नवीन लेखन...

कात्रीची करामत

एखाद्या विशेष सणाच्या दिवशी, आपण षडरसपूर्ण जेवणाचा बेत आखतो.. त्यासाठी घरातील प्रत्येकाकडे भाज्या, किराणा, मसाले आणण्याचं काम सोपवलं जातं.. वाटून दिलेल्या कामाप्रमाणे, प्रत्येकाचे पदार्थ तयार होतात.. आता राहिलेलं काम असतं, कुशल वाढप्याचं.. तो प्रत्येक पदार्थाची ताटात क्रमवार मांडणी करतो.. त्यात चपाती, रस्सा भाजी, सुकी भाजी, भात, वरण, पापड, लोणचं, कोशिंबीर, मीठ, लिंबू, चटणी, कांदा सर्व काही इतकं छान व प्रमाणात मांडलेले असतं की, ते पाहूनच समाधान वाटतं व त्यांचा आस्वाद घेतल्यानंतर, तृप्तीचा ढेकर येतो…

चित्रपटाच्या संकलकाची भूमिका, ही कुशल वाढप्याचीच असते.. तो संपूर्ण तयार झालेल्या चित्रपटाला आवश्यक तिथे कात्री लावून, प्रेक्षकाला विचार करण्याची संधीही मिळू नये असा सीन्सचा क्रम लावून, चित्रपट उत्कंठावर्धक करतो…

१९७७ साली रोमू सिप्पी यांनी ‘इन्कार’ या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट तयार झाल्यावर, त्याची ट्रायल ठेवली होती. ती ट्रायल पहाणाऱ्या व्यक्तीने निर्मात्यास सांगितले की, असाच चित्रपट प्रदर्शित केला तर तो आठवडाभरात उतरवावा लागेल. याचं पुन्हा संकलन करणं आवश्यक आहे.. त्या व्यक्तीने चित्रपटातील दृष्यांचा पुन्हा नव्याने क्रम लावला व चित्रपट प्रदर्शित झाला.. ‘इन्कार’ चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संकलनासाठी त्या व्यक्तीला १९७७ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.. त्यांचं नाव होतं, वामन भोसले!

१९३२ साली गोव्यामधील एका खेड्यातील सामान्य कुटुंबात, वामन यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर ते १९५५ साली ते मुंबईला आले. बाॅम्बे टाॅकीज मधील प्रसिद्ध संकलक डी. एन. पै यांच्या हाताखाली संकलन शिकले. नंतर फिल्मिस्तानमध्ये बारा वर्षे संकलक सहायक म्हणून काम केले. नागीन, वह कौन थी, पडोसन, गुमनाम, पेईंग गेस्ट, इ. चित्रपटांसाठी त्यांनी सहायक म्हणून काम केले.

१९६७ साली स्वतंत्र संकलक म्हणून त्यांनी पहिला चित्रपट केला, तो म्हणजे राज खोसला यांचा ‘दो रास्ते’. या यशस्वी चित्रपटानंतर त्यांच्याकडे कामाचा ओघ वाढला.. पुढील पस्तीस वर्षे त्यांनी सुमारे १५० चित्रपटांचे संकलन केले..

राज खोसला, गुलजार, सुनील दत्त, सुभाष घई, रवी टंडन, अनिल गांगुली, के. विश्वनाथ, महेश भट्ट, अशोक गायकवाड, नरेंद्र बेदी, शेखर कपूर, राज सिप्पी, विक्रम भट इत्यादींसाठी काम केले. सुभाष घईच्या ‘कालीचरण’ पासून ‘खलनायक’ पर्यंतच्या यशात, वामन भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे.. ‘सौदागर’ चित्रपटासाठी भोसलेंना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गुलाम’ चित्रपटाच्या संकलनासाठी त्यांना पुन्हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

वामन भोसले यांनी उत्कृष्ट संकलन केलेल्या.. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, आँधी, कर्ज, कालिचरण, साहेब, रामलखन, खलनायक, इत्यादी सुपरहिट चित्रपटांना चित्ररसिक कधीही विसरू शकणार नाहीत…

२००१ साली ‘मिठी’ हा चित्रपट केल्यानंतर वामन भोसले यांनी निवृत्ती स्वीकारली. एकूण कारकिर्दीत त्यांना अनेक सन्मान व जीवनगौरव पुरस्कार मिळाले. २०१९ साली त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविले.

गेल्या वर्षी २६ एप्रिल रोजी अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या वामन भोसले यांचं दुःखद निधन झालं.. एका मराठी माणसानं, आपल्या कौशल्यपूर्ण तंत्रज्ञानानं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवलं.. या चंदेरी दुनियेत अनेक मराठी संकलकांनी योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये वामन भोसले यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२६-४-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..