ठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता.
आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. गोव्याच्या सर्व व्यवस्थापनाचे काम तिच्याकडेच होते. संपूर्ण कार्यक्रमात खाँसाहेबांच्या आग्रहानुसार माझ्याकडे खास लक्ष पुरविऱ्यात येत होते. मला अगदी लाजल्यासारखे झाले पण त्यामुळे एक मात्र झाले वासंतीचा सहवास मला पदोपदी मिळत होता. खाँसाहेबांच्या नजरेतून आमची नजरानजर सुटणे शक्य नव्हते! त्यांनी मला विचारलेच, “क्यूँ बेटे, इष्कसे दिवाना हुवा लगते हो, मै रुजवात मै करके देखू क्या?”
आणि खरोखर जायच्या दिवशी त्यांनी खुद्द वासंतीकडे विचारणा केली, “बेटी, ये वसंता मेरा लडका समझो. अगर तुम्हारा हाथ इसके हाथों मे दे सकूँ तो मुझे बहोत खुशी होगी!” मी म्हणालो, “खाँसाहेब अगर ऐसा हुवा तो मै बडा भाग्यवान समझूगा अपने आपको!” मग आमच्या दोघांच्याही घरच्या लोकांची संमती घेऊन आमचे लग्न मोठ्या धुमधडाक्याने झाले. खाँसाहेबांनी त्यांचा प्रोग्रॅम विनामूल्य करून मला कायमचे उपकृत करून ठेवले. अशा त-हेने वासंती माझ्या आयुष्यात आली. हा बंगला खाँसाहेबांनी माझ्या लग्नाचा आहेर म्हणून आम्हाला घेऊन दिला! पसंती मात्र वासंतीची!
वासंती गोव्यातील ज्या ‘पोर्वोरिम’ भागात रहात होती तिथे ख्रिश्चन वस्ती खूप होती. त्यामुळे लहानपणापासून तिला ख्रिश्चन रितीरिवाज, संडेमास, कार्निवाल, नाताळ या सर्वांची हिंदू रितीरिवाजांसारखीच आवड होती. तिचे पुष्कळ मित्र मैत्रिणी ख्रिश्चन होते. त्यांच्याबरोबर ती रविवारी चर्चमध्ये पण जात असे.
मला मात्र चर्च आवडत नाही. तिथे गेल्यावर एक प्रकारची स्मशान शातंता मला जाणवते. तो क्रुसावर खिळलेला येशू पाहून रक्त भळभळ वाहणारे एखादे प्रेत टांगले आहे असे वाटून मी फार घाबरतो. वास्तविक मी मेडिकलचा व्यावसायिक, प्रेतागारात शिकलो पण एखाद्या प्रार्थना घराचे प्रेतागार, ही कल्पनाच मला फार भीतीदायक वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. लहानपणापासून झालेल्या सवयीमुळे वासंतीला मात्र चर्च मनापासून आवडायचे. खरे तर हा बंगला आम्ही घेतला म्हणजे वासंतीने पसंत केला याचे एक कारण म्हणजे याच्या समोरच एक चर्च आहे. वासंतीच्या ओळखीचे एक कुटुंब गोवा स्वतंत्र झाल्यावर पोर्तुगाला गेले तेव्हाच आमचे लग्न झाले होते. त्यामुळे त्यांचा हा बंगला आम्ही विकत घेतला. वासंतीलाही त्यामुळे आपण गोव्याच्या वातावरणात आहोत असे वाटायचे. या बंगल्यावर तिचे जिवापाड प्रेम होते.
वासंतीची आणखी एक आवड होती, कावळे! तिला हा पक्षी फारच आवडायचा. घाणीवर टोच मारणारा, प्रेत संस्कार करताना पिंडाला शिवणारा, म्हणून आपण हा पक्षी अपवित्र मानतो. पण त्याच्या इतका चलाख, चपळ आणि स्वच्छ पक्षी नाही. तुम्ही नीट बघितलेत ना तर दिसेल तुम्हाला, की हा पक्षी सतत आपली चोच घासूनपुसून साफ, लखलखीत ठेवत असतो. रंग काळा असला तरी नेहमी स्वच्छ तुकतुकीत दिसतो. आता आवाजाची देणगी नाही हे खरं!
‘पंचरंग’ च्या एका कार्यक्रमाला प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना गोव्याला बोलावले होते. तेव्हा त्यांनी त्यांचा आवडता पक्षी कावळा आहे असे सांगून सर्व उपस्थितांना धक्काच दिला होता. प्रख्यात चित्रकार हुसेन हे घोड्यांच्या चित्रासाठी प्रसिद्ध आहेत, तसं लक्ष्मणना कावळ्यांची चित्रं रेखाटायला खूप आवडतं हे वासंतीने मला सांगितलं. तेव्हा मलाही खूपच आश्चर्य वाटलं होतं.
या बंगल्यात आम्ही दोघं आणि आमचा मुलगा अलोक राहत होतो. पुढे अलोक ऑस्ट्रेलियाला गेला आणि तिकडेच स्थायिक झाला. लग्नही तिकडच्याच एका भारतीय मुलीशी केले. मग आम्ही दोघंच या बंगल्यात उरलो.
हळूहळू आजूबाजूचे बंगले एकएक करत बिल्डरांच्या घशात गेले आणि त्यांच्या जागी उभ्या राहिल्या मोठ्या टोलेजंग क्राँकिटच्या इमारती. प्रत्येक इमारत वेगळी. शेजारच्या इमारतीशी काही लागा बांधा नाही अशी अलिप्त! कोरडी! वासंतीने मात्र हा बंगला विकायला कधीच संमती दिली नाही. खूप बिल्डर कावळे आले पण तिने काही त्यांना दाद दिली नाही. खऱ्या कावळ्यांना मात्र आमच्या बंगल्यात मुक्तद्वार! मग लोकांनीही आमचा नाद सोडला.
बंगल्याला एक गच्ची आहे. आम्ही बरेच वेळा तिथे बसायचो, झोपाळ्यावर! पण वासंतीला अर्धांगाचा झटका आला आणि तिच्या अंगाचा एक भाग लुळा पडला. मग आम्ही या व्हरांड्यात बसू लागलो. झोपाळाही इथेच टांगून घेतला. वासंती तासन् तास या झोपाळ्यावर बसायची.
एके दिवशी, तो अमावस्येचा दिवस होता. आम्ही असेच ब्रेकफास्ट घेत बसलो होतो, तेव्हा अचानक वासंती ओरडायला लागली, “अलोक, अलोक! थांब, थांब, मी आले रे राजा!”
मला कळेना, हिला असे अचानक ओरडायला काय झाले ते! मी पटकन उठून तिच्याकडे धावलो तर ती खुर्चीतून उठायचा प्रयत्न करू लागली आणि मग एकदम डोळे गरगर फिरवून लोळागोळा होऊन खुर्चीतच कोसळली! मी ओळखले तिचे आयुष्य संपले ते!
क्षणभर मला काहीच सुचेनासे झाले. डोळ्यापुढे अंधार पसारल्यासारखे झाले. मी सुन्नपणे बसून राहिलो आणि मग एकदम उठून फोनकडे धावलो आणि अलोकला फोन लावला. बराच वेळ फोन लागेना. तासाभराने लागला तो त्याच्या मित्राने घेतला. तो पण मलाच फोन करत होता! त्याने अलोक आणि त्याची बायको घरी येत असता तासाभरापूर्वीच कार अपघातात गेले असे मोठ्या दु:खाने सांगितले आणि मला वासंतीच्या ओरडण्याचा अर्थ लागला! शेवटच्या क्षणी अलोकने आई, आई अशा हाका मारल्या असणार, त्याच वासंतीला ऐकू आल्या जणू! आता माझे सर्वच संपले होते!
पुढे सर्व विधी जे करायचे ते मी यथासांग केले. वासंतीचा अशा गोष्टींवर फार विश्वास होता. वर्षश्राद्ध वगैरे भाकड कथांवर माझा फारसा विश्वास नाही पण मरणोत्तर जीवनावर वासंतीचा मात्र विश्वास होता. वासंती गेल्यावर मला ते पटले. तिचा वावर मला जाणवतो. ती या खुर्चीत किंवा झोपाळ्यावर बसलेली, मी कितीतरी वेळा पाहिली आहे! झोपाळा हलायला लागला की तिचे हे मित्र आजूबाजूचे सर्व कावळे, व्हरांड्याच्या कठड्यावर जमा होतात! मग मला त्यांना काहीतरी खायला टाकावेच लागते. तेव्हा वासंतीचा आत्मा शांत होतो असे मला वाटते! पाव्हणे हा तुम्हाला वेडेपणा वाटेल पण माझातर बुवा असा विश्वास बसायला लागला आहे.
वासंती गेल्यापासून मला हे ‘कावळे’ फारच आवडायला लागेत बरं का पाव्हणे! तो तिचा मित्र परिवारच आहे ना! बघा या व्हरांड्यात आणि आत घरात सुद्धा जागो जागी कावळ्यांचे फोटो आणि चित्रे लावली आहेत. ती सगळी वासंतीची करामत बरं का पाव्हणे!
-विनायक रा. अत्रे
Leave a Reply