भर दुपारची वेळ होती. धोंडू शेतात नांगरणी करत होता. थोड्याच वेळात त्याच्या बायकोने म्हणजे राधाने बंधावरून त्याला आवाज दिला. तो आला आणि बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसला. मग त्या दोघांनी भाजी भाकरी खाल्ली. जेवण झाल्यानंतर धोंडू त्या झाडाला टेकून म्हणाला, राधा जर तुझे सल्ले वेळोवेळी ऐकले असते तर आज आपल्यावर आज ही वेळ नसती आली. हे ऐकून राधा मात्र चुपचाप बसली आणि धोंडू मात्र भूतकाळात रमून गेला.
साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता.
एके दिवशी तो त्याच्या मित्रांसोबत भाजीपाला विकायला गेला असताना, त्याच्या मित्रांनी त्याच्या मेहनतीची तसेच त्याने कमी वेळात केलेल्या प्रगतीची तारीफ गेली. शेवटी धोंडीबा हा माणूसच. स्वत:ची स्तुती ऐकून इतरांप्रमाणेच तोही मनातून खूप सुखावला गेला. तशातच एका मित्राने स्वतःसाठी बंगला बांधायचे धोंडीबाच्या डोक्यात घातले. आणि घरी आल्यावर त्याने बंगल्याबद्दल राधाला सांगीतले, त्यावर तीने धोंडीबाला सांगितले की आता आपल्याला बंगल्याची गरज नाही आहे. पण धोंडीबा हट्टालाच पेटला होता. शेवटी राधानेही त्याला नाईलाजाने समंती दिली.
बंगला बांधायला सुरुवात झाली. जवळपासचे होते नव्हते तेवढे पैसे संपले, मग बँकेतून कर्ज प्रकरण केले. तरी अजून पैसे लागतच होते. त्याने गावातील मित्रांकडे पैसे मागितले, पण कोणी पैसे द्यायला तयार झाले नाही. शेवटी एक मित्रानेच सल्ला दिला की जमिनीचा एखादा तुकडा विकून पैश्यांची निकड भागवून घे. धोंडीबाने तसेच केले. आपली दोन एकर शेती त्याने विकली. त्यातून बंगला पूर्ण केला. नंतर वास्तुशांती पण जोरदार केली. गावातील सर्व लोकांसह पंचक्रोशीतील पाहुण्यांना त्याने जेवायला घातले. बंगला खरंच टुमदार झाला होता पण त्यासाठी धोंडीबाला ला दोन एकर जागा विकावी लागली हे ही तितकेच खरे.
थोडयादिवसांनी मुलीचे लग्न काढले. मुलीच्या लग्नात काही कमी पडू द्यायचे नाही म्हणून त्याने अजून दोन एकर शेती विकून पैसा उभा केला आणि मुलीचे लग्न अगदी धुमधड्याकयात केले. राधा या वेळेसही इतका खर्च करू नका म्हणून अडून बसली होती, पण धोंडीबा पुढे तिचे काही चालले नाही. म्हणता म्हणता महीने गेली. बँकेचे हफ्ते, शेतीचा खर्च, घरचा खर्च, मुलीच्या सासरकडचे लाड, हे सगळे पुरवता पुरवता धोंडीबा अगदीच बेजार झाला.
त्याने मित्रांकडे पाहुण्यांकडे अगदी पोरीच्या सासरकडे ,पैश्याची मदत मागीतली पण कोठूनच त्याला मदत झाली नाही. शेवटी बाकी असलेला जमिनीचा तुकडा बंगल्यासाहित विकला आणि गावातच एक छोटेसे घर घेतले आणि तिथे राहयाला गेला. धोंडीबा चा धोंडू कधी झाला हे त्यालाही कळले नाही. बघता बघता होत्याचे नव्हते झाले होते. समजत तर सगळे होते पण करता काही येत नव्हते.
तेवढ्यात त्याला आवाज ऐकू आला “अरे धोंडीबा, चल की पटकन अजून अर्धे शेत नांगरायचे बाकी आहे. उठ पटकन.” तो भानावर आला त्याने राधा कडे पाणी मागीतले आणि उभा राहीला. राधा कडे बघून तो परत म्हणाला की राधे , योग्यवेळेस जर तुझे सल्ले ऐकले असते तर आपल्याच शेतात आपल्याला मजूर म्हणून नांगरणी नसती करावी लागली आणि एवढे बोलून तो शेताकडे चालू लागला.
आर्किटेक्ट अनुप जैन, नाशिक
७५८८४३७१५२ / ९६२३१५४२००
Leave a Reply