काल फ्लॅटाळलेली देवळं आणि माणसाळलेले देव यावर एक लेख लिहीला होता. या दोन्हींत एक गोष्ट मात्र अजून तशीच जुनी शिल्लक आहे. ‘कौल’.
‘कौल’ म्हणजे देवाचा होकार किंवा नकार किंवा प्रसाद. माझ्या माहितीप्रमाणे गांवाकडे देवाला कौल लावल्याशिवाय कोणतंही शुभं कार्य सुरु करत नाहीत. वाईट गोष्टी, म्हणजे चोरी-दरोडे आदी कारणांसाठीही देवाचा कौल महत्वाचा मानला जातो हे कथा कादंबऱ्यांतून वाचलं होतं, पण प्रत्यक्षात पाहीलं नसल्यानं, तसं होतं की नाही हे मला खात्रीने सांगता येणार नाही. होत असलं तरी ते रात्रीच्या अंधारात होत असावं. शुभ कार्याचा कौल मात्र ढळढळीत दिवसा लावला जातो. देवाचा कौल मिळाला नाही, तर तो मिळेपर्यंत लोकं थांबतात पण कामाला सुरुवात करत नाहीतं.
कौल उजवा आला, की काम नक्की होणार हा त्यांचा आत्मविश्वास वाढत असावा आणि खरं तर हा आत्मविश्वासच त्यांचं काम करत असावा, असं मला वाटतं. दृढ इच्छाशक्ती काही ही शक्य करते, त्यातला हा प्रकार असावा. देव माझ्यासोबत आहे ही त्यांची श्रद्धा ‘कौल’मुळे जागृत होत असावी. त्यामुळे त्यांना ज्या कामासाठी कौल लावला, ते काम होतं असा लोकांना अनुभव येत असावा.
जाऊ दे, श्रद्धेची चिकित्सा करू नये. मलाही करायची नाही. मला या लेखात ‘कौल’च्या योग्यायोग्यतेबद्दल बोलायचं नाही. मला तसा अधिकारही नाही, कारण मी कधी कौल लावला नाही व कुणी लावताना तिथं हजरही नव्हतो. मला तुम्हाला सांगायचंय ते ‘कौल’ या शब्दाबद्दल, या शब्दाच्या जन्माबद्दल.
हल्ली एक पुस्तक वाचतोय. श्री. अरविंद गोखले यांचं ‘असाही पाकिस्तान’ या नांवाचं. पाकिस्तान आणि तेथील सांस्कृतिक जगताची धावती ओळख वाचकांना करून देणं हा या पुस्तकाचा उद्धेश. पाकिस्तानातील सामान्य लोकांची भारताबद्दल दुश्मनी नाही, असलीच तर असुया आहे हे देखील हे पुस्तकं सांगतं. पाकिस्तानातल्या मानवी हक्काच्या, लोकशाहीसाठीच्यी चळवळी, राज्यकर्त्यांचं दुटप्पीपण या विषयी हे पुस्तक माहिती देत. पाकिस्तान हे आपलं शत्रुराष्ट्र असल्याने, या देशावरील जी उलट सुलट मतं नोंदवलेली पुस्तकं असतील, ती पुस्तकं वाचायची ही माझी सवय आहे. शत्रुबद्दल जास्तीत जास्त माहिती असावी हा माझा यामागचा उद्देश. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानबद्दल परस्परविरोधी मतं अहमिहीकेने मांडणाऱ्या या पुस्तकांचं, ‘पाकिस्तानातील सामान्य जनतेला भारताचा द्वेष नाही, तर आकर्षण वाटते आणि आपल्याला तसं राहाता येत नाही यासाठी भारताची असुयाही वाटते’, यावर मात्र एकमत आहे.
असो, आता तुम्हाला वाटेल, की ‘कौल’वरून मी थेट पाकिस्तानात का गेलो म्हणून. तर, पाकिस्तानावरील श्री. अरविंद गोखले यांचं वरील पुस्तक वाचत असताना, मला मुख्यत्वेकरून आपल्या देवाशी निगडीत असा, आपल्या प्रचंड आस्थेचा, श्रद्धेचा, लेखाच्या सुरुवातील उल्लेख केलेला ‘कौल’ हा शब्द भेटला. आपल्या श्रद्धेचं स्थान असलेला ‘कौल’ हा शब्द चक्क अरबी आहे. होय, इस्लाम धर्माचं जन्मस्थान असलेलं अरबस्थान आणि त्याचं इस्लामची पवित्र भाषा असलेल्या अरबी भाषेनं आपल्या जिव्हाळ्याच्या, श्रद्धेय अशा ‘कौल’ ह्या शब्दाला जन्म दिला आहे. ‘कौल’चा अरबी अर्थ आपण समजतो तसा ‘ईश्वरी प्रसाद’ असाच आहे. याच ‘कौल’वरून ‘कव्वाली’ हा शब्द निर्माण झाला आणि कव्वालीचा अर्थ ‘इस्लामी भक्तिगीत’ असा आहे. इस्लामी देशात कव्वाली प्रेषिताचं भक्तिगीत म्हणूनच गायलं जातं. आपल्या सिनेमावाल्यांनी कव्वालीचं रुपडं पार बदलून टाकलंय, ही गोष्ट वेगळी..!
‘कोल’ हा शब्द डिक्शनरीत शोधला असता, तो अरबी आहे आणि त्याचा अर्थ ‘ईश्वरी वचन’ असा आहे असाच उल्लेख सापडला..! याचा अर्थ मुसलमान आणि आपण हिन्दू, देवाच्या प्रसादासाठी ‘कौल’ हाच शब्द वापरतो. दोन परस्परविरोधी तत्वज्ञान सांगणारे धर्म देवाकडे मात्र ‘कौल’च मागतात हे मला अचंबित करणारं वाटतं.
ही भाषेची गंम्मत आहे. भाषा जात-पात-धर्म-पंथ आणि देशांच्याही पलिकडे जाता जाता, या सर्व परस्परविरोधी अशा गोष्टींना जोडतही जाते. भाषा धर्मावरही मात करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे बांगलादेशाची निर्मिती. पाकिस्तानचा भाग असलेला बांगला देश केवळ भाषेमुळे पाकिस्तानातून फुटून वेगळा झाला. इस्लामी ‘खुदा’ हा चक्क फारसी आहे. आणि ‘येशू’चं मुळ आपल्या ‘ईश’म्धे शोधता येतं. भाषा सर्व जात-पात-धर्म-पंथ-देशांमा जोडून उरते.
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply