नवीन लेखन...

काश्मीर एक जाणीव – भाग दोन

बरं झालं आम्ही जम्मुच्या विमानतळावर उतरलो !

तिथे सहप्रवाशांपैकी आम्ही नऊच जण उतरलो .
कारण मुंबईहून थेट श्रीनगरला जाण्याची तिकिटे उपलब्ध नव्हती . मग अगोदर जम्मू आणि तिथून दुसऱ्या विमानाने श्रीनगर असा पर्याय उपलब्ध होता . तो आम्ही स्वीकारला .
उतरल्यावर कळलं की पंचवीस मिनिटांच्या पुढच्या प्रवासासाठी आम्हाला फक्त साडेतीन तास थांबावं लागणार होतं .

असं थांबणं म्हणजे माझ्या दृष्टीनं पर्वणीच असते .
आणि झालंही तसंच .
सगळे गप्पागोष्टीत रमले .

पण हे पुढचं .

चेकिंगच्या वेळी मला घाम फुटला होता .
दोन्ही गुडघ्यावर चेकिंग करताना बझर वाजत होता . आणि चेकिंग करणाऱ्या पोलिसाची नजर संशयास्पद होत होती .
शेवटी न राहवून तो मला म्हणाला ,
“आपने वेपन छिपाया है , निकालो .”
आणि हे तो एवढ्या मोठ्यांदा म्हणाला की जवळचे दोन पोलिस धावत माझ्याकडे आले .
मी न बोलता हात वर करून थांबलो .
त्यातल्या एकाने गुडघ्यावर असणाऱ्या दोन्ही नी कॅप ओढून काढल्या .
मी गुडघ्याच्या ऑपरेशन बद्दल सांगितलं . त्याबद्दलचं डॉक्टरांचं सर्टिफिकेट दाखवतो म्हणालो .
पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते .
शेवटी त्यांनी नी कॅप मधल्या मेटलच्या पट्ट्या ओढून काढल्या आणि ते हसायला लागले .
” सॉरी अंकल .” म्हणून मला सोडून दिलं .
पण त्या तेवढ्या काळात मला तेहतीस कोटी देव आठवले .
त्यांची धारदार नजर , कोरडी पण दमात घेणारी भाषा आणि चिकित्सक वृत्ती तिथल्या थंडीत घाम फोडणारी होती .

नंतर माझ्या लक्षात आलं .
ही इतकी सावधानता आहे म्हणून तर आपण सगळे जिवंत आहोत .
ते त्यांचं कर्तव्य करतात .
थोडा त्रास आपल्याला होतो खरा पण देशहिताच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक आहे …

मी बसण्यासाठी वळलो आणि पहात राहिलो .
माझ्या पाठी रांगेत उभ्या असणाऱ्या या माणसाला आपण कुठेतरी पाहिलं आहे , असं जाणवलं .
म्हणून थोडावेळ उभा राहिलो . नीट पाहिलं .
आणि त्या माणसाचं चेकिंग , सगळं सामान उलगडून दाखवण्याची केलेली सक्ती , त्याचा निराश आणि पडेल चेहरा बघून नाचावंसं वाटलं .
कारण एकेकाळी याच माणसानं सगळ्या काश्मीरला वेठीला धरलं होतं .
मनमानी राज्यकारभार केला होता . आजूबाजूला शेकडो कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोलिसांना , सैनिकांना न जुमानता गुर्मीत वावरला होता तो . रोशनी ॲक्ट सारखा भयंकर कायदा करून , काश्मिरी पंडितांना हुसकावून लावण्याचा ज्यानं प्लॅन केला , तोच आज बदलत्या परिस्थितीत केवळ एका पीएला घेऊन पोलीस सांगतील तसं वागत होता .

फारुक अब्दुल्ला होता तो .

मी मनातल्या मनात खूप हसलो .
* * *
– आता मात्र आम्हा सगळ्यांना चहाची तीव्र तल्लफ जाणवू लागली होती . सगळे विमानतळावरच्या स्टॉल कडे वळले .

मी पहात राहिलो .
पुन्हा पुन्हा पहात राहिलो .

स्टॉलवर ताजा चहा करून देण्यासाठी चक्क एक काश्मिरी तरुणी उभी होती .

मी पहात राहिलो .

ती आम्हाला ताजा चहा तयार करून देत होती .
इतर स्टॉल प्रमाणे थर्मास मधला चहा देत नव्हती .

चहा करतानाची तिची ती लगबग .
तिची अदब.
हालचालीतील लय .
हसण्यातलं मार्दव .
चहा देताना प्रकट होणारं आदरातिथ्य .
आणि सात्विक भाव जागृत करणारं , गुलाबी छटा असणारं काश्मिरी सौंदर्य …

मी जिथे बसलो होतो तिथे संतोषनं मला चहा आणून दिला .
पण माझं लक्ष त्या काश्मिरी तरुणी कडे होतं.
सगळ्यांना चहा दिल्यावर ती अगदी अलिप्तपणे , खाली मान घालून उभी राहिली .

– आणि कुणाला न जाणवणारी एक गोष्ट मला जाणवली .

तिच्या डोळ्यात कारुण्य होतं.

कदाचित तो स्टॉल तिचा नसावा .
कदाचित ती तिथे नोकरी करीत असावी .
कदाचित पोट भरण्यासाठी , सुरक्षित ठिकाणी काम करण्यासाठी मजबूर झालेली एखादी काश्मिरी पंडितापैकी तरुणी तर नसावी …?

— काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती . त्यांना सोसाव्या लागलेल्या नरकयातना , अत्याचार , सामुहिक बलात्कार आणि स्त्री देहाची विटंबना करून झाल्यावर अत्यंत क्रूरपणे त्यांचे केलेले तुकडे , हिंसाचार …

चहा करून देणाऱ्या त्या अभागी भगिनीच्या डोळ्यातून पाझरणारं आणि सहसा न दिसणारं कारुण्य …
का कुणास ठाऊक , मला जाणवलं .
मी तिला आणि तिच्यासारख्या असंख्य भगिनींना मनोमन नमस्कार केला .

जम्मूत विमान थांबल्यावर आम्ही उतरलो .
तेव्हा मी काहीसा रेंगाळलो होतो .
खाली वाकून मी तिथली धूळ मस्तकी लावली .
तीन कारणांसाठी .
डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी .
काश्मिरी पंडित आणि असंख्य काश्मिरी माता भगिनींच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी .
आणि प्रतिकूल वातावरणात राहून स्वतः चा विचार न करता आमचं संरक्षण करणाऱ्या सैनिक आणि सुरक्षा दलातील बांधवांसाठी …

माझ्या दृष्टीनं ती धूळ परमपवित्र होती .

— एव्हाना माझ्या चहाची चवच निघून गेली होती .

मी विषण्ण मनानं फ्लाईट ची वाट पहात राहिलो , इतरांप्रमाणे …

दृश्य स्वरूपातले काश्मीर मला खुणावत होतेच , पण त्यापाठचे अबोल हुंकार अधिक खुणावत होते .

– विमानात बसताना श्वेता सांगत होती ,
‘ सर , आपली शिकारा राईड आज होणार नाही .अजितदादानं सांगितलंय .’

खरं तर माझीही इच्छाच नव्हती .
मी म्लान पणे हसलो .

– श्रीनगरला उतरलो .
आणि हाऊसबोटीत मुक्कामाला निघालो .
तो अनुभव तर आणखीनच वेगळा होता ….

( क्रमशः )

– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
———————————————-
लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..