फळ आज हे मधूर भासते,
तपोबलातील अर्क असे
कष्ट सोसले शरिर मनानें,
चिज तयाचे झाले दिसे…..
बसत होतो सांज सकाळी,
व्यवसाय करण्या नियमाने
यश ना पडले पदरी.
केव्हा मान फिरविता नशीबाने….
निराश मन सदैव राहूनी,
मनीं भावना लहरी उठती
शब्दांना आकार देवूनी,
लेखणी मधूनी वाहू लागती…
लिहीता असता भाव बदलले,
त्यात गुरफटलो पुरता
छंद लागूनी नशाच चढली,
जीवनामधील रंग बघता…
त्या रंगाच्या छटा उमटल्या,
फुला फुलातूनी दिसूनी येती
सप्त रंगाचे मिलन दिसले,
आकाशाच्या क्षीतीजावरती….
काव्यावरती जगेल कोण,
हवी भाकरी जगण्यासाठी
मानहानी ती सदैव होई,
केवळ अल्पशा पैशापोटी…
मदत कुणाची मिळत होती,
आला दिवस निघून जाई
काव्यातील आनंदात परि,
डुबता सारे विसरून जाई
विवंचना आणि सुख दु:खे,
बनली होती स्फर्ती देवता
अनुभवले जे जे आजवरी,
चित्रीत झाले बनूनी कविता,
अनुभव होता तना मनाचा,
म्हणूनी भासले सत्य काव्य ते
उचलून घेतले जनसामान्यांनी,
मनास त्यांच्या पटले होते….
लपली असती कला एक ती,
सर्व जणांच्या अंतरंगी
परिस्थितीशी झगडा देवूनी,
बाहेर आणती कुणी प्रसंगी….
गेलो विसरूनी उदास दिन ते,
आज उमटले चित्र निराळे
सरस्वती आणि लक्ष्मी दोघी,
आशीर्वाद त्यांचा मजला मिळे
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply