व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला अमित मेश्राम, बालाजी दुड्डेयांचा लेख
अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मानवाला माणूसपण हे कपड्यामुळे मिळाले आहे, कारण परिधान केलेलं वस्त्र हे मानवी मनाचे प्रतिबिंब असते !
वस्त्र निर्मितीचा वेदांमध्ये ही उल्लेख आढळतो. वस्त्र विश्वाचे अस्तित्व पाच हजार वर्षांपासून उपभोगक्त्याला ज्ञात आहे. वैदिक पूर्वार्ध व उत्तरार्धामध्ये रूपकात्मक विवरणाच्या पद्धतीला अनुसरून ईशावास्यम् या पदाचा अर्थ वस्त्राच्छादित असाही असून वस्त्राप्रमाणे अंगावर घ्यावे असा उल्लेख आढळतो. वेदांमध्ये वस्त्र निर्मितीचा उल्लेख कसा आढळतो ते पहा. वेदकालीन ऋषी भारद्वाज, बृहस्पती देवता, वैश्वानर अग्नी त्रिष्टुप या सूक्तातील दुसऱ्या ऋचेमध्ये उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेल्या वस्त्राचे रूपक आढळते. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख हिरण्यद्रपी म्हणून सुद्धा आला आहे. अनेक धार्मिक ग्रंथांत वल्कलांचा उल्लेख आहे. उदा. महाभारतामध्ये वस्त्रांचा उल्लेख मणीचिरा असा करण्यात आला आहे. यामध्ये जरतारी कामाबरोबर माणिक-मोती व मोल्यवान हिरे गुंफण्याच्या नोंदी मिळतात. जैन साहित्यामध्ये रेशमी वस्त्रांचा उल्लेख पट्टा या नावाने करण्यात आला आहे. महानुभाव साहित्यात पैठणच्या भरजरी वस्त्रांचा उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य प्रवाशांच्या नजरेतूनसुद्धा अशा प्रकारची वस्त्रे निर्माण करणारी भारतातील केंद्रे सुटलेली नाहीत.
कापसाचा सूत व कापड बनविण्यासाठी वापर करण्याच्या कल्पनेचा शोध सर्वप्रथम भारतामध्ये पाच हजार वर्षापूर्वी लागला. कापसापासून तयार झालेल्या विविध प्रकारच्या कापडाचे उत्पादन करणारा देश म्हणून भारत प्रसिद्ध होता. जगातील इतर देशांना निर्यात करणाराही एक प्रमुख देश म्हणून भारताची ओळख होती. ढाक्याच्या मलमलीसारखे जगातील सर्वात तलम वस्त्र भारतात तयार होत असे. भारतामध्ये वस्त्रोद्योग अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या उद्योगाची वाढ भारतात झाल्यामुळे भारतामध्ये श्रीमंती आली. इंग्लंड, जर्मनी, रोम, ग्रीस, चीन इत्यादी ठिकाणच्या लोकांनी ख्रिस्तपूर्व काळापासून सतराव्या शतकापर्यंत भारताला दिलेल्या भेटीमध्ये भारतातील कापसापासून तयार केलेल्या कपड्यांबद्दल गौरवोद्गार आढळतात. एकंदरीत प्राचीन काळापासून भारतामध्ये वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते, एका चाटुश्लोकाच्या हास्यरसातील श्लोकात म्हटले आहे –
किं वाससा इत्यत्र विचारणीय वास: प्रधानं खलु योग्यतायै ।
पिताम्बरं वीक्ष्य दौ स्वकन्यां दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ।।
या लेखामधून समग्र वस्त्रविश्व व प्रक्रियांविषयी आपणास सुजाण करणे हा हेतू आहे. या क्षणी वस्त्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे कटाक्ष टाकणेही सयुक्तिक ठरावे. औद्योगिक क्रांती पूर्वी भारतातील वस्त्रनिर्मितीच्या उद्योगाची रचना ही युरोपपेक्षा वेगळी होती. युरोपमध्ये छोटे छोटे गट असत. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळत असे. ही गट योजना त्यांचा विकास करण्यात मदतनीस ठरत असे. भारतात असे गट नव्हते पण जातिव्यवस्थेने या गटांची जागा घेतली होती. त्यावेळी भारताची आर्थिक रचना वेगळी होती. प्रत्येक खेडे हे स्वयंपूर्ण एकक होते व त्यांच्या गरजा पण कमी होत्या तेव्हा संपूर्ण गाव स्वतःच्या गरजा स्वतः भागवीत असे. या संरचनेला बलुतेदारी म्हणत. असे ते आत्मनिर्भरतेचे व्यावसायिक प्रतिरूप (Business Model ) होते. इतकं स्वयंपूर्ण, स्वयंशासित व स्वावलंबी बिझनेस मॉडेल जगामध्ये आतापर्यंत निर्माण झाले नाही. भारतीय वस्त्रोद्योगामध्ये महाराष्ट्र राज्याचा खूप मोठा वाटा आहे.
अगदी प्राचीन काळापासून वस्त्र व वस्त्रोद्योग हे भारतातील समाजजीवनाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे एक प्रमुख अंग बनले आहे. या उद्योगामध्ये रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता आहे. देशातील वस्त्रोद्योग साडेतीन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. यातील बहुतांश रोजगार हे ग्रामीण व मागासलेल्या भागांत आहेत. देशाच्या एकूण परकीय चलनाच्या मिळकतीपैकी सुमारे २७% पेक्षा अधिक परकीय चलन वस्त्रोद्योग आजपर्यंत मिळवून देत आला आहे.
हा एकमेव उद्योग असा आहे, की जो संपूर्णपणे स्वावलंबी आहे आणि ज्यामध्ये मूल्यवृद्धीची साखळी परिपूर्ण आहे. सुतापासून कापड बनवणे हे जसे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते तसेच प्राण्याच्या त्वचेचा उपयोग करून वस्त्रनिर्मिती होऊ शकते याचा शोध लागणे हेही एक मोठे पाऊल होते.
कपड्यासाठी लागणारे हे तंतू मिळवण्यासाठी सर्वात मुबलक केस असलेला व अतिशय सहजपणे पकडला जाऊ शकणारा, तसेच पाळीव प्राणी होऊ शकणारा प्राणी म्हणजे मेंढी. म्हणून मेंढीचे केस, ज्याला आपण लोकर म्हणतो हा वस्त्रोद्योगात वापरला गेलेला सर्वात पहिला धागा, कापूस नव्हे. रेशीम व कापूस यांचा वापर लोकरीच्या वापरानंतर काही हजार वर्षांनंतर सुरू झाला.
मोहेंजोदडो व हड्डप्पा येथील उत्खननात कापसापासून तयार केलेले कपडे व दोर यांचे अवशेष सापडले होते. ही संस्कृती सुमारे ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. त्या वेळेपासूनच कापसापासून तयार झालेल्या विविध प्रकारच्या कापडांचे उत्पादन करणारा व जगातील इतर देशांना निर्यात करणारा भारत हा एक प्रमुख देश म्हणून ओळखला जाऊ लागला. ढाक्याच्या मलमलीसारखे जगातील सर्वात तलम वस्त्र भारतात तयार होऊ लागले. रेशीम व लोकर यांची निर्यात व्हायला लागल्यामुळे भारतात श्रीमंती आली.
अठराव्या शतकात युरोपमध्ये स्वयंचलित यंत्रे आली. या स्वयंचलित यंत्रांचा उपयोग सर्वप्रथम वस्त्रोद्योगात करण्यात आला. यांत्रिकतेमुळे उत्पादन वाढले, उत्पादनाचा खर्च कमी झाला, गुणवत्तेत वाढ झाली, त्यामुळे पाश्चात्त्य देशांनी सर्व जगात कापड निर्यात करण्यात सुरुवात केली. कालांतराने बदल होत गेले व पाश्चात्त्य देशांची अनेक शतकांची मक्तेदारी स्वतःकडे खेचून घेण्यात भारत मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना दिसत आहे.
भारतीय वस्त्रोद्योग साडेतीन कोटी लोकांना रोजगार पुरवतो. आधुनिक स्वदेशी वस्त्र उद्योगाची सुरुवात मुंबईतील पहिल्या कापड गिरणीतून झाली. ही कापड गिरणी डॉ. दावर यांनी १८५४ मध्ये एका इंग्लिश माणसाशी भागीदारी करून सुरू केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कापड गिरण्या देशाच्या कापडाच्या एकूण गरजेपैकी फक्त ९ टक्के कापड बनवत होत्या. २७ टक्के कापड हातमाग पुरवत असे आणि ६४ टक्के कापड आयात होत असे.
१९६० नंतर वस्त्र उद्योगाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाने यंत्रमाग व्यवसायास प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले.
यामुळे देशाच्या ग्रामीण भागामध्ये, विशेषता सोलापूर, इचलकरंजी, भिवंडी, दक्षिणेत सेलम, तीरूपूर आणि गुजरातमध्ये सुरत व देशाच्या इतर अनेक ग्रामीण भागात यंत्रमागाची केंद्रे सुरू झाली. त्याचबरोबर कापड विणण्यासाठी लागणाऱ्या पूरक वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी पूरक उद्योगही विकसित होऊ लागले. या अनुषंगाने ग्रामीण भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसाठी एक हातमाग त्यांना देऊन आजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी बाबा आमटे यांच्या आनंदवनने एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्याचे स्वरूप – १. कच्च्या मालाचा पुरवठा करणे २. योग्य मजुरी देऊन कापड तयार करून घेणे.
वस्त्रोद्योगातील कच्चा माल कापूस
जगभर वस्त्रोद्योगामध्ये अनेक प्रकारच्या मानवनिर्मित व नैसर्गिक तंतूंचा वापर केल्या जातो. कापूस, लोकर, रेशीम, लिनन, अशा नैसर्गिक तंतूंबरोबरच मानवनिर्मित नायलॉन, पोलिस्टर, पोलिप्रोपेलिन अशा तंतूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जागतिक स्तरावर कापसाचे इतर धाग्यांशी असलेले वापराचे प्रमाण ४०: ६० टक्के आहे. तर भारतात हेच प्रमाण ७० ते ३० टक्के आहे. यावरून भारतात कापसास असलेले महत्त्व लक्षात येईल. कापसाच्या जागतिक उत्पादनापैकी २२ टक्के उत्पादन भारतामध्ये होते आणि कापूस उत्पादनामध्ये चीन नंतर भारताचा दुसरा नंबर लागतो.
सूतकताई
कापसासारख्या कच्च्यामालानंतर वस्त्रनिर्मितीतील पुढील पायरी म्हणजे सूतकताई. या प्रक्रियेमध्ये तंतूंना पीळ देऊन सूत तयार केले जाते. या प्रक्रियेत गांधीजींच्या चरख्यापासून सुरुवात होऊन विद्यमान परिस्थितीत यंत्रमानवाच्या साहाय्याने सध्या सूत तयार केले जाते. आज भारतात जवळजवळ २००० सूत गिरण्या कार्यरत आहे.
वीणाई (weaving )
वस्त्रउद्योगातील उत्पादन साखळीमधील सूतकताई नंतरची प्रक्रिया म्हणजेच सूतविणाई. या प्रक्रियेच्या यंत्राचे तीन वर्ग आहेत. हातमाग, यंत्रमाग व आधुनिक धोटाविरहीत यंत्रमाग. हातमाग अत्यंत प्राचीन. दिवसाला ५ ते ७ मीटर उत्पादन. भारतात एकूण २४ लाख हातमाग आहेत. आनंदवनमध्ये बाबा आमटे यांनी १९६६ मध्ये हाताची बोटे नसलेल्या कुष्ठमुक्त रुग्णांसाठी हातमाग वापरून अजोड क्रांती घडवून आणली. वस्त्रनिर्मितीतली ही क्रांती वस्त्रनिर्मितीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. हातमागाचा विकास १९८० नंतर कमीतकमी होत गेला व यंत्रमागांनी त्याची जागा घेतली. परंतु अत्यंत किचकट कलाकुसरीच्या आणि भारी किमतीच्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी आजही हातमाग वापरला जातो. उदा. पैठणी, इरकली, पोचमपल्ली ही वस्त्र उत्पादने आजही हातमागावर बनवली जातात. आजही हातमाग २० लाख लोकांना रोजगार पुरवतो.
रंगाई, धुलाई आणि समापन (finishing)
या प्रक्रियेमध्ये अतुलनीय प्रगती झाली असून हस्त स्पर्शापासून विनाहस्त, पर्यावरण अनुकूल, निरंतरता प्रक्रिया विकसित झाल्या आहेत.
बदलती वेशभूषा
भारतातील परंपरागत पुरुष वेश म्हणजे धोतर किंवा लुंगी, चादर किंवा उपरणे व पगडी किंवा पागोटे आणि स्त्रीवेश म्हणजे साडी किंवा लुगडे अथवा कमरेला घागरा, वर चोळी किंवा कंचुकी, तसेच ओढणी व दुपट्टा असा आहे. तथापि गेल्या २००० वर्षांत ह्या सर्वसामान्य भारतीय वेशभूषेत प्रदेशविशिष्ट बदल होत आलेला दिसतो. हा बदल वेशभूषेची माध्यमे, त्यांचे आकार-प्रकार, त्यामागील सौंदर्यदृष्टी व उपयुक्तता इ. बाबतींत दिसून येतो. तसेच देशात बाहेरून आलेल्या लोकांच्या पेहेरावपद्धतींचाही परिणाम भारतीय वेशभूषेवर झालेला आढळतो. शिलाईचे कपडे भारतात सोळाव्या शतकातील मुसलमानी आक्रमणानंतर रूढ झाले, हा समज मात्र चुकीचा आहे. कारण शिवलेल्या कपड्यांचे उल्लेख वैदिक काळापासून आढळतात. प्राचीन भारतातील वेशभूषेसंबंधी डॉ. मोतीचंद्र यांनी आपल्या ‘प्राचीन भारतीय वेशभूषा’ (१९५०) या हिंदी पुस्तकात संशोधनपूर्वक विवेचन केले आहे. ज्यात प्राचीन भारतीय वेशभूषेसंबंधीचे वर्णन स्थूलमानाने दिलेले आहे.
स्वातंत्र्य आंदोलनात टिळकांची स्वदेशी चळवळ व महात्मा गांधींची ग्रामोद्धाराची चळवळ यांमुळे खादीचे कपडे वापरण्याची लोकांना एक राष्ट्रीय सवयच निर्माण झाली. खादीची गांधी टोपी, नेहरू शर्ट, त्यावर जाकीट आणि पायजमा किंवा धोतर हा पोशाख म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाची देणगी होय. पश्चिमी व देशी पेहेरावपद्धतींच्या वेगवान सरमिसळीच्या या कालखंडात भारतात प्रदेशविशिष्ट अशी पोशाखपद्धती रूढ होती. भारतातील सर्व प्रांतात आजही भिन्न भिन्न वेशभूषा पहावयास मिळते.
भारतीय वस्त्रनिर्मितीमागचा हेतू प्रयोजन व आशय विश्वातील इतर देशांपेक्षा अतिशय सखोल व वेगळा होता. कारण भारतीय मनुष्याची वस्त्रसंबंधित मान्यता अतिशय संवेदनशील आहे. भारतीय मनीषा वस्त्रांना मानवाची दुसरी त्वचा मानते. तद्नुषंगाने दुसऱ्या त्वचेचा संबंध मानवाच्या स्वास्थ्याशी असल्याने समापनामधील (finishing) निरंतरता (sustainability) जतन करून वृद्धिंगत करणे हा सध्या भारतीय संशोधनाचा केंद्रबिंदू आहे.
वस्त्रोद्योग हा आता नुसता वस्त्रोद्योग राहिला नसून तो वस्त्र आणि कपडा उद्योग असे त्याचे स्वरूप झाले आहे. त्यामुळे वस्त्रनिर्मितीत रासायनिक समापनाची प्रक्रिया अंतिम राहिली नसून कुर्ता वा कमिज हे अंतिम उत्पादन झाले आहे. हे अंतिम उत्पादन मानवाची दुसरी त्वचा झाल्याने त्याच्या मापामध्ये व गुणवत्तेमध्ये मोठे बदल झाले आहेत.
तयार कपडे उद्योग हा आजच्या चालढाली ( fashion) व जीवनशैलीशी निगडित झाल्याने मानवी स्वास्थ्यावर त्याचे होणारे परिणाम विचार करायला लावणारे आहेत. गतिमान प्रगतिशीलतेच्या मार्गाने जाणाऱ्या जीवनशैलीचा मानवी स्वास्थ्याशी समन्वय करण्याकरिता भारतीय परंपरेने दिलेल्या जीवन ऊर्जेच्या संतुलनाचा संदेश फार महत्त्वाचा ठरतो.
( आनंदवन येथे वस्त्र प्रावरण विभागात कार्यरत. दिव्यांग रुग्णांच्या सेवेसाठी कार्यतत्पर.)
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply