ऍपल व्हॅलीकडे वळणारी आमची बस अचानक थांबली .
आणि बसमध्ये शांतता पसरली .
चेष्टा , मस्करी , गाणी आणि गप्पा एकदम थंडगार पडल्या .
हृदय थांबल्याचा क्षणभर भास झाला .
चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस , या दुर्दैवी दिवसाची अचानक आठवण झाली .
आम्ही त्याच रस्त्यावरून निघालो होतो , ज्या रस्त्यावर आत्मघातकी अतिरेक्यांनी , शूर जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर , स्फोटकांनी भरलेली कार आदळवली होती आणि चाळीस जवान हुतात्मे झाले होते .
माझ्या मनात क्षणार्धात सगळा प्रसंग उभा राहिला आणि मायनस तीन इतकं तापमान असूनही घामानं भिजायला झालं . कारण आम्ही बसच्या दाराजवळच्या सीट वर बसलो होतो . आणि बस अचानक थांबवली गेली होती .
सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं .
कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती .
काश्मिरच्या जनतेला आणि येणाऱ्या पर्यटकांना संरक्षण देण्याचा हेतू असावा असेही वाटले होते .
पण ऍपल व्हॅलीकडे वळणारी बस अचानक थांबली आणि …
अमृता ट्रॅव्हल्स च्या अजित करंदीकर यांचा उत्साह अमाप होता .
त्यामुळे ऍपल व्हॅली आपण पाहायची आहे , तिथे सफरचंद नसतील पण तिथलं सौंदर्य बघायला मिळेल . हे आणि असं काही काही सांगून त्यांनी आमची उत्सुकता नेहमीप्रमाणे वाढवली होती . त्यांची नेहमीची कॉमेंट्री सुरूच होती . ” रस्त्याच्या या बाजूला हे चिनार आहेत . त्या बाजूला अक्रोड आहेत . आता समोर बघा , हायवे एकदम चकाचक आहे …”
पण बस अचानक थांबली . आणि त्यांची कॉमेंट्री पण थांबली .
श्वास अडकला .
काही क्षणच .
पण तितक्यात काही सैनिक आमच्या बस जवळ आले .
” तुम्ही व्हॅली त जाऊ नका , सगळी परिस्थिती धोकादायक आहे . अतिरेक्यांनी टुरिस्टना टार्गेट करायची धमकी दिली आहे आणि आम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे . तेव्हा हायवे वरून सरळ पुढे चला .”
त्यांनी चक्क आम्हाला ऑर्डर दिली .
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि व्हॅलीचा नाद सोडून आम्ही पुढे निघालो .
बसमधून दिसणारं काश्मीरचं निसर्गसौंदर्य पाहताना ‘ त्या दहा पंधरा मिनिटांचं ‘ बहुधा सर्वांना विस्मरण झालं .
पण माझ्या मनात नेमकी तीच दहा पंधरा मिनिटं उलट सुलट होऊन घुसत राहिली .
ते जवान देवदूतच वाटले त्याक्षणी .
आणि त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटला .
बस निघताना मी त्या जवानाला नमस्कार केला .
तो जवानसुद्धा आमच्याकडे बघून निरोपादाखल हात हलवित होता . त्याही स्थितीत त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान मला पहायला मिळालं .
आणि मन भरून आलं .
देवाचे आणि जवानांचे आभार मानत आम्ही पुढे निघालो …
किती विलक्षण होतं सगळं .
खरं म्हणजे काश्मीर मध्ये प्रवास करताना , निसर्गसौंदर्य पाहताना दोन डोळे देखील अपुरे वाटतात .
पण आज मला काही वेगळंच जाणवत होतं .
मी गप्प गप्प होतो .
सगळ्यांना वाटत होतं की माझी तब्येत बरी नाही , म्हणून मी गप्प होतो . काही अंशी ते खरं होतं .
पण मला मात्र , प्रत्यक्ष दिसणाऱ्या काश्मीरपेक्षा अबोल काश्मीरचं रूप जाणवत होतं . म्हणून मी गप्प होतो .
– पण हे फार पुढचं झालं .
– मुंबईहून श्रीनगरला विमानाने जाताना सहप्रवाशांपैकी आम्हा नऊ जणांना जम्मूत उतरावं लागलं .
त्याचं कारण वेगळंच होतं .
ते पुढच्या भागात सांगतो …
पण काश्मिरची एक वेगळी जाणीव जम्मूमध्ये उतरताना झाली , हे नक्की !
( क्रमशः)
– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
Leave a Reply