हे काही कथेचं शीर्षक नाही. मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. सांगोपांग या शब्दात खूप काही दडलंय.त्याचा उहापोह करायचा आहे .
तर त्यादिवशी मी खूप पसारा मांडून बसलो होतो. अनेक फाईल्स आजूबाजूला होत्या. सोफ्यावर. झोपाळ्यावर. टेबलावर. जागा नव्हती म्हणून खाली टाईल्सवर देखील. काही उघडलेल्या. काही मिटलेल्या.काही फाईल्स मधील कात्रणे इतस्ततः फिरत होती आणि त्या सगळ्या पसाऱ्यात मी हरवून गेलो होतो. पसारा असून देखील कौतुकभरल्या नजरेनं पहात होतो.
१९७७ पासून २०१९ पर्यंतच्या ४२ वर्षात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथांची कात्रणे , त्या फाईल्स मध्ये होती आणि दरवेळी प्रमाणे आजही अचंबित होऊन कथांची कात्रणे असलेल्या फाईल्सकडे मी पहात होतो. या ४२ वर्षात मी वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरच्या अनेक कथा लिहिल्या. कधी दीपावली अंकांसाठी. कधी विशेषांकांसाठी. कधी संपादकांच्या आग्रहाखातर , तर कधी स्वतःच्या आनंदासाठी.
मी लेखनावर बंधनं , मर्यादा घालून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे असंख्य अनुभवांना शब्दबद्ध करताना खूप आनंद घेता आला. वाचकांच्या संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया जशा अनुभवता आल्या तशा , कोकणच्या पार्श्वभूमीवरील माझ्या कथांच्या अनुषंगाने एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या उपयुक्त ठरल्या याचेही समाधान वाटले. या पसाऱ्यात मी हरवून गेलो होतो. कथाविषय , कथेतील पात्रे , निसर्ग , रचना , शैली , कथांतर्गत विश्व असा एक दीर्घ पट माझ्यासमोर पसरला होता .
वाटलं , आपण आपल्याच काही निवडक कथांकडे अलिप्तपणे पाहिलं तर … त्या कथांचा सांगोपांग विचार केला तर… लेखन करताना , कथा प्रसिद्ध झाल्यावर , त्यावर वाचकांचा प्रतिसाद लाभल्यावर जसा आनंद मिळत होता , तसा आता इतक्या वर्षांनी , जरा वेगळ्या पद्धतीने कथांकडे पाहिल्यावर आनंद मिळू शकतो .
तोच हा प्रयत्न आहे.
कथा सांगोपांग !
माझ्या यापूर्वीच्या सर्व लेखनाला आपण भरभरून प्रतिसाद दिला , प्रतिक्रिया पाठवल्या , तसं या लेखनासाठी अभिप्रेत आहे.
— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
Leave a Reply