नवीन लेखन...

कथुआ, उन्नाव, सुरत आणि राजकारण

गेले काही दिवस आपल्या देशात आसिफा या काश्मिरातल्या मुलीवर पाशवी बलात्कार आणि त्यानंतर तिचा निर्घूण खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना जानेवारी महिन्यातली आहे आणि तिची प्रसिद्धी आणि चर्चा मात्र तीन महिने उलटून गेल्यावर सुरु झालेली आहे. या घटनेच्या पूर्वी, जून २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये घडलेली बलात्काराची बातमीही याच महिन्याच्या दरम्यान चर्चेत आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, उन्नाव आणि कथुआ या दोन्ही ठिकाणी अल्पवयीन मुलींवर (उन्नावच्या अल्पवयीन मुलीचं वय अद्याप संशयास्पद आहे) बलात्कार झालेला आहे. उन्नाव मधल्या मुलीच्या वडिलांचा मारहाणीत मृत्यू झालेला आहे, तर कथुआ मधील बलात्कारित मुलीचा बलात्कारानंतर निर्घूण खून झालेला आहे.

वास्तविक दोन्ही घटना सारख्याच निंदनीय असताना, देशात जास्त चर्चा मात्र कथुआ मधल्या ‘असिफा’ प्रकरणाची आहे.

या दोन्ही घटना घडल्याचा काळ आणि या घटना उघडकीला येऊन त्यावर देशभरात सुरु झालेली चर्चा यात काळातं मोठ अंतर आहे. दोन्ही घटनांमध्ये संशयित आरोपी पकडले गेले आहेत, परंतु अद्याप त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळालेली नाही. दोन्ही घटना घडलेल्या आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेल्या काळातील तफावत पहिली, तर ही दोन्ही प्रकरणं दिसतात तेवढी सरळ नाहीत हे लक्षात येईल. हा संशय तेंव्हा वाढतो, जेंव्हा उन्नावच्या घटनेपेक्षा कथुआच्या घटनेवर जास्त चर्चा होते. कथुआच्या घटनेत ‘आसिफा’ ह्या अल्पवयीन मुलीवर काही जणांनी सतत काही दिवस बलात्कार आणि नंतर तिचा निर्घूण खून केला गेला असल्याने ही चर्चा संतापाची होत असेल, तर एक वेळ समजू शकत. परंतु तसं न होता ही चर्चा ‘आसिफा’ मुसलमान होती आणि संशयित आरोपी हिंदू, हे समजल्यावर या चर्चेला बलात्कार आणि नंतर खून या पेक्षा ‘हिंदू-मुसलमान’ हा धार्मिक रंग प्राप्त झालेला आहे. उन्नावच्या घटनेत दोन्ही पक्ष हिंदू असल्याने ती कथुआच्या तुलनेत मागे पडली असं दिसत. सगळ्यावर वरताण म्हणजे दोन्ही घटनांतलं सत्य अद्याप बाहेर आलेलंच नाही.

‘कामातुराणां न भयं न लज्जा’ असं एक संस्कृत सुभाषित आहे. डोक्यात वासना चढलेला माणूस समोरच्या मुलीचं वय, जात, धर्म इतकंच कशाला नातंही बघत नाही. वासनेने अंध झालेल्या त्या ‘नरपशू’ला समोरच्या त्या देहाचा धर्म दिसत नसतो, जात दिसत नसते, वय दिसत नसतं, की नातंही कळत नसतं. बापाने मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनाही काही कमी नाहीत. पुन्हा तो जे अपकृत्य जिथे करू पाहतोय किंवा करतोय, ते मंदीर आहे की मस्जिद की स्मशान याच्याशी त्याला काहीच कर्तव्य नसतं. डोक्यात काम चढलेल्या त्या क्षणी त्यातल्या पुरुषाला समोरच्या त्या स्त्री देहाच्या दोन मांड्यांतली फक्त ‘मादी’ कळत असते, जिला कोणताही धर्म-जात-नातं किंवा रंग-रूप नसतं. तसच बलात्कारी पुरुष हिंदू किंवा मुसलमान किंवा इतर कोणत्याही ज्ञात जाती-धर्माचा नसून त्या क्षणी काम ज्वराने पछाडलेला एक विकृत नर असतो हे सत्य सर्वाना माहित असताना ‘आसिफा’ बलात्कार-खून प्रकरणाला जो हिन्दू-मुस्लिम धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न होतोय, त्या मागचं राजकारण आपण सर्वांनी ओळखायला हवं.

मी याला राजकारण का म्हणतो ते सांगतो. थोडासा आढावा घेतला, तर ‘राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (National Crime Record Bureau -NCRB ’ या केन्द्री गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या वेबसाईटवर देशात २०१५ साली लहान मुलांवर (यात मुलगे आणि मुली असे दोन्ही) बलात्काराच्या एकूण ८८०० केसेस दाखल झाल्याची माहिती मिळते. या संख्येत देशात आढळणाऱ्या सर्व जाती-धर्माची मुलं-मुली आहेत. २०१५ सालात जेंव्हा देशातील विविध भागात जेंव्हा या घटना घडल्या, तेंव्हा कुठेही आजच्या सारखी चर्चा किंवा मोर्चे किंवा कॅन्डल मार्च का निघाले नाहीत, ह्याच साधं उत्तर आहे ते म्हणजे, २०१५ साली देशात निवडणुका नुकत्याच होऊन गेल्या होत्या आणि त्या घटनांच भांडवल करून काहीच उपयोग नव्हता आणि आता ‘आसिफा’ घटनेला हिंदू-मुसलमान रंग देण्याचा प्रयत्न म्हणजे तोंडावर आलेल्या २०१९ सालच्या निवडणुका. आपल्याकडे ‘हिंदू-मुसलमान’ या भावनिक प्रश्नाचं निवडणुकांच्या आगे मागे हटकून राजकारणकेलं जात हे आता काही नवीन नाही. ह्यात लहान-मोठे असे सर्वच पक्ष सामील असतात. आसिफाच्या प्रकरणातंही तसंच आहे. निवडणुकांचं नीच राजकारण खेळणाऱ्यांना असिफा वर झालेल्या अत्याचारच कितपत वाईट वाटतं कुणास ठाऊक, पण निवडणुकांच्या तोंडावर ‘मुसलमान’ असिफच्या बलात्कार आणि खुनामुळे निवडणुकीत एक हमखास मुद्दा मिळाल्याचा आनंद राजकारण्यान जास्त होत असेल, यात मला तरी शंका नाही. ह्या दुर्दैवी घटनेकडे आपले सर्वपक्षीय राजकारणी निवडणुकीतील एक हत्यार या पलीकडे पाहत नसावेत असं मी म्हणेन.

आसीफाच्या दुर्दैवाची कहाणी राजकारणाच्या पार्श्वभुमीवर कशी पाह्यली जातेय याच आणखी एक उदाहरण. दोन-तीन दिवसांपूर्वी सुरतमधेही एका अल्पवयीन मुलीचं प्रेत सापडलं असून, तिच्या अंगावर असंख्य जखमा आहेत आणि तिच्यावरही बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालं आहे. परंतू अद्याप त्या मुलीची ओळख पटलेली नसून, ती नेमकी कुठल्या जाती-धर्माची आहे आणि तिच्यावर अत्याचार करणारे कोणत्या जाती धर्माचे आहेत हे समजलेलं नाही. आणि कदाचित म्हणून प्रसार माध्यमं आणि सर्वपंक्षीय राजकारणी यांनी सुरतच्या बलात्काराला ‘अनेक बातम्यांपैकी एक बातमी’ या पलीकडे जास्त महत्व दिलेलं दिसत नाही. ज्याक्षणी सुरत मधील ह्या मुलीचा आणि तिच्यावर अत्याचार करणारांचा धर्म आणि जात काय आहे कळेल आणि ती जर आपल्या राजकारणासाठी सोयीची असेल, तर त्या क्षणी प्रसार माध्यमावरील अॅंकर आणि बोलबचन राजकारणी आपलं राजकारण सुरु करतील.

आपल्या राजकारणाची पातळी किती घसरलीय ह्याची ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी उदाहरण आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू, मुसलमान आणि एकूणच सर्व समाजातील लोकांनी आणि विविध नेते/पक्षाच्या आंधळ्या फाॅलोअर्सनी या प्रकरणात भावनांच्या आहारी न जाता, हे नेमकं काय राजकारण शिजत आहे हे समजून घेऊन वागण्याची आज गरज आहे.

— ©️ नितीन साळुंखे, मुंबई
9331811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..