शहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा. अगदी न चुकता. वेळ ठरलेली असल्यामुळे साधारण त्याच वेळेस तेच तेच चेहरे दिसायचे. तेच आजी आजोबांचे घोळके, तीच पोरंटोरं, तेच पळणारे वगैरे वगैरे. एके दिवशी तळ्याला एक-दोन प्रदक्षिणा झाल्यावर त्याला एक आजी दिसल्या. कठड्यावर एकट्याच बसलेल्या.
छाप पडेल असं छान व्यक्तिमत्व. राहणीमान वगैरे एकदम टापटीप. चांगल्या आणि सुखवस्तू घरातल्या वाटत होत्या. पण चेहरा मात्र अगदी उदास. ह्याचं प्रत्येक फेरीनंतर त्या आजींकडे आपसूक लक्ष जायचं. बराच वेळ त्या पाण्याकडेच एकटक पहात बसल्या होत्या आणि थोड्यावेळाने निघूनही गेल्या.
दूसरा दिवस उजाडला. साधारण त्याच वेळेस आजी पुन्हा कठड्यावरच्या त्याच ठिकाणी हजर. पण आजही नजर मात्र शून्यात. त्यांचा एकटेपणा अजिबात लपत नव्हता. नुसत्या कठड्यावर बसण्याबाबत नाही तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्या एकट्या असाव्यात असं वाटत होतं. किंवा सगळं काही आहे पण सोबत कुणी नाही असं काहीसं. तीच वेळ, तोच कठडा, तीच जागा, तेच भाव, तेच कुतूहल असं अनेक दिवस सुरू होतं. का कुणास ठाऊक पण त्याला बरेचदा वाटायचं की थांबून त्या आजींशी ओळख करून घ्यावी. त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलावं. पण नंतर वाटायचं, त्यांना आवडेल की नाही किंवा त्या कसा प्रतिसाद देतील. “आपल्याला ढीग आपुलकी वाटत असेल त्यांच्याविषयी पण त्यांना असेलच असं सांगता येत नाही” या सगळ्या विचाराने बोलायचं धाडस त्याने कधी केलं नाही.
पण तरीही काहीही ओळख नसलेल्या त्या आजींशी याचं एक अदृश्य असं नातं तयार झालं होतं. आणि तळ्याच्या प्रत्येक प्रदक्षिणेनंतर ते दिवसेंदिवस अधिक दृढ होत होतं. एखाद्या रीळाला धागा गुंडाळत जावं आणि त्या दोऱ्याची पकड घट्ट होत जावी अगदी तसं. हे सगळे मनातले विचार आणि भाव त्याच्या चेहऱ्यावर आपसूक उमटायचे. त्याचा हा बोलका चेहरा आजींच्या नजरेतूनही सुटला नव्हता. म्हणूनच बहुधा जाता-येताना त्या कधीतरी हसायच्या पण तरीही ते तेव्हढ्यापूरतं वाटायचं.
अशाच एका संध्याकाळी हा ठरलेल्या वेळेत आला पण आजी काही दिसल्या नाहीत. काही कामामुळे आल्या नसतील असं वाटलं त्याला. पुढच्या दिवशीही दिसल्या नाहीत तेव्हा वाटलं दुसरीकडे कुठेतरी बसल्या असतील. म्हणून फेरी मारताना त्याने सगळा गोलाकार कठडा नजरेखालून घातला पण त्या कुठेच दिसल्या नाहीत. तीन दिवस , पाच दिवस करत पंधरा दिवस झाले तरी आजींचं दर्शन नाही. आता मात्र तो थोडा सैरभैर झाला. काय करावं ते समजत नव्हतं. शेवटी न राहवून त्याने त्या आजी बसायच्या तिथे आजूबाजूला बसणाऱ्या काही जणांना त्यांच्याबद्दल विचारलं. पण कुणालाच काही माहिती नव्हतं. त्या बोलायच्याच नाहीत ना कोणाशी. आपल्याच व्यथेत असायच्या. मग त्याने तिथल्या झाडांची देखभाल करणाऱ्या एका वयस्कर मामांना विचारणा केली. आधीच या पठ्ठ्याला त्या आजींचं नाव सुद्धा माहिती नाही त्यात ते मामा दिवसभर वेगवेगळ्या वेळी तळ्याभोवती अनेकदा फिरायचे. त्यामुळे शेवटी वर्णन केलं तेव्हा कुठे मामांच्या लक्षात आलं.
“ अहो त्या आजी होय? त्या वारल्या की हो बिचाऱ्या काही दिवसांपूर्वी. ती बघा, ती समोर अशोकाच्या झाडामागची सोसायटी दिसतेय ना ? तिथे राहायच्या दुसऱ्या मजल्यावर. श्रीराम ! श्रीराम !”.. म्हणत मामा पुढे निघून गेले.
हा मात्र तिथेच स्तब्ध. काहीच सुचत नव्हतं. एकदा वाटलं की तडक त्यांच्या घरी जावं. पण कोणाला भेटणार ? आणि काय सांगणार ? त्यांच्याशी काय बोलणार ? आणि आता जाऊन तरी काय साध्य होणार ?? सगळेच नुसते प्रश्न.
शेवटी जड अंतःकरणाने तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला तेव्हाही मनस्थिती अशीच विचित्र. त्या आजी सारख्या डोळ्यासमोर येत होता. विशेषतः फेरी मारताना आजींची नेहमीची जागा आली की जरा जास्तच. एकदा तरी त्यांच्याशी बोलायला हवं होतं अशी रुखरुख आणि पश्चात्तापाचं ओझं कायम त्याच्या मनावर.
दिवासामागून दिवस लोटले. कठड्यावरच्या त्या जागेवर कधी दुसरं कुणी बसलेलं असायचं तर कधीतरी मोकळीच असयाची. पण तळ्याभोवती फेऱ्या मारताना आजींची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. तो कठडा बघताना नेहमी काहीतरी गमावल्यासारखं, हरवल्यासारखं वाटायचं. सरणाऱ्या दिवसांसोबत ते वाटणंही आता अंगवळणी पडल्यासारखं झालं.
अशाच एका संध्याकाळी तो शिरस्त्याप्रमाणे तळ्याभोवती फेऱ्या मारू लागला आणि चालता चालता आजी जिथे कठड्यावर बसायच्या त्या जागी पोहोचतो तर काय? दस्तुरखुद्द आजीच तिथे बसल्या होत्या. त्याचा विश्वासच बसत नव्हता. आजीसुद्धा त्याला बघून एकदम आनंदाने ताडकन उठल्याच.
“ अरे ये ये .. तुझीच वाट बघत होते !”
आज चेहरा अगदी प्रफुल्लित होता आजींचा. त्यांच्या हातात दुपट्यात गुंडाळलेलं एक तान्हं बाळ होतं.
“ अहो आजी , तुम्ही होतात कुठे इतके दिवस ?” .. त्याचं स्वाभाविक कुतूहल
“ सांगते सांगते, सगळं सांगते… थांब हं ! “
असं म्हणत काही अंतरावर फोनवर बोलणाऱ्या एका मुलीला आजींनी हाक मारली.
“ अगं इकडे ये गं जरा !”
त्या मुलीने फोनवरच्या व्यक्तीला थांबायला सांगितलं आणि जवळ आली.
“ हा बघ! हाच तो ज्याला भेटायला मी खास आलेय आत्ता. आणि ही माझी धाकटी लेक!”
“ ओह ग्रेट ! नाईस टू मीट यू. तुम्ही दोघं मारा गप्पा निवांत. माझा जरा ऑफिसचा इम्पॉर्टंट कॉल सुरू आहे. प्लिज एक्सक्युज हां ! आई ……. तो पर्यंत बेबीला दे पाहिजे तर माझ्याकडे !
असं म्हणत त्या शांतपणे झोपलेल्या गोड बाळाला एका हातात कसंबसं घेऊन ती थोडं लांब कठड्यावर जाऊन बसली आणि पुन्हा फोनला चिकटली.
आजी पुढे बोलू लागल्या
“ अरे ही असते परदेशात. बाळंतपणाला आली होती इकडे काही महिन्यांपूर्वी. तेव्हापासून माझं तळ्यावर येणंच झालं नाही!.”
“ आजी तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू का ?”
“ अरे सांग की. इतका काय फॉर्मल होतोस?
आजवर एकदाही न बोललेले आणि एकमेकांची नावंही माहिती नसणारे दोन विभिन्न वयोगटातले हे दोघे असे काही बोलत होते जसे की अनेक वर्षांपासून ओळखतायत.
मग त्याने आजींविषयी त्याला समजलेली बातमी सविस्तरपणे सांगितली. आपल्याच न झालेल्या मृत्यूची कथा ऐकून आजींना थोडं हसूच आलं पण नंतर त्यांना आठवलं
“ अरे हां .. बरोबर आहे. त्याच सुमारास आमच्या बाजूच्या सोसायटीतल्याच एक जण गेल्या. साधारण माझ्याच वयाच्या होत्या. त्या सुद्धा यायच्या कधीतरी तळ्यावर म्हणून त्या मामांचा गैरसमज झाला असेल .. असो !
“ पण तुम्हाला इतक्या दिवसांनी भेटून खूप आनंद झाला आणि त्या वाईट बातमीच्या पार्श्वभूमीवर तर तुम्हाला सुखरूप बघून सुखद धक्काच!”
“ अरे तुला भेटल्याशिवाय कशी जाणार होते मी वरती ? किंबहुना तसं होऊ नये म्हणूनच तर मी आज आवर्जून आलेय !”
“ म्हणजे? मी समजलो नाही!”
“ माझ्या दोन्ही मुली लग्नानंतर परदेशात. मी आपली इकडे एकटी. सुरवातीला रेटून नेलं रे सगळंss पण मिस्टरांच्या पश्चात आणि आता वयोपरत्वे एकटेपणा जाणवतो. मुलींना मनातून कितीही वाटलं तरी त्यांचे तिकडचे व्याप वेगळे. शिवाय त्यांच्या आपल्या वेळा वेगळ्या. त्यामुळे सगळं जेव्हढ्यास तेव्हढं होतं रे. माझा एकटेपणा आता माझ्याबरोबरच जाणार बघ !”
“ असं काय म्हणताय आजी ?”
“ अरे खरंच आहे ते. पण आमचं हे शेंडेफळ आल्यापासून इतकी धावपळ की विचारुच नको. म्हणून तर इकडे फिरकणं नाही झालं. निदान तिची या दिवसांतली सगळी हौसमौज करण्यात मला आनंद मिळाला हेच माझ्यासाठी महत्वाचं. उद्या परत जाणार आहे ती. मलाही तिच्यासोबत घेऊन जाणार आहे. बाळ लहान म्हंटल्यावर कुणीतरी हवंच ना तिथे तिच्याबरोबर!”
“ अरे वाह ! मस्तच की मग! तुम्हाला खूप शुभेच्छा!”
“ मला कल्पना आहे की हे सुख काही फार काळ राहणार नाहीये. तीन-चार महिन्यांनी बाळ मोठं झालं की माझी रवानगी परत आपल्या इकडच्या मठीत. मलाही फार दिवस तिथे करमत नाही हेही तितकंच खरं. आताशा माझी तब्येत सुद्धा खूपदा बरी नसते. त्यामुळे परदेशातच माझं काही बरं वाईट झालं तर तुला भेटायचं मात्र कायमचं राहुन जाईल. त्यातून जगले-वाचले अन् परत आले तरी आता पुन्हा इथे तळ्यावर येता येईल याची खात्री नाही. म्हणून आज अगदी अट्टाहास करून आलेय मी”.
पुढे थोडा वेळ दोघांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. इतक्यात बोलता बोलता आजींचं घड्याळाकडे लक्ष गेलं.
“चल, आता निघते मी. अजून बॅग भरायची बाकी आहे थोडी. पण तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं रे !”.
दोघांनी एकमेकांचा आनंदाने निरोप घेतला आणि आपापल्या मार्गाने निघाले.
दोघांचं इतका वेळ संभाषण झालं पण आजही दोघांनाही एकमेकांचं नाव-गाव माहिती नाही. ते विचारायची त्यांना गरजच भासली नाही. हेच तर वेगळेपण होतं त्यांच्या नात्याचं. कारण ते नातं दोन व्यक्तींपेक्षाही दोन मनांचं होतं. आणि दोन्ही बाजूंनी तितकंच मजबूत. आजी-नातू, मावशी-भाचा किंवा तत्सम कुठल्याही नात्यांच्या चौकटीत त्याला बसवताच आलं नसतं असं एका मनाचं थेट दुसऱ्या मनाशी असलेलं भन्नाट नातं. असलेच तर ते होते निखळ आणि निरागस अशा मैत्रीचे बंध. कारण खऱ्याखूऱ्या मैत्रीला वय, भौगोलिक अंतर, भाषा अशी कुठलीच बंधनं नसतात. हे नातं एकमेकांकडे नुसतं बघत मौनातून सुरू झालेलं असलं तरी दोन्ही मनांतून मात्र अनेक महीने अदृश्य शब्दांचा प्रवास सुरूच होता. म्हणूनच तर हा पहिला आणि कदाचित शेवटचा प्रत्यक्ष संवाद असूनही ते दोघे जणू मागील पानावरून पुढील पानावर यावं असे भरभरून बोलत होते. कठड्यापाशी सुरू झालेलं हे अनोखं नातं आज त्याच कठड्यावर येऊन संपुष्टात आलं असलं तरीही ते निरंतर होतं. दोघांच्याही मनात चिरकाळ टिकणारं. कधीच विसरता न येणारं. भविष्यात शक्य झालं तर इथून तिथून माहिती काढून एकमेकांना शोधतीलही कदाचित. पण तूर्तास तरी हे अपूर्णत्व असणं हेच या नात्याचं पूर्णत्व होतं.
त्यानंतर दररोज नवीन दिवस उजाडायचा. दररोज नवीन संध्याकाळ व्हायची. ठरल्याप्रमाणे त्याची पावलं तळ्याकडे वळायची. पण आता मनावर कसलंच दडपण नसायचं. असायचं ते केवळ मानसिक समाधान. आणि दररोज सोबत असायचा; तो त्यांच्या नात्याला सदैव टवटवीत ठेवणारा आठवणींचा “कठडा” !
क्षितिज दाते , ठाणे
आवडल्यास शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही ..
Leave a Reply