नवीन लेखन...

कौल रघुनाथाचा

कौल रघुनाथाचा हे 27 ओळींचे अत्यंत मौलिक असे वेणास्वामीने रामरायाला मागितलेले पसायदान आहे. कौल म्हणजे आधार, आश्वासन, संमती. या कौल रघुनाथामध्ये वेणास्वामींनी आपल्या कल्पनेने रामरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन फार सुंदर शब्दात केले आहे.

दिल्ही भेटी भरतासी उत्सव गाजे ।

रघुराज राज्याभिषेके विराजे ।

रामराय वनवासातून परत आले. राम भरताची गळाभेट झाली. भरताने व अयोध्येतील लोकांनी रामरायाचे मोठÎा उत्साहाने स्वागत केले. सर्वांचे कुशल ऐकल्यानंतर रामरायांचा राज्याभिषेक करायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे रघुनाथांचा मोठा राज्याभिषेक होऊन ते सिंहासनावर विराजमान झाले. राजाचा आधार वाटून प्रजा रामरायाला भेटायला येऊ लागली.

प्रभूने अनुज्ञा दिल्ही देवइंद्रा  ।

सवें देव तेतीस कोटी निघाला ।। 2 ।।

रामरायांनी रावणाच्या बंदिवासातून देवांची सुटका केल्यावर रामाच्या पराक्रमाने प्रभावित होऊन इंद्रदेव, अनेक भूपाळ, तेहतीस कोटी देव, अनेक राज्यांचे राजे महाराजे, रामरायाच्या राज्याभिषेकाच्या वेळी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यास आले. राज्याभिषेकाचा सोहळा पाहून सर्व संतुष्ट झाले.

रावणाच्या भीतीने लोक लपून बसले होते. तेंव्हा इंद्रदेव लोकांच्या मनातील भीती ओळखून स्वत: मार्गात उभे राहून लोकांना सांगत आहेत, ज्या रावणाला घाबरून भिऊन लोक पळून जात आहेत त्या रावणाला रामाने मारुन बंदिशाळेतील सर्व देवांची सुटका केली आहे. म्हणून आता रामरायाच्या राज्यात गुढी उभारली आहे.

खडाणा गौऊ जाहल्या कामधेनू ।

वने वल्ली कल्पतरू काय वानूं ।। 6 ।।

सिंहासनावर गरीब अज्ञानी लोकांचे कल्याण करणारा गरिबांचा कैवारी अयोध्येचा भाग्यसूर्य प्रभू रामराजा बसल्यामुळे लोकांची सर्व पीडा संताप वैताग व त्रासातून सुटका झाली. रामराजाला पाहून लाथा मारणाऱया तसेच दूध न देणाऱया गायी जणू कामधेनु होऊन मनात इच्छिले तितके दूध देऊ लागल्या तर वनातील सर्व लता वेली वृक्ष यांना कल्पतरुचे महिमान प्राप्त झाल्यामुळे हे सर्व इच्छिलेले फळ देऊ लागले.

खडे सूर्य चिंतामणी परीस गोटे ।

मला देखता थोर आश्चर्य वाटे ।

रस्त्यावरचे पडलेले दगडगोटे हे चिंतामणी झाले. सगळी अयोध्यानगरी ही अशा कामधेनू ,  चिंतामणी, कल्पतरू यांनी नटली सजली बहरली आहे. आणि त्यामुळे लोकांच्या नुसते मनात यावे आणि ते असे अपेक्षेहून आगळे वेगळे वंद्य जे जे सुख आहे ते ते पूर्ण होऊन जावे असेच होऊ लागले. प्रजेचे रामरायावर एव्हढे प्रेम की रामरायाच्या राज्याभिषेकाचा सोहळा नयनात साठवण्यासाठी माणसांबरोबर मुले स्त्रिया आणि पशुपक्षी सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

राजा इंद्र अयोध्येहून परत आपल्या राज्याकडे जाताना लोकांना सांगू लागला – लोक हो ! मी आताच राज्याभिषेकाचा सोहळा मोहोत्सव उत्सव पाहून आलो. सर्व राजे देव सर्वांना या सोहळ्याचा खूप आनंद झाला असून देवांनी सुद्धा रामरायाचा जयजयकार केला. आता लोकांनो तुम्ही सुद्धा मनातील क्लेश भीती सगळे सोडून देऊन आपल्या रघुराजाला पाहण्यास जा.

प्रजा कष्टल्या चालिल्या शीण सांगो ।

अयोध्याधीशा राघवा कौल मागो ।

इंद्र राजाने सांगितल्यानंतर कष्टी झालेले लोक आपल्याला झालेला त्रास सांगण्यासाठी आणि रामरायाला कौल म्हणजे मागणे मागण्यासाठी अयोध्याधीश राजा प्रभू श्रीरामाकडे धावत आले. राजाने सर्वांना सभामंडपात बसवण्यास सांगितले. सभामंडप गच्च भरला.

रघुराज सिंव्हासनी सौख्यदाता ।

प्रजा कौल मागावया त्या उदिता ।

प्रभू बोलिला रे अपेक्षित मागा ।

नका हेत ठेऊ समस्तैक सांगा ।।14।।

सभामंडपात आल्यावर प्रभूरामाला पाहून लोकांनी नमस्कार करीत जयजयकार केला. कृपासागर प्रभूरामाने भेटायला आलेल्या सर्व प्रजेला जे अपेक्षित आहे ते मनात संकोच न बाळगता मागा असे सांगितले.

या पसायदानातील खरी गोडी, यातील उच्च कोटीची भावना या 15 व्या ओवीपासून सुरु होते. या 15 व्या ओवीपासून ते पुढे 26 व्या ओवी पर्यंत शेवटचा चरण फक्त एकच आहे तो म्हणजे  वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।। . वेणाबाईचे रामराया, लक्ष्मणाला सांगत आहेत, हे लिहून ठेव कारण येणाऱया प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे मागणे विसरून न जाता आठवणीने जबाबदारीने मायेने पूर्ण करायचे आहे. म्हणून रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मण सर्व मागण्या लिहून त्यांची नोंद ठेवत आहे. राघव आणि वेणास्वामी यांच्यातला केव्हढा हा भक्तिभाव जिव्हाळा वात्सल्य प्रेम.

भूमीने कदा पीक सांडू नये रे ।

मनासारिखे मेघवृष्टीने व्हावे ।

लोक म्हणतात राजा आपल्या या स्वदेशात आपल्या या राज्यात फार दैना झाली. म्हणून आता जमिनीत बीज पेरले आणि ते कोणत्याही कारणाने रुजले नाही असे बीज जमिनीत सांडून वाया गेल्यासारखे होऊ देऊ नकोस. मनासारखी  मेघवृष्टी व्हावी. पिकावर रोगराई नको

पिके देखता सर्व चित्ते निवाली ।

असावी गृही संग्रही पेव पाली ।

शेतातील पिके पाहून मनाला आनंद व्हावा. भरभरून पिक आल्यावर घरातील पेव पाली कणगी तळघर सगळी धान्याने भरून जावीत. पुन्हा पुढच्या पेरणीसाठी कोणाला बियाणे मागण्याची गरज पडू नये असे कसदार पिक येऊ दे. बळीराजासाठीची वेणास्वामीची ही भावना किती उच्च कोटीची. घरात दुभत्या गायी नुसत्या दुभत्या गायी नाही तर कामधेनु गायी. इच्छिले ते देणाऱया गायी असू दे. वासरे , बैल गाडÎा आहे असे यथेष्ट भाग्य दे . घरात धनधान्य दुध दही लोणी तूप अशी समृद्धी दे.

मनासारिखी पुत्र कन्या कलत्रे ।

अभिवृद्धि वाढो पवित्रे विचित्रे ।

सखी पारखी सोयरी प्रीति दे रे ।

वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।।19।।

उदंड पीक आल्यामुळे धनधान्य समृद्धी होऊन व्यवसायातील सुख शांती समाधान आनंदाने साजरे करण्यासाठी घरात लेक जावई, मुले सुना नातवंडे यांची अभिवृद्धी होऊन घराचे गोकुळ होऊ दे . तसेच शेजारी पाजारी सोयरे नातेवाईक कोणी कुरूप वृध्द नसू देत. कोणी अपंग आंधळे म्हणून दु:खी असे होऊ देऊ नकोस दिनानाथा. सर्वांचे राशी ग्रहमान शुभशुभ असू दे कारण या शुभ योगाने कोणाचेही कधीही केंव्हाही कांहीही वाईट होणार नाही, कोणतीही वाईट विघ्नवार्ता कोणाच्याही घरात कधीही येणार नाही.

सदा वासना धर्मपंथे असावी ।

दयाशील चातुर्यता श्रेष्ठ द्यावी ।

समर्था प्रभू पापबुद्धी नको रे ।

वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।।22 -1 ।।

दयाशील चातुर्यता श्रेष्ठ द्यावी ।

समबुद्धि सर्वत्र भूती असावी ।

रघुनाथजी सर्व कल्याण दे रे ।

वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।। 22 -2 ।।

नको दु:ख आम्हा नको शोक आम्हा ।

तुझे राज्य तो मृत्यु नकोचि आम्हा ।

रघुनाथजी सर्व सौख्यासी दे रे ।

वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।।23।।

सर्वांच्या मनात नीतीधर्माची वासना असावी. लोकांच्या मनात दया चातुर्य असावे. कोणाच्याही मनात वासना विखार, पापबुद्धी नसू देत. मनात धर्माचे नीतीचे विचार असू देत. लोकांच्या मनात समत्वबुद्धी, दानत, द्या, क्षमा शांती, उदारता, चातुर्य असावे. रघुनाथा सर्वांचे कल्याण होऊ दे. कोणालाही दु:ख शोक नको. कारण त्या  दु:खामुळे मनात घरात उदासीनता राहील. तसेच रघुनाथा तुझ्या राज्यात कोणालाही अकाली मृत्यु येऊ देऊ नको. तुझे राज्य ती  मृत्युभूमी नको. कारण अकाली मृत्यूचे दु:ख वेणाबाईंनी सोसले होते. सहन केलेले होते. त्या अकाली मृत्यू येण्याचे दुसऱया जिवांचे होणारी दयनीय अवस्था, जीवाला होणाऱया करुन यातना वेणाबाईंनी सोसलेल्या होत्या. एकाचया अकाली मृत्यूने संपूर्ण कुटुंबाची होणारी हानी त्रास वेदना याचा अनुभव वेणाबाईंनी स्वत: अनुभवल्यामुळे त्या आठवणीने या याताना कोणाच्या ही वाटÎाला येऊ नयेत. सर्वांना सौख्य दे. असे अगदी आठवणीने प्रभूश्रीरामाला सांगत आहेत. आणि प्रभू श्रीरामाच्या सांगण्यावरून लक्ष्मण हे लिहून ठेवत आहे.

प्रीतीने प्रजा पाळी रे रामराया ।

नको दैन्यवाणी करी दिव्य काया ।

शरीरी कदा रोगराई नको रे ।

वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।।24।।

कुडे खोडी कापटÎ कांही नसावे ।

सबाह्ये शुचिष्मंत सत्ये जगावे ।

तुझ्या दर्शनी आडकाठी नको रे ।

वदे लक्षुमणा हे लिही रे ।।25 – 1।।

प्रपंची भुलोनी तुला विसरावे ।

अशी वासना दुष्ट रामा नको रे ।

वदे लक्षुमणा हे लिही रे ।।25 – 2।।

लोकांना दैन्य, दारिद्र्य, रोगराई, खोडी कपटी स्वभाव, दुष्ट वासना, क्लेश असे कांहीही नको. प्रजेला प्रेमाने पाळ. सगळे शुचिष्मंत सत्याने वागणारे दिव्य काया असलेले, कोणतीही रोगराई नसलेले, मनाने रसरसलेले असू देत. सर्वांचे कल्याण होऊ दे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आता लोकांना रामरायाची गरज नाही म्हणून तुझ्या दर्शनाला आडकाठी न येऊ दे. प्रपंचाच्या आनंदात सुखात लोक तुला विसरून गेले अशी दुष्ट वासना लोकांची होऊ देऊ नकोस.

शेवटचे मागणे वेणाबाई रामरायाला मागत आहेत —–

प्रभू क्लेश घेऊन विश्रांति द्यावी ।

देहे तोवरी भक्ती तुझी घडावी ।

वेणीस्वामी ऐसापरी कौल दे रे ।

वदे राम लक्षुमणा हे लिही रे ।।26।।

रघुनाथजी कौल देऊनि आम्हां ।

कृपाळूपणे पाळिजो श्री रामा ।

म्हणे वेणीस्वामी ऐसापरी कौल दे रे ।

अहो रामराया ।।27 ।।

वेणास्वामी म्हणतात, प्रभू क्लेश दु:ख यातना नको. शांती समाधान लाभू दे. त्यामुळे जीवाला विश्रांती लाभेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत रामरायाची अनन्य भक्ती घडू दे. त्या भक्तित कधीही खंड पडू देऊ नकोस. देवाच्या भक्तित कोणतेही विघ्न येऊ देऊ नकोस . वेणाबाईला  खात्री विश्वास आहे आपल्या सर्व इच्छा रामराया पूर्ण  करणार याची. वेणाने रामारायाकडे आणि रामराया वेणाकडे कृपाळूपणे पाहिले. त्या नजरेत एकमेकांबद्दलचा विश्वास होता. आश्वासन होतं. सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं आणि सगळ्या इच्छा पूर्ण होणार याचंही. या रामराया आणि वेणाबाईच्या, देव आणि भक्ताच्या नात्याचे वैभव तरी पहा कसे की, देवाने यातील कोणतेही मागणे आपण विसरू नये, त्यामुळे आपल्या लाडक्या भक्ताच्या मनाला क्लेश दु:ख होऊ नये, या मागण्याची आठवण राहावी म्हणून, लक्ष्मणाला हे सर्व मागणे लिहून ठेवून पूर्ण करण्यास सांगावे. यातच वेणाबाई यांचा राम दरबारी असलेला अधिकार दिसून येतो.

अद्वैताची अनुभूती आणि पराभक्ती या दोन्हींचा अपूर्व संगम इथे पाहायला मिळतो. रामरायाला मागणे मागतानाचा अत्यंत उच्चकोटीचा भाव, लोकांबद्दल मनात असलेली उदात्त भावना, यातून अंगी आलेले विवेक, वैराग्य, शांती समाधान, गुणातीतता, स्थितप्रज्ञता या दैवीगुणांचे दर्शन घडवते.

धन्य धन्य वेणाबाई ! रामरायाला मागणे मागावे तेही जगाच्या कल्याणासाठी . समर्थांच्या शिकवणीत तावून सुलाखून निघालेली आणि पूर्णत्वाला गेलेली वेणां या  कौल रघुनाथाला  या त्यांच्या पसायदानातून दिसून येते. समर्थां सारखाच विश्वात्मक विचार करणाऱया वेणास्वामी म्हणजे पूर्ण ज्ञानाचा मूर्तिमंत अविष्कार होय. वेणास्वामींच्या अंत:करणाला भक्तीचा गहिरा रंग आल्याने रामरायावरच्या दृढ विश्वासाने त्यांनी रामरायाला हे पसायदान मागितले आहे. वेणास्वामीच्या या मागण्याकडे पाहताना माऊलीच्या पसायदानाची आठवण येते.

ज्या ज्या वेळी वांग्मयरुपी यज्ञ सिद्धीला गेला त्या त्या वेळी सर्व संतांनी विश्वकल्याणासाठी भगवंताशी लडिवाळ संवाद साधत कृपाप्रसादरूप पसायदान मागितले आहे. संतज्ञानेश्वर माऊली, संततुकाराम संतनामदेव संतएकनाथ आणि समर्थांनीही पसायदान मागितले.

 जय जय रघुवीर समर्थ

-सौ. विद्या कृष्णा लव्हेकर
मो. 8975052500

विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..