बंगालमधील थोर समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर हे त्यांच्या कनवाळूपणाबद्दल खूपच प्रसिद्ध होते. त्यांचा हा कनवाळू स्वभाव लहानपणापासूनच होता.
ईश्वरचंद्र विद्यासागर आपल्या शाळेतील गोरगरीब मुलांना नेहमीच मदत करीत. एकदा हिवाळ्यात अतिशय कडक थंडी पडली होती म्हणून ईश्वरचंद्रांच्या आईने खास बाजारात जाऊन उबदार लोकर आणली व त्या लोकरीचे ईश्वरचंद्रांसाठी स्वेटर विणल व तो स्वेटर घालून ईश्वरचंद्रांना शाळेत पाठविले. सकाळच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या ईश्वरचंद्रांना रस्त्याच्या कडेला एक भिकारीण आपल्या लहान मुलासमवेत बसलेली दिसली. तिच्या मुलाच्या अंगात फाटके कपडे होते व थंडी सहन न होऊन ते रडत होते. ईश्वरचंद्रांना ते पाहून त्या मुलाची दया आली व त्यांनी मागचापुढचा कसलाही विचार न करता स्वत:च्या अंगातील नवा कोरा स्वेटर काढून त्या भिकारणीला दिला व त्या मुलाला घालायला सांगितला.
तो उबदार स्वेटर मुलाच्या अंगात घातल्यानंतर थंडी पळत्यामुळे त्या मुलाचे रडणे थांबले. ते हसू लागले. ते पाहून त्या समाधानाने ईश्वरचंद्र शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर ते जेव्हा घरी परतले तेव्हा आईने छोट्या ईश्वरचंद्राला त्याबाबत विचारले; तेव्हा त्याने तो स्वेटर भिकारणीच्या मुलाला दिल्याचे सांगितले. आर्हने त्याच्यावर रागावल्याचे नाटक केले व ती
म्हणाली, “या गोष्टीबद्दल मी तुला आता चांगला मार देणार आहे. त्यामुळे तुला नक्कीच वेदना होतील.” त्यावर शांतपणे ईश्वरचंद्र म्हणाले, “मी तुझ्या दृष्टीने अपराध केला आहे खरा; त्याबद्दल मला तू जरूर मार. मात्र या मारामुळे होणाऱ्या वेदना मला ते मूल थंडीत कुडकुडताना पाहिल्यामुळे झालेल्या वेदनांपेक्षा नक्कीच कमी असतील” छोट्या ईश्वरचंद्रांचा तो कनवाळूपणा पाहून आईने त्याला मार तर दिला नाहीच; उलट जवळ घेऊन त्याचे कौतुक केले.
Leave a Reply