शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची. रेवसच्या धक्क्यावर उतरताच घेतलेली नारळाची चिक्की तोंडात टाकून चघळता चघळता लाँच टाईमिंगला आलेली बस पकडायला लागायची . सारळचा समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावरून दामटवलेली बस कोप्रोली गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा असेलल्या डेरेदार वृक्षांच्या सावलीतून काही क्षणातच मांडवा दस्तुरीच्या स्टॉप वर मधले स्टॉप घें घेत पोचायची. तेव्हा फोन वगैरे काही नसल्याने अचानक समोर आलेली नातवंड बघून नानी घरातून पाण्याची वाटी घेऊन यायच्या आणि अंगावर ओवाळून काढायच्या. नानींचा मायेचा हात आमच्या नातवंडांच्या अंगावर फिरताना त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू बघून बाल मनाची घालमेल व्हायची. सगळी नातवंडे जमा झाल्यावर सकाळी सकाळी रस्त्यावरून सायकल घेऊन जाणारा बुधीराम पाववाला सायकलची घंटी वाजवत अंगणात यायचा. आम्ही बारा नातवंडं जशी फर्माईश करतील तशी नानी त्याच्याकडून पाव, खारी, टोस्ट, बटर, सामोसा खारी आणि नानकटे यांची पाकीट घेतली जायची. तो गेल्यावर दूध, दही, ताक आणि शेतातला भाजीपाला घेऊन गावातल्या बायका यायच्या नानी अंगणात कोणी येईल त्यांच्याकडून काही ना काही घेतच राहायच्या. गावातल्या कोळणी त्यांच्या डोक्यावरील मच्छीची पाटी नानींनी काही घेवो न घेवो पण आमच्या अंगणात खाली उतरवून ठेवायच्या, एकदा पाटी खाली उतरवली की नानी काही घेतल्याशिवाय कोळणींना जाऊ देत नसतं याची खात्री असायची. बोंबील, मांदेली, पापलेट, कोलंबी आणि माकल्या यापैकी दोन तीन प्रकार रोजचे ठरलेले. कोणाचा उपास नाही की तापास नाही. संपूर्ण सुट्टीत कैऱ्या किंवा चिंच टाकून केलेले आंबट कालवण आणि तव्यावर खरपुस तळलेली मच्छी हा रोजचा मेनु.
आई बाबा, मामा मामी, मावशी सोडण्यासाठी आल्यावर दोन चार दिवस जे काय राहत असतील तेवढेच. आम्हाला सोडुन गेल्यावर आम्ही दहा किंवा बारा नातवंड आणि आमचे नाना नानी एवढेच दीड ते दोन महिने एप्रिल आणि मे संपेपर्यंत एकत्र. सकाळी ज्याला जाग येईल तसं उठणार, कोणी उठवायला नाही की अजून किती वेळ झोपणार असं विचारून कटकट करणारे कोणी नाही.
मांडव्याला एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सगळे जमा व्हायचे तोपर्यंत आंबे पिकायला नुकतीच सुरवात झालेली असायची. जांभळे संपायला आलेली असायची मोजक्याच झाडांवर तुरळक तुरळक राहिलेली मिळायची. मांडव्याच्या घरासमोर टेकडी आहे. आमच्या शेतावर गेलो की तिथूनच टेकडीवर जायला वाट होती. या वाटेवरून टेकडीवर चढायला सुरवात केली की करवंदांच्या असंख्य जाळ्या लागायच्या. करवंदांची झाडे झुडपासारखी आणि काटेरी असल्याने त्यांना करवंदिच्या जाळ्या बोलले जाते. हिरव्या, तांबड्या, लाल आणि काळ्या करवंदांनी या जाळ्या अक्षरशः लगडून जातात. हिरव्या पानांच्यात उठून दिसणारी कच्ची, पिकायला आलेली, अर्धी पिकलेली आणि पूर्ण पिकून काळी कुळकुळीत झालेली करवंदे बघितली की तोंडाला पाणी सुटायचे. आंबट, गोड, कडू वेगवेगळ्या जाळीतील आणि वेगवेगळ्या चवीची करवंदे खात खात टेकडीवर पायपीट करायला मज्जा यायची. काही काही करवंदे तर इतकी चमकदार आणि चवीला चांगली असतात की हात पोचला नाही तरी काट्यांची पर्वा न करता आत जाळीत घुसायला पण काही वाटायचे नाही. झाडावरून खुडायची आणि सरळ तोंडात टाकायची. करवंदे तोडल्यावर येणारा पांढरा चीक आणि त्यांच्या बिया सगळं खाताना चुईंग गम खातोय असे वाटायचे. ताजी करवंदे मनसोक्त खाता खाता पक्षांचा किलबिलाट, मध्येच एखाद्या सापाचे पाला पाचोळ्यावर सळसळणे ऐकू यायचे. जाताना पायवाटे वर मधूनच आडव्या जाणाऱ्या बैलगाडीच्या रस्त्यावर असलेल्या धुळीचा पायाने धुरळा उडवीत चालणे. वर टेकडीवर असलेल्या नानांच्या जागेत एक रांजणाचे मोठे झाड आहे त्यावर चढून दोन चार पिकलेली पिवळी रांजण शोधून खायची. टेकडीवरून थळ प्रकल्प, झाडांच्या गर्दीतून दिसणारा अलिबाग रेवस रस्ता, हाशिवरा आणि मांडव्याच्या पांढऱ्या शुभ्र आणि आकाशाला भिडणाऱ्या उंच चिमण्या,संपूर्ण मांडवा गांव बघायला मिळते. या सगळ्या मोहक दृश्यात लक्ष वेधून घेणारा अथांग समुद्र आणि त्यावर पसरलेली संध्याकाळची सोनेरी किरणे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply