२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे.
भारत चीन सिमेवर डोंगराळ भागांमध्ये चीनविरुद्ध लढण्याकरता एक आक्रमक कोर म्हणजे सैन्याची एक तुकडी तयार करण्यास सांगितले होते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सरकारचे लक्ष पूर्णपणे सामाजिक प्रगतीवर केंद्रित आहे आणि डिफ़ेंस बजेटमध्ये वाढ झालेली नाही,ज्यामुळे सैन्याचे आधुनिकीकरण पुर्णपणे थांबले आहे, जे धोकेदायक आहे. मात्र 1962 मधील भारत व आजचा मधील भारत यात प्रचंड फरक आहे. जसे जनरल मलिक यांनी त्यावेळेस म्हटले होते की आम्ही आमच्या जवळ जी शस्त्रे आहेत त्याचा वापर करुन देशाचे रक्षण करु.
कारगिलमधे पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी
कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.
२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस
हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय ही मोहिम राबविली. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै१९९९ रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३००हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते.
तरूण अधिकारी आणि शुर जवानांचे युद्ध
कारगिल युद्ध हे तरूण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शुर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. शहिद झालेल्या अधिकार्याची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धीमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले.
या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मु आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ सिख रेजीमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. या तुकड्यांचा ‘युनिट सायटेशनने गौरविण्यात आले.
शिफारशींची १९ वर्षांत अंमलबजावणी नाही
आधीच्या कोणत्याही युद्धाच्या तुलनेत कारगिलच्या यशापयशाचे विश्लेषण तातडीने आणि पारदर्शकपणे झाले. सुब्रमण्यम समितीने (एसआरसी) चार महिन्यांतच सखोल आणि सडेतोड अहवाल सादर केला.
सीमेवर पावलापावलागणिक सैनिक उभा करून “इंच इंच लढविणे’ ही काही सुज्ञ रणनीती नव्हे. सीमेवर केवळ वाजवी सैन्य ठेवून कोणत्याही सीमाभंगाला कठोर आणि तत्पर प्रतिसाद देण्यासाठी पुरेशा आरक्षित (रिझर्व्ह) सैन्याची तजवीज करणे हा अधिक परिणामकारक पर्याय आहे. त्याबरोबर प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींवर अविरत २४/७ पाळत ठेवणे, हे आवश्यक आहे. त्यासाठी अत्याधुनिक टेहाळणी (सर्व्हेलन्स) यंत्रणा उभी करणे जरुरी आहे. त्यात यूएव्ही या स्वयंचलित विमानांचा पुरेशा प्रमाणात समावेश असला पाहिजे. 1999 नंतर कारगिल- नूब्रा विभागात पायदळाचे नवीन कोअर मुख्यालय (14 कोअर) उभे करण्यात आले आहे.
या त्रुटी अद्याप कायम
– तिन्ही दलांचे प्रमुख केवळ नामधारी . त्यांना सरकारी पातळीवरील कोणतेही अधिकार अथवा वैधानिक दर्जा नाही . केवळ धोरण आखण्यापुरतीच त्यांची भूमिका मर्यादित .
– वाहतूक व्यवस्था , इंजिनीअरिंग , मोहिमा आणि प्रशिक्षण तसेच , तिन्ही दलांची प्रादेशिक एकीकृत मुख्यालये , त्याचबरोबर मंत्रिगटाने सुचवलेल्या रचनेची अंमलबजावणी करणे या क्षेत्रांमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवरच सुसूत्रतेचा अभाव जाणवतो .
‘ पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षाविषयक मुद्द्यांबाबत ‘ राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शिका ‘ तयार करावी . त्यामध्ये परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणाची सांगड घालावी . ही मागदर्शिका म्हणजे भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य मोजण्याचा एक मापदंड ठरेल ,’ अशी सूचना समितीने केली होती .
– तिन्ही सैन्यदलांनी एक संयुक्त मार्गदर्शिका तयार करावी . प्रत्येक दलाच्या स्वतंत्र मार्गदर्शिकेतील तत्त्वांचा त्यामध्ये समावेश असावा . ही सूचनाही अंमलात आलेली नाही
सुब्रमण्यम समितीच्या महत्त्वाच्या शिफारशी
सुब्रमण्यम समितीच्या काही महत्त्वाच्या शिफारशी अजूनही बासनात आहेत. जवानांची “कलर सर्व्हिस’ (सक्तीचा कालावधी) 7 ते 10 वर्षांपर्यंत मर्यादित करून त्यानंतर त्यांना निमलष्करी दलांमध्ये दाखल करावे, ज्यामुळे सैन्यातील “तरुणाईचा’ अंश वाढेल आणि त्याबरोबरच निमलष्करी दलांच्या दर्जात वृद्धी होईल. अंतर्गत सुरक्षिततेच्या कामासाठी केवळ निमलष्करी दल आणि पोलिसाकडे सुपूर्त करावे. सीमासंरक्षण व्यवस्थापनेचे सखोल परीक्षण करावे. संरक्षणासाठी अधिक आर्थिक तरतूद करून सैन्य दलांच्या आधुनिकरणावर भर द्यावा. विशेषकरून पायदळाची शस्त्रास्त्रे, रात्रीसाठी दुर्बिणी, इतर साहित्य वगैरेला प्राधान्य द्यावे. शस्त्रास्त्रे आणि इतर संरक्षणसंलग्न सामग्रीच्या खरेदीसाठी पारदर्शक, सुसूत्र आणि परिणामकारक यंत्रणा कार्यान्वित करावी आणि संरक्षण दलाची तिन्ही अंगे संरक्षण मंत्रालयात विलीन व्हावीत आणि त्यांच्या सुसूत्रीकरणासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणजे सरसेनापतीची नेमणूक करावी.
शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्वाचा
द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात .जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.
भारतीय सैन्याने आपल्या प्राणांची बाजी लावून व अदम्य अशा साहसाचे प्रदर्शन करीत या अति उंचावरच्या लढाईत भारताच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले व आम्हा सर्व भारतीयांची मान उंच केली. कारगिलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी आहे; परंतु त्याबद्दल दक्ष राहण्याचा निश्चय हीच आज कारगिल दिनानिमित्त त्या संग्रामातील ५२७ हुतात्म्यांना आदरांजली आहे. ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply