केतकी तिच्या पप्पांच्या स्कुटरवरून शाळेत आली, तर पिंकी शाळेच्या गेट जवळच उभी होती.
“केतक्या, तू कोणाच्या स्कुटरवरून शाळेत येतेस?” पिंकीने विचारले.
“ते न माझे पप्पा आहेत! पण का ग?”
“काही नाही. पण ते न एकदम ‘कूल’ वाटतात. चार्मिंग! शारुख सारखी क्युट डिम्पल पण त्यांच्या गालावर पडते!”
“ये! असं नाही म्हणायचं त्यांना! नजर लागेल ना? पण खरच मी खूप लकी आहे, असे पप्पा मला मिळालेत! ती डिम्पल न आमच्या दोघात कॉमन आहे! तुला ठाऊक आहे का पिंके? ते मला न डॉक्टर करणार आहेत!”
” हाऊ स्वीट! केतक्या, मी तुझी येथे मुद्दाम वाट पहात उभी आहे. ”
“का ?”
“मी आमच्या शेजारी, एक खुप्प म्हातारे आजोबा रहातात, त्यांना ते ‘हाडळ!’ विचारलं बर का? ते पण तू म्हणालीस तेच म्हणाले! बाई मेली कि ती ‘हाडळ’ होते! म्हणजे ‘भूत’ असतात तर!!”
“मग? मी काय तुम्हाला खोटं सांगत होती का काय? यार, तुम्ही माझे फ्रेंड्स आहेत ना? मैत्रीत कोणी खोटं बोलत का?”
प्रार्थनेची घंटा वाजली तशी, ‘चल,लंच मध्ये बोलू’ म्हणून दोघी प्रार्थने साठी रांगेत उभ्या राहिल्या.
एकंदर केतकीच्या ‘भूत’ कथननाने चांगलीच ग्रीप घेतली होती. तिचे फ्रेंड्स सर्कल वाढत होते. श्रोता वर्ग वाढत होता.त्याच बरोबर खुन्नस पण वाढली होती. केतकी आल्याने, स्नेहाचे महत्व कमी होत होते. ती केतकीचा द्वेष करू लागली होती. तिचा ग्रुप केतकीने नकळत हायजॅक केला होता!
आज केतकीने स्पेशल ‘गोष्ट’ सांगायची ठरवली होती. ठरल्या वेळी, ठरल्या ठिकाणी, म्हणजे लंच अवर्स मध्ये पायऱ्यांवर सगळ्या जणी जमल्या होत्या.
“आज ना, मी तुम्हाला एक जम्माडी गम्मत सांगणार आहे. माझ्या पप्पांची या गावात बदली झाली, तेव्हा आम्ही, एका भाड्याच्या घरात राहायला आलोत. हे घर गावापासून थोडस दूर आहे, पण छान आहे. आजूबाजूला खूप झाड आहेत. वडाची, पिंपळाची तर खूप आहेत. चार दोन पडकी घर पण दूरवर आहेत. तेथे मला खेळायला खूप आवडत. अश्या पडक्या वाड्यात आणि घरात ‘भूत’ असतात, असं माझी आई आज्जी, मला लहानपणी सांगायची. इतके दिवस मी नाही विश्वास ठेवला, पण गेल्या शनिवारी, हो त्या दिवशी शनी अमोश्या होती म्हणे, मला ते भूत दिसलं!” केतकीने शेवटी, काल पासून विचार पूर्वक तयार केलेला, बॉम्ब गोळा टाकला.
सगळी कडे चिडी -चूप.
“ऑ!! म्हणजे? कस? काय? दिसलं?” पिंकी सगळ्यात आधी भानावर आली.
“मी त्या दिवशी, वडाच्या पारंब्याला धरून झोका खेळत होते. म्हणजे नेहमीच खेळते, आज खेळताना एक काळ मांजराचं पिल्लू माझ्या पायात आलं. मी दचकले. कारण त्याच्या तोंडाला लाल, लाल काही तरी लागलेलं होत!”
“रक्त!?” पिंकीचे डोळे मोठ्ठे झाले होते.
“असेल हि. पडक्या घरातला एखादा उंदीर गट्टम केला असेल. पण मी घाबरून घराकडे धूम ठोकली. तेव्हा ते पिल्लू तेथेच झाडाखाली बसलेलं होत. मी घरात आले, अन पहाते तर काय? ते काळ पिल्लू आमच्या सोफ्यावर आरामात बसलंय! मी आईला हाक मारली, आणि ते दाखवलं. ‘वेडाबाई, हे पिल्लू सकाळ पासून घरातच फिरतंय! तू पाहिलेलं, काळ्या मांजराचं पिल्लू वेगळं असेल, आणि हे वेगळं आहे. आग, दोन सारखी पिल्लं असतात कि!’ मी पुन्हा सोफ्यावरल्या पिल्लाकडे पाहिलं, ते तेच होत, कारण त्याच्या पण तोंडाला रक्त लागलेलं होत!! मी आईला पुन्हा हाक मारली, त्या मांजराच्या तोंडाला लागलेल रक्त दाखवण्या साठी, पण ते पिल्लू तोवर, जम्प मारून, खिडकीतून पळून गेलं! ते मांजराचं काळ पिल्लू भूत होत!”
” केतकी! आम्ही ऐकून घेतोय म्हणून, तू फारच फेक फेकी करायला लागली आहेस! इट्स बॅड!” स्नेहाने आज राडा करायचा पक्का निर्णय घेतला होता.
“तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय?” केतकीने धडक स्नेहाला विचारले.
“हो!” स्नेहा ठामपणे म्हणाली. दोघींची जुंपणार अशी ग्रुपला शंका येऊ लागली.
“मग, या सगळ्या जणी येत्या शनिवारी, दाखवते प्रत्यक्ष ‘भूत’!” केतकीपण इरेला पेटली. कसल्या येतायेत या भित्र्या पोरी! उगाच आपली खुन्नस.
“चॅलेंज! तू ‘भूत’दाखवणार?” स्नेहा ने विचारले.
“हो! चॅलेंज! तुमचेच डेरिंग आहे का?”
“ठीक! आम्ही, या येथे असलेल्या सगळ्या जणी येतोय, सॅटर्डेला! दे तुझ्या घरचा पत्ता!”
या तर खरेच यायला निघाल्यात! आता काय करावं? असे काही होईल असे केतकीला वाटलेच नव्हते.
“अरे यार, असं काय करताय? पहा तुम्हाला भीती वाटली तर माझी जिम्मेदारी नाही!”
“तू नको त्याची काळजी करू! आम्ही आमच्याच रिस्कवर येणार! शनिवारी शाळा सुटली कि आम्ही वह्या पुस्तक घरी ठेवून, पाच वाजता तुझ्या घरी येतो!
“बघा हू, घाबरायचं असेल तरच या!” केतकीने शेवटचा प्रयत्न केला. पण तो दुबळा पडला.
“अरे, जारे, भूत दाखवणारी! आता तर आम्ही येणारच! तयारीत रहा, आणि तुझ्या ‘भूता’ पण तयार ठेव!” केतकीच्या डोळ्या पुढे हात नाचवत स्नेहा म्हणाली अन ताड ताड निघून गेली.
केतकीच्या डोळ्यात पाणी आले. हे भलतंच झालं! आता सगळंच मुसळ केरात जाणार. इतक्या दिवसांची मेहनत, ते फ्रेंड सर्कल माती मोल होणार होत! पण एक बरे झाले होते. या गोंधळात स्नेहा आपल्या घराचा पत्ता घ्यायला विसरली होती! आज बुधवार, तीन दिवस शाळेला बुट्टी मारली कि झालं!
Leave a Reply