दुसरे दिवशी पिंकी, सकाळपासूनच कधी इंटरव्हल होते, याची वाट पहात होती. लंच मध्ये झटपट डब्बा खाऊन, ती कालच्या ‘पायरी ग्रुप’ला सामील झाली. आज केतकीला सगळ्यांच्या मध्यभागी बसवलं होत.
“केतक्या, ते भूत काकूला कस सोडून गेलं ग?” पिंकीने कालची लिंक पुन्हा ओपन केली.
“मग, आज्जीनं एक ढेरपोट्या, दाढीवाला, हरीबाबा नावाचा मांत्रिक आणला होता.” केतकीने सुरवात केली.
“व्हॉट, ‘मांत्रिक’?” त्या नकट्या ज्योसनेने विचारले.
“आग, मांत्रिक म्हणजे, ते ‘घोस्ट हंटर्स’!” पुन्हा शबरीनेच तिच्या शंकेचे निरसन केले.
“मग, न, त्या हरीबाबान, एक हळदीचे मोठ्ठे सर्कल काढले. त्यात काकूला बळे बळेच बसवले. तो तिला सारखा विचारायचा. ‘ कोण आहेस तू? तुला काय पाहिजे?’ पण काकू काहीच उत्तर देत नसे. नुसतंच ‘हूSSS, हूSSS’ करायची. मग तो चिडून, हातातल्या कडू लिंबाच्या फांदीने तिला मारायचा!!”
” व्हॉट, ‘फांदी?’ ” ज्योसनीने पुन्हा डिस्टरब केलं.
“तू गप ग ‘जो’! फांदी म्हणजे ‘ब्रांच’. केतकी तू सांग ग पुढे. गेलं का ते भूत?”
” काय ठाऊक? मग आम्ही सुट्ट्या संपल्याने माघारी आलो ना!”
” पण काय ग केतक्या, तू पाहिलंस का कधी भूत? तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी!” पिंकीने विचारले.
“मी न? नकोच! तुम्ही सगळ्यांना सांगाल! मी नाही सांगत!”
” प्रॉमिस, आपल्या या ग्रुपच्या बाहेर हि गोष्ट जाणार नाही!”
” हो!हो! कोणी नाही सांगणार!” सगळ्याजणींनी एकच कल्ला केला.
“बर,बाई मग सांगते! एका. मी दोनदा पहिली भूत! म्हंजे आत्ता कळतंय ते भूत होत म्हणून. पण पहात होते तेव्हा नव्हतं कळलं!”
“कधी? अन कुठं?”
” माझं आजोळ पण कोकणातच आहे. रत्नागिरी पासून जवळच एक खेडेगाव. तेथे आज्जीच कौलारूच घर आहे. त्या घराच्या मागच्या अंगणात, एक विहीर आहे. रहाट असलेली!”
“व्हॉट ‘रहाट’ मीन्स?” ज्योसनेने पुन्हा आडकाठी आणली.
“गप बे, साली हि ‘जो’ न येडचाप आहे! ‘रहाट’ म्हणजे, विहिरीतलं पाणी काढायचं व्हील! केतकी नको तिच्याकडे लक्ष देऊ! तू कन्टीन्युव कर!” पिंकीने ज्योसनाला झापलं.
” रात्री मी आजीजवळ झोपलेली होते. विहरीत कोणी तरी, मोठ्ठा दगड टाकल्यावर, पाण्याचा जसा आवाज होईल ना?, तसा मला आला. मी एकदम जागी झाले. अंथरुणातून हळूच उठले. अन खिडकीचे दार किलकिले करून बाहेर पाहिलं. तर विहिरीच्या कट्ट्यावर एक बाई, मोकळे केस सोडून बसलेली!. तेव्हड्यात आजीला जाग आली. तिने पटकन ती खिडकी लावून घेतली! तोंडावर बोट ठेवून ‘बोलू नकोस!’ म्हणून खूण केली. पुन्हा मला जवळ घेऊन झोपी गेली. सकाळी उठल्यावर मला तीन सांगितलं कि विहिरीवर बसली होती, ती ‘हडळ!’ होती!”
तेव्हड्यात इंटरव्हल संपल्याची बेल वाजली. सगळ्याजणी उठल्या.
” व्हॉट इज हाडळ?” ज्योसनाने पिंकीला थोडे थांबवून विचारले.
“हाडळ? ना? ‘लेडी घोस्ट!’, त्या पेक्षा आरसा बघ! तिथे दिसेल तुला ती!” पिंकी वैतागली.
Leave a Reply