वाटत असेल.
या आदिवासी महिलांच्यात त्यांचा एखाद दुसराच पुरुष दिसतो कारण तो निर्व्यसनी असतो. बाकी महिलांच्या वाट्याला व्यसनी पुरुष असतात जे विक्रीसाठी सोडा पण भाज्या गोळा करायला सुद्धा जातं नाहीत.
दिवसभराची जेवढी कमाई होईल त्यातून या महिला घरी जाताना त्यांच्या पोरांसाठी एखाद दुसऱ्या दिवशी खाऊ नेतात. त्यांच्या पोरांचा आवडता खाऊ म्हणजे दहा रुपयांत मिळणारा थंड झालेला वडापाव. नवरा काम जरी करत नसला तरी त्याच्या बायकोने कमवलेल्या पैशातून हक्काने दारुसाठी वाटा मागतो. त्या महिलांना तो देण्यावाचून पर्याय नसतो.
ह्यांची मुलं एकतर झेड पी च्या नाहीतर आश्रमशाळेत शिकतात जिथं त्यांना त्यांच्या रानातल्या भाज्या पण नशिबी नसतात. जे मिळेल ते खायचे आणि जे शिकवतील ते शिकायचे. त्यांचा प्रगत होण्याचा आणि समाजात पुढे येण्याचा मार्गच एवढा खडतर असतो की आम्हाला प्रगती नको पण निदान अंगभर कपडे आणि पोटभर खाणे मिळून नीट जगणे तरी नशिबी येऊ दे अशी अवस्था असते.
शासनाने यांच्यासाठी कितीही योजना आणल्या कितीही नियम केले तरीही त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहचतच नाहीत. शासनाच्या योजना आणि त्यांच्यासाठी केलेला खर्च जर त्यांच्यापर्यंत पोचला असता तर या महिलांना आज रस्त्यावर कंटोळी विकावी लागली नसती.
आता तर मॉल मध्ये सुद्धा कंटोळी मिळायला लागली पण मॉल मधील पाकिटातून आलेल्या कंटोळीला जी एस टी लावला तरी काऊंटर वर कोणी घासाघीस नाही करणार.
घासाघीस ही गरिबांशीच आणि अशिक्षित लोकांशीच जास्त होते आणि त्यात जिंकतात ते सुशिक्षित आणि पुढारलेलेच, कारण त्यांनी जी किंमत केलीय त्यात मिळाले नाही मिळाले त्यांना फरक पडत नाही. पण ज्यांना विकायचे आहे त्यांचा माल विकला गेला नाही तर कदाचित त्यांची चूल सुद्धा पेटणार नाही.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनिअर
B.E.(mech) DIM, DME.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply