कर्म, योग, दान नव्हे
एकाच बैठकीतले
पक्ष सारे आता
वेगळ्या चरणातले
थोर बनूनी चोर व्हावे
ऐसी बुद्धी का दिसे
अखेर कर्म व्हावे ते
शिकवावे लागते
अर्थ–
चांगल्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत नाहीत, अथवा आता मिळणं फार कठीण असते. काळ बदलला, जग बदललं, रहाण्याची पद्धत बदलली पण लोकांच्या गरजा काही बदलल्या नाहीत. गरज भागवणारे गब्बर झाले पण ज्यांना सुख सोयी मिळायच्या अशा वर्गाला अजूनही त्यातले काही गवसले असे दिसत नाही. सामान्य माणूस मात्र यात वेगळा ठरतो, देशावर काही संकट आले की सामान्य माणसाने दान करायला हवे, असे सांगितले जाते. देशावर आर्थिक संकट आले की सामान्य माणसाने त्याच्या उत्पन्नातील योग्य हिस्सा देशाच्या तिजोरीत भरावा असे नियम काढले जातात. पण जेव्हा एखाद्या रहीज व्यक्तीच्या मालमत्तेचा आढावा गरज असताना मागितला जातो तेव्हा मात्र त्याची दानी, योगी, चांगली वृत्ती ही काळ्या कलुषित काळा प्रमाणे बदलते आणि तेथेही सामान्य माणसाच्या डोळ्यांत अंजनाच्या ऐवजी शेण घातले जाते. त्यामुळे कर्म, योग आणि दान या गोष्टी आता हातात हात घालून नाही तर तंगडीत तंगडी अडकवून बसलेल्या दिसतात.
जितके मोठे व्हावे तितके वाईटपण भोगावे म्हणतात ते खोटे नाही, पण त्यातूनही मार्ग काढता येतो. पण म्हणतात ना की जिथे जमिनीत विषच पेरले तिथे येणारं पीक हे पोषक घटक घेऊन येणारे कसे असेल? इथे अक्कल यावी नाही तर ती संस्कारांनी आणावी लागते आणि जिथे संस्कार वाईट तिथे भविष्याच सोनं नाही तर मातीच होणार.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply