सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली, केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा एकात होती.
“मग? मग काय झालं?” पिंकीने विचारले.
“मग, ना, मला त्या अंधाऱ्या कोपऱ्याची खूप भीती वाटू लागली!” मंजिरी सांगत होती.
“का? तेथे काही होत का?”
“काय माहित? मला कस दिसणार? तिथं अंधार होता ना! पण काहीतरी डोकं -हात असल्या सारखं वाटत होत!”
“बापरे! मग?”
“मग आईने लॅम्प लावला. त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं! मला अंधाराची खूप भीती वाटते! लहानपणा पासून!”
केतकीने नेमका धागा पकडला. सगळ्या पोरी किती उछुकतेने ऐकतात आहेत? मोठ्ठाले डोळे करून. या पोरींना ‘भुताच्या’ गोष्टी सांगितल्या तर? काय हरकत आहे? खूप फ्रेंड्स मिळतील! आत्ता आपल्याशी, फारस कोणी बोलत नाही. काही जणी तर, त्यांच्या ग्रुप मध्येपण, येऊ देत नाहीत! आपला चांगलाच भाव वधारले. शाळेत एकदम फेमस होऊन जावू! अन आपल्या इतक्या भुताच्या गोष्टी, कोणाला ठाऊक असणार आहेत?
“मंजिरी, तुला अंधारात भूत बसलंय, असे वाटले असेल!” केतकीने त्यांच्या चर्चेत आपला सहभाग नोंदवला.
“हो, असच असेल! माझी गावाकडची आजी पण म्हणते, कि अंधारात भूत असतात!” पिंकीने केतकीला सपोर्ट केला.
“ये, यार, व्हॉट ‘भूत’ मीन्स?” नकट्या ज्योसनेने विचारले. हि इंग्रजी मेडीयम वाली!
” ‘भूत’ ,म्हणजे ना घोस्ट!” शबरीने ज्योसनेची शंका दूर केली.
” छट! खोटं! माझी मम्मी म्हणते कि भूत-बीत काही नसत! ती सगळी आपलीच इमॅजिनेशन असते!” स्नेहा ने मात्र विरोधी सूर लावला.
“हो! हो! माझे पप्पा पण सेमच बोलतात!” टीना म्हणाली.
“सगळी मोठी माणस, मुलाना भीती वाटू नये म्हणून असेच सांगत असतात! अन आपण मात्र अंधारात जात नाहीत! त्यांना पण भुतांची भीती वाटत असते!”
“कशावरून?” रोजीने शंका काढली.
“आग,तुला ठाऊक नाही. माझी काकू, तुझ्या,माझ्या मम्माच्या वयाची, चांगली मोठी, तिलाच भूत लागलं होत! मग ‘भूत’ नसत कस म्हणायचं?” केतकीच्या या प्रश्नाने सगळ्याच जणी गप्प बसल्या.
“बापरे! खरच! तू पाहिलंस?” पिंकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हते.
“मग? होच मुळी! मी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, तिकडे कोकणात गेलेली होते, तेव्हा पाहिलय!”
“म्हणजे, नक्की काय झाल्त?” सुषमाने विचारले.
आता केतकी सावरून बसली. तिच्या मनाप्रमाणे घडत होत. सगळ्यांच्या नजरा तिच्या कडेच होत्या. आता सारी सूत्रे हाती तिच्याकडेच होती.
” म्हणजे काकूला भूत लागल्याचं, आजीनं घरात सांगितलं. कारण काकू काही बाही बडबडायची, स्वतःलाच बोलायची. कधी हसायची तर कधी रडायची! हाती लागेल ते फेकून मारायची. एकदा तर तिने आजीला, ‘मर,म्हातारे!’ म्हणून लोटाच फेकून मारला होता! ‘तिला आपली माणसे आता ओळखू येत नाहीत!’ आजी म्हणायची. आज्जी, बरोबरच म्हणत होती! कशी ओळखू येणार माणसे? तिच्या अंगात भूत शिरलं होत ना? परक्या भुताला, आपली माणसे कशी ठाऊक असणार?”
“मग?” पिंकीने विचारले.
केतकी पुढे सांगणार तोच, लन्च संपल्याची बेल झाली.
“केतकी, राहिलेलं उद्या सांग हं! उद्या असेच आणि येथेच बसुयात.” पिंकीने आग्रहाची विनंती केली. केतकीने होकारार्थी मान हलवली. सगळ्याजणी आपापल्या वर्गाकडे निघाल्या.
शाळा सुटल्यावर नेहमी प्रमाणे, केतकी, तिच्या पप्पाच्या स्कुटरवर बसून घरी निघाली. उद्या ग्रुपला काय काय सांगायचं, कस सांगायचं, या विचारातच ती गुंग होती.
Leave a Reply