यंदाच्या वर्षात आतापर्यंत ११९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. आज सुरक्षा दलांनी पुलवामात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाला ठार केले. दुजानाचे नाव ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीत होते. भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत असून चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी 1962 मधील भारत व आज 2017 मधील भारत यात प्रचंड फरक आहे.
कारगिलमधे पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी
२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.
२६ जुलै ‘कारगिल विजय दिवस
भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय ही मोहिम राबविली. सुरूवातीला हे आमचे सैनिक नसून दहशतवादी असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै१९९९ रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
५४३ अधिकारी आणि जवान युद्धात शहीद
जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध झालेले नाही. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३००हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. या युद्धात सुरवातीला लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने कुठपर्यंत घुसखोरी केली आहे हे शोधून काढण्याची कामगीरी सोपविण्यात आली.
कारगिल युद्धातला दुसरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा हे होते. सिंहाइतका शुर असल्याने बत्रा यांना त्यांचे सैनिक शेरशहा म्हणत असत. कारगिल युद्धाच्या केवळ दीड वर्षे आधी भारतीय सैन्यात सामिल झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली. कारगिलचे पहिले शिखर जिंकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना पुढे काय असे विचारले असता, ‘जेवढा प्रदेश जिंकला तेवढा पुरेसा नाही, ‘ये दिल माँगे मोअर‘ अशी प्रतिक्रीया कॅप्टन बत्रा यांनी दिली. त्यांच्यामुळेच ‘ये दिल माँगे मोअर हे वाक्य प्रसिद्ध झाले. त्यानंतर पॉइंट ५१४०च्या वरती असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉइंट ५१४० जिंकला, मात्र त्यात ते शहिद झाले. युध्दाआधी, मी ‘भारताच्या ध्वजामध्ये लपेटूनच परत येईल असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. ते खरे ठरले. या युद्धातले सगळ्यात पहिले ‘परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले.
युद्धभूमीला भेट द्या
त्यानंतर लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स या शिखरावर पाठविण्यात आले. यात त्यांच्या दोन राजपुताना रायफल्सचे कंपनी कमांडर मेजर आचार्य शहिद झाले. २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपुर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते. विजयन यांनी ‘थ्री पिंपल्स या १७ हजार फुट उंचीवर असलेल्या शिखरावर भारताचा झेंडा फडकवला; पाकिस्तानचे १५० सैनिक असलेल्या या शिखरावर चढण्यासाठी थापर यांनी तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच सर्वांत अवघड कड्याची निवड केली होती. विजयत यांच्या शौर्याबद्दल त्यांना विरचक्र प्रदान करण्यात आले. मात्र त्यात त्यांना विरगती प्राप्त झाली. विजयन यांनी मोहिमेवर जाण्याआधी आपल्या कुटुंबियांसाठी एक पत्र लिहले होते. मी परत आलो नाही तरच हे पत्र माझ्या कुटुंबियांना पाठवावे असे त्यांनी सांगितले होते. या पत्रात त्यांनी आपले वडील निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर यांना युद्ध संपल्यानंतर आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये लढलो हे पाहण्यासाठी या युद्धभूमीला भेट द्या असे म्हटले होते. ७८ वर्षे वयाचे निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर हे दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल येथील १८ हजार फुटांवरच्या विरभूमीवर जाऊन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते पत्र अजरामर झाले आहे.
परमविर कॅप्टन मनोज पांडे, ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, शिपाई संजय कुमार यांची विरगाथा
कॅप्टन मनोज पांडे यांनी ‘खालुबर नावाच्या शिखरावर हल्ला करून ते शिखर पाकिस्तानकडून परत मिळवले. त्यात कॅप्टन मनोज पांडे यांना विरगती प्राप्त झाले. त्यावेळी आपल्या तुकडीतील सैन्याला उद्देशून शेवटचे दोन शब्द काढले होते. ते शब्द ‘ना छोडनू असे होते. नेपाळी भाषेतील या शब्दांचा अर्थ ‘दुश्मनांना सोडू नका असा होता. २४ वर्षांच्या मनोज पांडे यांना मरणोपरांत ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या युद्धात ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या प्लाटूनबरोबर ‘टायगर हिलवर हल्ला केला होता. त्यांनी ‘टायगर हिलवरती भारताचा तिरंगा फडकवला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. १३ जॅक रिफच्या सिपाही संजय कुमार यांना ‘पॉईंट ४८७७वर जाण्याचा आदेश मिळाला. संजयकुमार यांनी पाकिस्तानी सैन्यावरती जोरदार हल्ला करून तीन जवानांना यमसदनी धाडले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे.
या युद्धात अनेक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले होते. त्यात मेजर डी. पी. सिंग यांना गंभीर जखमी झाल्यानंतर आपला एक पाय गमवावा लागला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते आजही कृत्रिम पाय लावून धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असतात. ते भारताचे अग्रणी ‘ब्लेड रनर म्हणून ओळखले जातात. गंभीर जखमी झाल्यानंतर अवयव गमावलेले अनेक जवान आहेत. तरीही आपल्या अपंगत्वावर मात करत ते जीवन जगत आहेत.
तरूण अधिकारी आणि शुर जवानांचे युद्ध
कारगिल युद्ध हे तरूण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शुर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. शहिद झालेल्या अधिकार्याची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धीमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले.
या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मु आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ सिख रेजीमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. मोठा पराक्रम गाजवल्याने या तुकड्यांचा ‘युनिट सायटेशनने गौरविण्यात आले.
आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्याप्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.
— ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)
Leave a Reply