नवीन लेखन...

काश्मीर एक जाणीव – भाग तीन

कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .

पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?

थांबा मग जरा …

श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर …?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश …
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
” आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . ”
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .

खरं सांगतो यार …

बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग …

आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.

हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .

” मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं .”

तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .

जाने भी दो यारो …
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?

मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .

राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच …

सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .

आणि तरीही…

काश्मीर मधली परिस्थिती…
भूतकाळ…
वर्तमानकाळ…
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट …

विसरता येत नव्हते .

–रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .

काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .

हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .

पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .

थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .

केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .

– मी पुन्हा अंतर्मुख झालो .

तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .

( क्रमशः)

– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
—————————————-

लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..