एक राजा होता. एके सायंकाळी तो राजवाड्याभोवती असलेल्या बागेत फिरायला गेला. तेथे एका झाडावर मधमाशांचे पोळे होते. असंख्य मधमाशा ये-जा करत होत्या. राजा थोडा वेळ तेथे थांबून त्या
मधमाशांचे निरीक्षण करू लागला; परंतु तेवढ्यात एकाएकी एक मधमाशी खाली आली व राजाच्या हाताला दंश करून उडून गेली. राजा कळवळला. बरोबरच्या सैनिकांची धावपळ झाली. गांधीलमाशीच्या दंशामुळे राजाचा हात सुजला. राजवैद्यांनी उपचार करून हात बरा केला, मात्र त्यात दोन दिवस गेले.
राजाला वाटले की, एक साधी गांधीलमाशी चावल्यामुळे आपले दोन दिवस वाया गेले,मग सर्वात जास्त वेदना देणारा दंश कोणाचा असू शकेल?
एके दिवशी राजदरबारातच त्याने हा प्रश्र्न उपस्थित केला. कोणी म्हणाले, सापाचा दंश फारच वेदनादायक असू शकतो, तर कोणी म्हणाले, फणा काढणारा नाग चावला तर तो पाणीदेखील मागू देत नाही. तर एकाने सांगितले, विंचवाचा दंश फारच वेदना निर्माण करणारा असतो; परंतु राजाला ती
सर्व उत्तरे नेहमीची म्हणजे पुस्तकी वाटली. त्यामुळे त्याचे समाधान झाले नाही. तेव्हा राजदरबारातील वयोवृद्ध मंत्री उठून उभा राहिला व म्हणाला, महाराज, दोघांचा दंश फारच प्रखर असतो. राजाने विचारले, ते दोघे कोण? त्यावर तो मंत्री म्हणाला, हे एक स्तुतिपाठक व दुसरा निंदक, एक समोरून दंश
करतो, तर दुसरा पाठीमागून. मात्र दोघांचे दंश तसे इतके प्रखर असतात त्यामुळे माणसाचे मन बेभान तरी होते किंवा संतापामुळे त्याचा उद्रेक तरी होतो. राजाला त्या मंत्र्यांचे उत्तर मनोमन पटले व त्याबद्दल त्या मंत्र्यांचे दरबारातच त्याने कौतुक केले.
Leave a Reply