तो असतो बसलेला नेहमी कुणाच्या-
ग्रिलच्या दांडीवर कर्कश्श ओरडत,
एखाद्या भिकाऱ्यासारखा पोटाला मागत.
पितृपक्ष वजा केला तर –
त्याला फक्त झिडकारणीच मिळते.
गरिबाला कुठे असते आवड निवड ?
त्याच्या नशिबी नेहमीच हड हड.
तसं बिचाऱ्याला काहीही चालते ,
पाव ,गाठ्या,शेवापासून उकिरड्यापर्यंत-
नकारघंटा अगदी कशालाच नसते.
नाक मुरडणं, तोंड फिरवणं काही नाही,
कौतुकाने त्याला काहीच ठेवत नाही कुणीही.
कर्कश्श भिकाष्टक अगदी असह्य होतं,
तेव्हा कुठे वैतागून ठेवलेलं समोर येतं.
Etiquettes, manners भिकाऱ्याला कुठले?
चिमणी, कबुतरासारखे नेमके चोचीने टिपले.
संशयाने दबकत टुणटुणत तो अन्नाकडे येतो,
भीतीने त्यातलं अर्ध, लवंडून ठेवतो.
थोडसच लागतं चोचीला काही,
उगीच शिवाशिव होईल म्हणून उडून जायची घाई.
इतरांसारखा तो , गुंतत नाही कधी कुणात,
काळं तोंड घेऊन, उडून जातो एका क्षणात.
उंच फांदीवर जाऊन बहुधा,घर ठेवतो लक्षात,
ताटकळवायच की नाही घराला?,येत्या पितृपक्षात.
प्रसादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply