अचानक आलेला पैसा माणसाला एक तर वर काढतो किंवा होत्याचं नव्हतं करुन टाकतो. पैसे मिळणाऱ्याकडे जर विवेकबुद्धी असेल तर तो आर्थिक नियोजन करुन पैसे कारणी लावतो. अन्यथा काही दिवसांतच तो कफल्लक होऊन जातो.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या बाबतीत असाच एक किस्सा घडलेला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना काही लाख रुपयांची लाॅटरी लागली. त्या काळात लाख रुपयांना आजच्या कोटीएवढी किंमत होती. अचानक झालेल्या धनलाभामुळे त्यांना हर्षवायू झाला. परिणामी त्यांच्या बुद्धीमतेत फरक पडल्यामुळे त्यांना गीतं लिहिणे देखील पहिल्यासारखे जमेनासे झाले. त्यांचं संपूर्ण करीयर बरबाद झालं.
एका नाट्य व्यवस्थापकाला लावणीच्या कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना लाखो रुपयांची कमाई झाली. त्याने जेवढी करता येईल तेवढी स्थावर जंगम मालमत्ता जमा केली. मात्र जवळच्याच मित्रांच्या संगतीने त्याच्या व्यसनांना सुरुवात झाली. पैसे नको तेवढे उधळले जाऊ लागले. काही वर्षांतच जमा केलेली मालमत्ता रोडावत गेली. जेव्हा तो भानावर आला तेव्हा हातात काहीही उरले नव्हते. चूक झालेली होती, पश्र्चाताप करुन उपयोग नव्हता. आजही त्याला रस्त्याने पायी फिरताना पाहून म्हणावेसे वाटते… ‘काय होतास तू, काय झालास तू…’
२०११ साली ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर बिहारमधील सुशीलकुमार याने पाच कोटी रुपये जिंकले होते. एका रात्रीत तो सेलेब्रिटी झाला. एवढे पैसे आल्यावर काम करायची गरजच काय? विविध कार्यक्रमांना हजेरी, सत्कार, समाजोपयोगी कार्यक्रमांना देणगी, असे खर्च करणे सुरू झाले. अगदी दर महिन्याला जवळचे लोकं काहीही कारण सांगून त्याच्याकडून पैसे घेऊन जायचे.
पुढे मित्रच स्वार्थी निघाले. त्यांनी त्याला दारु, सिगारेटचे व्यसन लावले. त्याला कोणताही अनुभव नसल्यामुळे तो कुठेही पैसे गुंतवू लागला. अगदी सिनेमाचा ही त्याने विचार केला. अशा वाईट संगतीने तर त्याचेकडील पैसे कमी होऊ लागले.
काही वर्षांनंतर त्याचेकडील पैसे संपले. जे लोक त्याच्या मागेपुढे करीत होते, ते त्याला टाळू लागले. सर्वांनी त्याला बेदखल केले.
आता तो सावरतोय. दोन गायी घेऊन त्यांच्यावर तो उदरनिर्वाह करतोय. त्यानं आता स्वतःच कबूल केले आहे की, पैसे आले की श्रीमंती आली असं नाही. आर्थिक साक्षरता असणं महत्त्वाचं आहे. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आपल्याकडे किती पैसे आहेत त्यापेक्षा आपण ते कसे वापरतो हे महत्त्वाचे आहे….नाही तर ‘एक दिन का सुलतान और सौ दिन का फकीर’ होणारच…
– सुरेश नावडकर १६-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply