
माझा पहिला स्वयंपाकघर प्रवेश इतर सर्वांसारखाच झाला. म्हणजे आईच्या मागोमाग, तिचा पदर धरून. ‘स्वयंपाकात लुडबुड करू नकोस’ म्हणून बजावूनसुध्दा धपाटा खावा लागणे हा शिक्षणाचा भाग असतो. अभ्यासक्रमाबाहेरील पण आवश्यक असे हे संस्कार आपल्यावर घडत असतात. बालपणात काही गोष्टी मनावर ठसतात, त्यातली एक म्हणजे आईची स्वयंपाक-कला. पदार्थ करण्याची आईची पध्दत व त्या पदार्थाची चव यांची समीकरणे माझ्या मनात ठसू लागली. शाळा-कॉलेजला असेपर्यंत घरचे जेवण व नंतर वसतीगृहात असताना मेसचे जेवण असा बदल झाला.
घरापासून लांब नोकरीनिमित्त भ्रमंती सुरू झाल्यावर घरचे अन्न आठवू लागले. जेथे शक्य होते (म्हणजे स्वयंपाकघर व भांडी होती) तेथे माझी ‘प्रयोगशाळा’ सुरू झाली. साहित्य आणि कृती यांचा मेळ जमणे म्हणजे काय याचा उलगडा होऊ लागला. वरण-भातासारख्या साध्या पाकक्रिया साकारताना चाचपडावे लागले. मजा येऊ लागली. मी हळूहळू प्रगती करीत गेलो. आत्मविश्वास वाढू लागला. पण माझं आणि पोळ्यांचं वाकडं होतं. लग्नानंतर बायकोने पोळ्या शिकविण्याचे केलेले प्रयत्नही कमी पडले. भिजवलेल्या कणकेचे ‘टेक्स्चर’, पोळी लाटण्याची क्रिया व भाजल्यानंतर ती खाता आली पाहिजे, या सगळ्याचा मेळ कधी जमला नाही. मी पोळ्यांचा नाद सोडून दिला.
माझे ‘Culinary Skills’ कसे वाढत गेले ते ह्या प्रसंगातून कळेल. पंचवीस वर्षापूर्वी मी माझे बिर्हाड पॅरिसला थाटले होते. किचनमधुन ‘आयफेल टॉवर’ दिसत असे. रोजचे जेवण बनविणे सवयीचे झाले होते (ब्रेडच्या विविध प्रकारांनी मला आधार दिला). एका सुट्टीच्या दिवशी माझ्या डोक्यात रवा, साखर व तूप यांचा झिम्मा सुरू झाला व मी शीरा करण्याचा निश्चय केला.
माझ्या पॅरिसच्या घरी फोन होता पण ठाण्याला नवीनच घर घेतल्याने तेथे फोन नव्हता. मी माझ्या चुलत बहिणीला फोन करून शीर्याची कृती विचारली. कामाला लागलो. तुपावर रवा भाजला. पाण्याचे आधण ठेवले. पुढील क्रम नक्की उमजेना. मुंबईत रात्री एक वाजता पुन्हा फोन करणे टाळले. माझ्यापुढील प्रश्न तसा सोपा होता. भाजलेला रवा, साखर आणि गरम पाणी हे तीन पदार्थ कोणत्या क्रमाने कढईत टाकायचे हाच तो प्रश्न. माझ्यासमोर क्रमाचे सहा पर्याय होते. तापलेल्या कढईत साखर टाकून सुरुवात करणे बरोबर नाही असे मला वाटले. कारण साखर जळल्यावर काळा कार्बन तयार होत असल्याचे प्रयोगात पाहिले होते. आता राहिले चार पर्याय. मी विचार करकरून पाण्यात साखर टाकली. साखरेचा पाक होण्यास सुरुवात झाली होती. थोड्या वेळाने रवा टाकून ढवळणे सुरु ठेवले. मिश्रण जसे मोकळे व्हायला हवे तसे ते होत नव्हते. प्रयास जारी ठेवले. काही वेळाने कालथ्याबरोबर कढईही वर उचलली गेली. थोडी चतुराई दाखवत मी त्यांची सोडवणूक केली. शीरा नामक पदार्थाची आशा सोडली व आता काय तयार होईल याचा विचार करू लागलो. ताटाला तूप लावून ते मिश्रण ओतले. काही वेळाने वड्या पाडल्या. एकदाची किनार्याला लागली बोट. वडी चवीला चांगली व खाता येण्याजोगी झाली होती. दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये भारतीय व फ्रेंच मित्रांना खायला दिल्या. कोणालाही पोटदुखीचा वा दाढदुखीचा त्रास झाला नाही. मग मी त्या संपविल्या. काही दिवसांनी दुसर्या प्रयत्नात शीरा जमला.
मी बहिणीला फोनवर रव्याच्या वड्यांची रेसिपी सांगितली. ती म्हणाली अशाच करायच्या असतात. मला मात्र ‘करायला गेलो एक’ म्हणजे काय ते कळले.
— रविंद्रनाथ गांगल
Leave a Reply