आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात!
दिनांक ३ मे १९९९ रोजी पाकिस्तान विरोधात ह्या युद्धाला कारगिल आणि द्रास जिल्ह्यात सुरुवात झाली. बरोबर ओळखलंत. मी कारगिल युद्धाच्या बाबतीतच बोलतोय. सलग २ महिने ३ आठवडे आणि २ दिवस ( ३ मे १९९९ – २६ जुलै १९९९ ) भारतमातेचे वीर , सुपुत्र पाकिस्तानी शत्रूशी निकराने लढत राहिले आणि अखेरीस त्यांनी विजय रुपी पुष्प भारतमातेच्या चरणी अर्पण केले. त्यावेळी आपल्या भारताचे राष्ट्रपती के. आर्. नारायणन , पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी , भूदलप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक , उप भूदलप्रमुख ले. जनरल चंद्र शेखर , वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस होते. आतापर्यंत सगळ्यात उंचावर ही लढाई लढली गेली होती.
आता घटनांचा थोडासा आढावा घेऊयात. कडक हिवाळ्यात मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असत.फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सुसूत्रतेने व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेकू देणार्या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत सामील केले गेले. अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळानी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटले , परंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. घुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले. अशा रितीने कारगिल येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले.
भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जास्त मनुष्यबळ घेऊन युद्ध करणं ही फार कठीण बाब होती म्हणून अवघी २०,००० इतकीच फौज मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैन्य व वायुदल मिळून ३०,००० पर्यंत सैनिक कारगिल युद्धात वापरले गेले. भारतीय सरकारने ” ऑपरेशन विजय “ ह्या नावाखाली कारगिल युद्धाची कार्यवाही सुरू केली.
भारतीय वायुसेनेकडूनही ” ऑपरेशन सफेद सागर “ सुरू झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती.
भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरून लक्ष्य करण्यात आले.या कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेली.
अखेरीस lockdown च्या काळात आपण सर्वांनी मिळून वीरमरण प्राप्त झालेल्या समस्त हुतात्म्यांना वंदन करून आणि अशा वीरांना जन्म देणाऱ्या कुळांना नमन करून आजचा कारगिल विजय दिवस , घरात साजरा करू. जय हिंद ! वंदे मातरम् ! भारतमाता की जय.
– आदित्य दि. संभूस
संदर्भ :- विकिपीडिया व माहितीजाल
फोटो गूगल वरून साभार
Leave a Reply