नवीन लेखन...

कासवचाल

‘रोजची पहाट’ या लोकप्रिय दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट श्री. सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख वार्ताहर, मुलाखतज्ञ श्री. काका सरधोपट यांची फार आतुरतेने वाट पाहत होते. कुणाचीही आणि कसलीही मुलाखत असो तिची चुटकसरशी वाट लावण्यात म्हणजे आटोपण्यात काकांचा हातखंडा होता.

सध्या ऐरणीवर असलेल्या धडाकेबाज ज्वलंत समस्येवर साधकबाधक चर्चा करणारा असा एक धडाकेबाज दिवाळी विशेषांक काढायची सूर्याजीरावांची योजना होती. या विशेषांकासाठी पाणीपुरवठा, वीजपुरवठा, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या खात्याचे मंत्री माननीय खुशालरावजी कोरडे यांची मुलाखत घ्यायचं काम त्यांनी काकांवर सोपवलं होतं. ही मुलाखत म्हणजे ‘रोजची पहाट’ दिवाळी अंकाचं तारांकित आकर्षण म्हणजे ‘स्टार अॅक्ट्रॅक्शन’ होतं. विशेषांकाची तयारी पूर्ण होत आली होती. फक्त मुलाखतीचं घोडंच पेंड खात बसलं होतं. दिवाळी तोंडावर आली आणि चुटकीसरशी मुलाखत गुंडाळणाऱ्या काकांचं काम कुठे अडलं ते समजत नव्हतं. काकांना वरचेवर विचारून ते थकले. आज काका येताच काय तो सोक्षमोक्ष लावायचाच या विचाराने त्यांना पुरतं घेरलं. काका आल्या आल्याच त्यांना फैलावर घेतलं!

“काय काका? कधी मिळणार आहे तुमची मुलाखत? विशेषांकांचं काम अडून पडलंय. आज काय ते फायनल सांगा.”

“साहेब, त्या खुशालरावांच्या मुलाखतीसाठी जंग जंग पछाडलं पण गडी गावतच नाही. सारखा आपला हिंडत असतो. शेवटी आज गाठलंच त्यांना. उद्या सकाळी फक्त दहा मिनिटांची वेळ दिली आहे. उद्या दुपारीच तुमच्या हातात ठेवतो मुलाखत!”

“वा वा! फार छान ! म्हणजे दिवाळीचा मुहूर्त मिळतोय तर, वा वा! चला लागा कामाला!”

दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्या वेळी काका मंत्र्यांच्या बंगल्यावर हजर झाले.

त्यांचे स्वीय साहाय्यक श्री. सदासुखी यांनी त्यांचं स्वागत केलं.

“बसा काका, साहेब येतातच तयार होऊन. मात्र त्यांना फार वेळ नाही. मोठ्या मुश्किलीने तुमच्यासाठी दहा मिनिटं दिली आहेत. माहीत आहे ना?” “हो हो साहेब. अहो, दहा मिनिटं मला खूप आहेत. धन्यवाद.”

तेवढ्यात पांढरेशुभ्र कडक कपडे, डोक्यावर पांढरी कडक टोकदार टोपी, मजबूत कोल्हापूरी वहाणा अशा वेशातले खुशालरावजी मिशांना पीळ भरतच बाहेर आले. आल्या आल्या म्हणाले, अरे सदासुखी, माझा नाष्टा इकडेच पाठव. नाष्टा करता करताच या काकांशी बोलतो. मला नंतर लगेचच हॉटेल ताजमध्ये ‘अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळ निवारण’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादाच्या उद्घाटनाला जायचंय. चला आटपा!”

“बरं साहेब, पाठवतो.” म्हणून सदासुखी आत गेला आणि क्षणातच साहेबांचा नाष्टा बाहेर आला. दोन डब्बल आम्लेट्स, दोन जंबो वडा पाव, पेटभर कोंबडी-वडे, अर्धा डझन उकडेली अंडी. मस्का स्लाइसची चळत, भलामोठा मग भरून दूध, असा भरगच्च नाष्टा आला. तो नाष्टा पाहूनच काकांच्या पोटात कोकलणारे कावळे गप्प बसले. काका म्हणाले, “साहेब, मला काही नको नाष्टाबिष्टा.”

“काका, अहो हा माझा नाष्टा आहे. तुमच्यासाठी येतोच आहे.” खानसाम्याने काकांच्या समोर एक कपभर चहा आणि चार मारी बिस्किटं ठेवली. बिसलेरीच्या बाटल्याही ठेवल्या.

खुशालरावजींनी दोन अंडी जबड्यात सारली आणि म्हणाले, “हां काका, करा” सुरू!”

“साहेब, सध्या पाणीटंचाई, वीजटंचाई, महागाई यामुळे जनता अगदी टेकीला आली आहे. यावर आपलं सरकार काही ठोस उपाययोजना करणार आहे, असं ऐकतो, खरं आहे का ते?”

“खरं म्हणजे? आक्षी शंभर टक्के खरं आहे. आम्ही अशा काही योजना आखल्या आहेत की, ही वीजटंचाई, पाणीटंचाई, महागाईं कायमचीच संपून जाईल.”

“काय सांगता साहेब? जे आजवर कुणाला जमलं नाही ते आपण कसं करणार?

“काका, खरं सांगायचं तर ही पाणीटंचाई, वीजटंचाई, महागाई हे या प्रसिद्धी माध्यमांनी उठवलेलं भूत आहे. त्यांना छापायला आणि दाखवायला काहीतरी लागतं, मग देतात झालं उठवून नाही नाही त्या बातम्या. स्वत: मात्र घरीदारी, बाहेर मस्त चमचमीत खातात-पितात तेव्हा त्यांना नाही दिसत ही टंचाई आणि महागाई?”

“म्हणजे असा काही प्रश्नच नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला?”

“काका, माझं म्हणणं इतकचं आहे की, काही समसया असतील, नाही असं नाही, पण इतकं ऊर बडवून घेण्याइतकंही काही नाही. शिवाय जर काही असेलच तर आमची योजना अमलात आली की टंचाई, महागाई औषधापुरतीही शिल्लक राहायची नाही.”

“वा! फारच छान काहीतरी अद्भुत दिसतेय आपली योजना. जरा समजावूनच सांगता का?”

कोंबडीवड्याचा बोकणा भरून साहेब म्हणाले, “काका, सर्वप्रथम आम्ही ही दारिद्रयरेषेची जी काही भानगड या आमच्या विद्वान पंडित सचिव मंडळींनी करून ठेवली आहे ना, ती अगदी पार मुळापासूनच पुसून टाकणार आहोत.”

“ती कशी साहेब?”

“काका, दारिद्र्यरेषा, दारिद्र्यरेषा म्हणतात ती तुम्ही आम्हाला दाखवाल का?

आम्ही एवढे राज्यभर फिरतो, देशभर फिरतो, परदेशातही फिरून आलो पण कुठेही आम्हाला अशी रेषा सापडली नाही. आम्ही आमच्या विद्वान पंडितांना म्हणालो दाखवा पाहू ही तुमची दारिद्र्यरेषा?”

“मग? काय महणाले ते?”

“अहो, मुळातच ती म्हणे एक काल्पनिक रेषा आहे ! तर ती दाखवतील कशी? दरवर्षी म्हणे आर्थिक आढावा घेऊन जनतेचं किमान उत्पन्न ठरवतात. किमान वेतन ठरवतात आणि त्या किमान मर्यादेखाली ज्यांचं वेतन, उत्पन्न असतं ते म्हणे दारिद्र्यरेषेखाली असतात! म्हणजे सगळा अंदाजपंचे कारभार ! नुसती आकडेमोड! मग आम्ही ठरवलं की, हे जे किमान वेतनाखाली, किमान उत्पन्नाखाली लोक आहेत ना, त्यांचं किमान वेतन, उत्पन्न कागदावर दारिद्र्यरेषेच्या वरच आणून ठेवायचे! मग कशी राहील ही दारिद्र्यरेषा आणि दारिद्र्य?” साहेबांनी एक जंबो वडा दाढेखाली सारला!

“काय काका? मग कशी राहील ही गरिबी? अहो, सगळंच जर इथे काल्पनिक तरही दारिद्र्यरेषा ठेवून आपणच आपल्या पायावर कशाला धोंडा पाडून घ्यायचा? ही विद्वान मंडळींची चाल आम्ही त्यांच्यावरच उलटवणार आहोत! अहो, विद्वान आपलेच, आकडे आपलेच, जनताही आपलीच, मग हे दळभद्री दारिद्र्याचं लक्षण हवंच कशाला? त्यामुळे काय झालं की या दारिद्रयरेषेखाली असणाऱ्यांना फुकटच सवलती देत बसावं लागतं. म्हणजे आ बैल मुझे मार असं नाही का होत? तेव्हा आमचं पहिलं पाऊल म्हणजे ही दारिद्र्यरेषाच पुसून टाकायची!”

काकांच्या डोळ्यांसमोर दारिद्र्यरेषा जमिनीवरून वर उचलली आहे आणि धुण्याच्या दोरीसारखी टांगून तिच्यावर गरीब जनतेची पांढरीशुभ्र वस्त्रं कांजी करून वाळत घातली आहेत असे रम्य दृश्य दिसू लागलं! आपल्या टिपणीत त्यांनी या मुद्यावर एक झकास व्यंगचित्र टाकायची सूचना लिहून ठेवली. ते म्हणाले,

“वा! साहेब आपणतर कमालच केलीत! एका फटक्यात दारिद्र्यरेषा काढायची! पण ती कशी?”

“काका, मुळातच ही दारिद्र्यरेषेची कल्पना हे आमच्या विद्वान सचिव मंडळींनी वातानुकूलित खोल्यांत बसून काढलेलं झेंगट आहे. त्यांच्या या अशा उपद्व्यापांमुळे आमची अडाणी जनता आज इतकी वर्ष उगाच दारिद्र्यरेषेखाली राहिली. छे छे ! हे आता चालणार नाही.” साहेबांनी असं म्हणून दुसरा जंबो वडा तोंडात कोंबला!

“काका सगळी जनता दारिद्र्यरेषेवरच आणून ठेवतो मग कशी राहील महागाई? टंचाई?”

“वा साहेब, दरिद्रीच जनता राहिली नाही तर महागाई, टंचाई कशी राहणार? हे म्हणजे रेल्वेच्या थर्ड क्लास प्रवाशांना थर्डक्लासची एक रेघ पुसून रातोरात थर्डक्लासमधून एकदम सेकंड क्लासचा दर्जा देण्यासारखंच क्रांतिकारक पाऊल म्हणायचं!”

“हो ना. काका, समस्येच्या मुळाशी गेल्याखेरीज नुसती कागदपंची करण्यात काय कौशल्य?”

“साहेब, ही दारिद्र्यरेषा पुसलीत हे ठीकच आहे, पण जनतेचं किमान उत्पन्न? वेतन? ते कसं वाढवणार? त्यासाठी पैसा नाही का लागणार?”

“काका, त्यासाठी फारच सोपा उपाय आहे आमच्याकडे.”

“म्हणजे ही दारिद्र्यरेषा पुसण्यासारखंच काहीतरी क्रांतिकारक पाऊल आहे का?”

“होय काका. एका डॉलरला आपण पन्नास रुपये मोजतो. एका पौंडाला ऐंशी रुपये मोजतो. एका युरोला सत्तर रुपये मोजतो, का? आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत ना? मग आमच्या रुपयाचं मोल आम्ही ठरवणार! आम्ही एक रुपयाची किंमत एक डॉलरच करून टाकू! म्हणजे आमचं किमान उत्पन्न जर शंभर रुपये असेल तर ते एकदम पाच हजार रुपये होणार!”

“काय सांगता? पण हे कसं शक्य आहे? रुपयाचं मूल्य असं एकदम कर्स वाढवता येईल? त्याला मान्यता नको?”

“मान्यता? कसली? कुणाची?”

“म्हणजे साहेब, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी? रिझर्व्ह बँक? जागतिक बँक, इत्यादींची…”

“छे छे ! काका, अहो हा आमचा घरगुती मामला आहे. आम्ही सार्वभौम आहोत.

आमच्या रुपयाची किंमत ठरवणारे हे कोण टिकोजीराव?” या मुद्यावर काका आपल्या टिपणीत अंधेर नगरी चौपट राजा’ अशी नोंद करतात. उघडपणे म्हणतात,

“वा वा! साहेब, आपण धन्य आहात. एवढा सोपा आणि जालीम उपाय आजवर कसा कुणाला सुचला नाही? यू आर ग्रेट! साहेब, पाणीटंचाई, वीजटंचाई यांवरही आपली अशीच काही अफलातून योजना आहे का?”

“काका, प्रथम पाणीटंचाईकडे वळतो. इकडे शहरी भागात ही समस्या फारशी नाही. ग्रामीण भागात मात्र तिचं प्रमाण फार गंभीर आहे, असं हे आमचे विद्वान आणि प्रसिद्धीवाले म्हणतात.”

“म्हणजे हादेखील मीडियाने निर्माण केलेला फंडा आहे वाटतं?”

“होय काका. पाणीटंचाई असा मुळात काही प्रकारच नाही. पिढ्यान् पिढया ग्रामीण जनता दुष्काळाशी सामना करत आली आहे. ती खरं तर तिची जीवनपद्धतीच आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असणं हे काही नवीन नाही. या दिवसांत लांबलांबून पाणी आणणं हे काही वेगळं नाही. उलट उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीची कामं नसतात तेव्हा अख्खा दिवस काय करायचं? त्यावेळी घरच्या बायकापोरांना हे एक चांगलं काम असतं. रिकाम्या चकाट्या पिटण्यापेक्षा ते बरं नाही का? शिवाय या पारंपरिक जीवनशैलीला आम्ही सांस्कृतिक कामाची जोड देणार आहोत.”

“वा! ती कशी काय?”

“काका, आम्ही गावपातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी अशा पातळ्यांवर ‘पाणी मॅरॅथॉन स्पर्धा’ आणि ‘पाणीगान स्पर्धा आयोजित करणार आहोत.”

“वा! ती कशी?”

“पाणी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्या गावच्या महिला जास्तीत जास्त अंतरावरून पाणी आणतील त्यांना आम्ही गावराणी, तालुकाराणी, जिल्हाराणी असे पुरस्कार देणार आहोत. शिवाय जी गृहिणी जास्तीत जास्त हंडे आणि कळशांची उतरंड डोक्यावरून आणेल तिला जिल्हा महाराणीचा मुकुट देणार आहोत.”

“वा! फारच छान! पाणीगान हा काय प्रकार असेल?”

“तो ना? काका अलीकडे दूरदर्शनवर ते असते ना? ‘सारेगामा का?” तसाच एक ‘साऱ्या मामी ‘गा’ अशा गाण्यांच्या स्पर्धांचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यात जे महिला पथक न थकता ग्रामीण गीतं, लावण्या, ओव्या, सिनेमाची गाणी अशी कोणतीही गाणी गाऊन दाखवतील आणि पाणी घेऊन येतील त्यांना पाणीगान ललना पथकाचा किताब देणार आहोत. शिवाय त्या सर्वांना दूरदर्शनवर जिवंत म्हणजे लाईव्ह प्रसिद्धी देणार आहोत. शिवाय पथकातल्या सर्व ललनांना तासा तासाला एकेक बिसलेरी बाटली पाणी प्यायला मिळेल.”

“वा! फारच अद्भूत! आपण तर या तथाकथित पाणीटंचाईचं एक अत्यंत उत्साही सांस्कृतिक कार्यात परिवर्तन घडवून आणणार तर?”

“होय काका, याशिवाय उन्हाळ्याच्या चार महिन्यांत आम्ही माणशी दोन बाटल्या बिसलेरी पाणी रोज देणार आहोत. ते गावच्या चावडीत मिळेल.”

“वा! वा! हे झालं पिण्याच्या पाण्याचं, पण रोजच्या आंघोळीचं काय?”

“काका, दुष्काळात रोज दोन घोट पिण्याचं पाणी मिळणं मुश्कील तिथे आंघोळीचं काय घेऊन बसलात? तरीही कमीत कमी पंधरा दिवसांतून एकदा त्यांना अंघोळ करता येईल अशी आमची योजना आहे.”

“काय आहे ती?”

“तिला आम्ही ‘तालुका कुंभ’ आणि ‘जिल्हा कुंभ’ योजना अशी नावं दिली आहेत.”

“काय आहेत या कुंभ योजना?”

“काका, सध्या गावोगावी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्याऐवजी आम्ही हे पाणी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावी मोठेमोठे हौद बांधून त्यात टाकणार. प्रत्येक गावाला पंधरा दिवसांतून एकदा या हौदात म्हणजे कुंभात अंघोळीला जाता येईल. ती त्या पंधरवड्याची कुंभ यात्रा असेल. स्थानिक देवाचं नाव त्या कुंभाला देऊ. जसं म्हसोबा कुंभ, भैरोबा कुंभ, मरिआई कुंभ वगैरे वगैरे.”

“वा साहेब! आपल्या एकेक कल्पना आणि योजना फारच अफलातून क्रांतिकारक आहेत. वीजटंचाईवरसुद्धा आपली अशीच काही अभिनव योजना आहे का?”

“काका, मुळात वीजटंचाई ही ग्रामीण जनतेची समस्याच नाही. त्यांचे सर्व व्यवहार सूर्योदय ते सूर्यास्त या काळात चालतात. फारच झालं तर क्वचित तमाशा, तंबूतला सिनेमा, बस संपलं. त्यासाठी थोडे कंदिल, बत्त्या दिल्या की झालं. अगदीच फार वाटलं तर ही मंडळी जीवाची मुंबई करायला शहरात येऊ शकतात. शहरात मात्र लोक रात्री-बेरात्री कामं करतात. त्यांना विजेचा पुरवठा लागतो. शिवाय आम्ही सरकार चालवतो ते शहरात बसूनच. तेव्हा शहरात वीज पाहिजेच.” खुशालरावांनीच आमलेटचा भला मोठा तुकडा एका घासातच घशाखाली ढकलला.

“साहेब, आपल्या योजना पाहता आपण पुन्हा मध्ययुगाकडे वाटचाल करत आहात, असं नाही का वाटत?”

“काका, हा वाटण्या न वाटण्याचा प्रश्न नाही. आपण आपले हातपाय पाहूनच अंथरूण पसरावं. ‘पी हळद आणि हो गोरी’ हे धोरण शेवटी आपल्यालाच भारी पडणार. हे परवडण्यासारखं नाही. सगळं कसं हळूहळू, बेताबेताने, आपली ताकद पाहून करावं ते खरं.”

“साहेब, ते एकाअर्थी खरं आहे, पण हे हळूहळू, बेताबेताने करीपर्यंत सगळं जग फार पुढे जाईल त्याचं काय?”

“जाऊ दे, ज्यांना जायचं त्यांना. आम्ही कासवाचा आदर्श मानतो. हळूहळू पण अंतिम विजय आमचाच होणार याची आम्हाला खात्री वाटते.” साहेबांनी उरलेले कोंबडी-वडे मटकावले.

“साहेब, आपले विचार फारच क्रांतिकारक आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याची आणि जनतेच्या प्रगतीची ‘कासवचाल’ अशीच चालू राहो. अशी सदिच्छा व्यक्त करून ‘रोजची पहाट’तर्फे आपले आभार मानतो.

“धन्यवाद! या!”

काकांचा विचार साहेबांच्या मागोमाग ‘ताज’मध्ये जाऊन त्यांच्या ‘अन्नधान्य टंचाई आणि महागाई’ परिसंवादाच्या उद्घाटनचा रिपोर्ट करावा आणि त्यानंतर ताजमध्ये होणाऱ्या पार्टीत आपल्या पोटातल्या कावळ्यांना शांत करावं असा होता, पण मुलाखतीची वाट पाहात बसलेल्या सूर्याजीरावांचा चेहरा डोळ्यांसमोर येताच त्यांनी आपला मोर्चा ‘रोजची पहाट’कडे वळवला.

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..