नवीन लेखन...

कावळे (कथा) – भाग 4

वासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू आपल्याच घरात शिरतोय अशा रूबाबात सोळा पायऱ्या चढून वर आला! पायऱ्या चढून त्याला धाप लागली होती!

खरेतर, न सांगता सवरता असं कोणी आलेलं मला खपत नाही. माझं मस्तकच सणकतं. पण सभ्यपणाची मर्यादा न सोडता म्हणालो, “बसा!” तो धप्पकन खुर्चीत बसला. म्हणण्यापेक्षा कोसळलाच! आपला पांढरा शुभ्र रुमाल त्याने काढला, त्याबरोबर भडक मादक सेंटचा घमघमाट पसरला! रुमालाने त्याने आपला सोनेरी काड्यांचा चष्मा सावकाश पुसला. मानेवरच्या वळ्या पुसल्या आणि माझ्याकडे पाहायला लागला. त्याचे पाहणे मोठे विचित्र होते. कावळ्यासारखी एकदा मान इकडे, एकदा तिकडे, एकदा वर असे करत करत म्हणाला, “माफ करा हं साहेब! न सागंताच आलो म्हणून. मी त्रिनेत्र विरुपाक्ष! ‘विरूपाक्ष कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक! या भागात नवीनच आहे. आपल्याला हा बंगला विकायचा नाही असे मला समजले. पण आपण समक्षच गाठ घेऊन विचारावे आणि खात्री करावी म्हणून आलो. साहेब आपण एकटेच आहात असे समजले. आपल्या काय अटी, शर्ती असतील त्या मी सगळ्या पुऱ्या करीन. आपण ही जागा मला दिलीत तर फार आनंद वाटेल मला. अहो असल्या जुन्या इमारती म्हणजे खायला काळ आणि भुईला भार! काय करायचंय सांभाळून!” त्याच्या शेवटच्या वाक्याने माझी तळपायाची आग मस्तकी गेली. खूप संताप आला. सगळ्या गोष्टी पैशात मोजणाऱ्या असल्या पाजी हलकटाला चांगला धडा शिकवायचा असा मी मनाशी निश्चय केला. पण वरकरणी नम्रतेचा आव आणून म्हणालो, “मला थोडा वेळ द्या विचार करायला. अशा गोष्टी फार झटकन नाही सोडता येत. मी विचार करतो मग ठरवू आपण काय करायचे ते!”

जिथे आपले काम होणार नाही अशी त्याला शंभर टक्के बातमी होती तिथे मी विचार करतो म्हणतो आहे हे ऐकून त्याच्या तोंडातून आता लाळ टपकतेय की काय असे मला वाटू लागले. त्याचे भोकरासारखे डोळे आनंदाने चमकू लागले. ते डोळे पाहून मला त्या मुखवट्याच्या डोळ्यांची आठवण झाली. मी त्याला म्हणालो, “मला एक महिन्याची सवलत द्या. मग मी तुम्हाला कळवीन.

तो एकदम उठला आणि माझे दोन्ही हात पकडून आनंदाने जोरजोरात हलवू लागला. म्हणाला, “साहेब, अहो एकच का चांगले दोन महिने घ्या की! माझे काही म्हणणे नाही!”

आता बघा, पाव्हणे, जागा माझी, बंगला माझा आणि हा लेकाचा म्हणतोय, एकच काय चांगले दोन महिने घ्या! अरे वारे वा! काय उपकार करतोस काय रे माझ्यावर? इतका हवरट माणूस माझ्या पाहण्यात नव्हता! शिवाय त्याने माझे हात हातात घेतले हा त्याचा आगाऊपणा म्हणजे तर अगदी कळसच झाला!

मला खात्री होती, वासंती हे नक्की पाहात असणार! तिच्या आत्मा सूडाने पेटला असणार! आता या उद्दाम माणसाला कसा धडा शिकवायचा याचा मी विचार करू लागलो. माझ्या वासंतीच्या बंगल्यावर डोळा ठेवतोस काय बच्चंजी बघतोच तुझ्याकडे!

विरूपाक्ष गेल्यावर मी खूप विचार केला. विरूपाक्षाचा चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर यायचा. त्याचे ते भोकरासारखे डोळे माझ्या खूप नजरेत भरले होते! आणि मला एक भन्नाट कल्पना सूचली की वासंतीनेच मला सुचवली? कोण जाणे, पण सुचली खरी!

वासंतीचा आवडता पक्षी कावळा! मी त्याचीच मदत घ्यायचे ठरवले. कावळा हा फार चलाख पक्षी आहे. तुम्ही एकदा त्याला एखादी सवय लावली ना की तो बरोबर त्याचवेळी तुम्ही लावलेल्या सवयीनुसार वागतो. मी सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर अंड्याच्या पिवळ्या बलकाचे गोळे ताटलीत ठेवतो आणि बरोबर नऊ वाजता झाकलेली ताटली उघडून व्हरांड्यात ठेवतो. ही गोष्ट कावळ्यांना चांगलीच माहीत झाली आहे. बरोबर ९ वाजता भरपूर कावळे व्हरांड्याच्या कठड्यावर जमा होतात आणि झाकण काढले रे काढले की झडप घालून हे सर्व गोळे फस्त करतात! त्यातही दोन कावळ्यांची दादागिरी असते. त्यांनी पहिली चोच मारली की बाकीचे हल्ला बोल करतात! त्या दोन पैकी एका कावळ्याला मी वासंती समजतो. हा माझा रोजचा खेळ झाला आहे.

बरं का पाव्हणे मी याच खेळाचा उपयोग करायचे ठरवले. आता तुम्ही बसला आहात ना, तीच वासंतीची खुर्ची! ती बरोबर पायऱ्यांसमोर आहे. तिथून बंगल्याचा समोरचा सर्व परिसर, रस्ता दिसतो. इथे बसल्या बसल्या वासंतीचा वेळ मजेत जायचा. शेवटी शेवटी ती जरा भ्रमिष्टासारखं करायची. म्हणजे काय की हातात पिवळा बलकाचा गोळा घेऊन बसायची आणि दुसरा हात आडवा धरायची! कावळा तिच्या हातावर बसनूच गोळा उडवायचा! हे म्हणजे जरा अतीच व्हायला लागलं होतं. मग मी तिला हातमोजे आणून दिले. कितीही झालं तरी तो एक कावळा! हातावर बसलेला मला मुळीच आवडायचं नाही ते! पण वासंती मात्र अगदी खदखदून हसायची! एखाद्याला वाटावं ही म्हातारी वेडीबेडी तर नाही ना?

वासंतीच्या खुर्चीवरच मी माझ्या प्रयोगाला सुरुवात केली! त्या खुर्चीवर दोन लोड उभे करून त्यावर मी तो हिरवा मुखवटा ठेवला. जणू एखादा माणूस बसलाय तिथे असा! त्याचे ते पिवळे टप्पोरे डोळे काढले आणि माझा ब्रेकफास्ट झाल्यावर ताटलीतले दोन गोळे मी त्या मुखवट्याच्या डोळ्यांच्या जागी ठेवले! बाकीचे गोळे ठेवलेल्या ताटलीचे झाकण उघडले. कावळे हजर होतेच! त्यांचे म्होरके ते दोन कावळे प्रथम मुखवट्याकडे पाहत बसले. मग कठड्यावरून उडाले ते झोपाळ्यावर जाऊन बसले. झोपाळा पुढे मागे हलू लागला. मी मुखवट्याकडे इशारा करताच झोपाळ्यावरून त्यांनी थेट मुखवट्याच्या डोळ्यांचाच वेध घेतला. त्याचा खाऊ त्यांना मिळाला! मग बाकीचे कावळेही ताटलीतल्या गोळ्यांवर झेपावले! दोनतीन दिवसातच कावळे या खेळात तरबेज झाले.

मग मी आणखी गंमत केली. पिंगपाँगचे चेंडू आणून ते अर्धे कापले. त्याच्या ते मध्यभागी बुबुळासारखे एक भोक पाडले. त्याच्या आत पिवळा गोळा ठेवून दिला! पांढऱ्या डोळ्याला पिवळ बुब्बुळ! हा प्रयोग यशस्वी झाला.

मग मी प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा प्रयोग केला. आता बुब्बुळाच्या जागी भोक न पाडता फक्त काळा रंग दिला. आत गोळा ठेवलाच. पहिल्याच दिवशी कावळ्यांना कळेना काय करावे. मी दोन तीन इशारे केल्यावर त्यांनी झडप मारून डोळा फोडला! आत त्यांचा खाऊ होताच!

पाव्हणे! आता मी खरा प्रयोग करायचे ठरवले. या सर्व कावळा प्रशिक्षण शिबिरास फक्त पंधरा दिवस लागले. त्यानंतर येणाऱ्या अमावस्येलाच मी त्रिनेत्र विरूपाक्षाला सकाळी पावणेनऊ वाजता बोलावले.

तो तर आनंदाने अगदी वेडापिसा व्हायचेच बाकी होते! त्याला वासंतीच्या खुर्चीत बसवून मी थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून वेळ काढत होतो. त्याच्या समोरचा टी-पॉय मी बाजूला केला. म्हणजे त्याला पाय लांब करून ऐसपैस बसता यावे. बोलता बोलता मी त्याला आज वासंतीचा दिवस आहे असे सांगितले.

हे ऐकून तो थोडा दचकला! अशा झटपट पैसा कमावलेल्या लोकांचा अशा भूत, प्रेत समंधांच्या गोष्टींवर विश्वास असतो. आज अमावास्या आहे. ठीक नऊ वाजता वासंती कावळ्याच्या रूपाने येते, तेव्हाच आपण नक्की काय तो सौदा करू असे मी म्हणालो. नऊ वाजायला थोडा वेळ राहिला. व्हरांड्यांच्या कठड्यावर नेहमीप्रमाणे कावळे जमायला सुरुवात झाली होतीच! विरूपाक्ष जागच्या जागी चुळबूळ करू लागला. मी म्हणालो जरा वाट पहा येईलच आता ती. तो झोपाळा आहे ना तिथे येते ती! मी असे म्हणतो ना म्हणतो तोच दोन कावळे झोपाळ्यावर आलेच. क्षणभर त्यांनी विरूपाक्षाकडे पाहिले. विरूपाक्ष भीतीने जणू गार पडला होता! डोळे विस्फारून तो त्या कावळ्यांकडे पाहत होता! मी इशारा करताच कावळ्यांनी विरूपाक्षाच्या डोळ्यांचा वेध घेतला! एक करुण किंकाळी फोडून विरूपाक्ष दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून उठला धडपडतच! पण कावळे त्याला टोचतच राहिले! जिवाच्या आकांताने त्याने पळायला सुरुवात केली ते थेट व्हरांड्याच्या पायऱ्यापर्यंत. तिथे तो एकदम अडखळला आणि खाली कोसळला तो सरळ तळाशी असलेल्या भालाधारी पुतळ्यावरच! पुतळ्याच्या हातातला टोकदार भाला, विरूपाक्षाच्या मानेतून आरपार गेला! फुटलेल्या डोळ्यांतून रक्त भळाभळा वाहत होतेच! त्याच्या किंकाळ्या ऐकून रस्त्यावरचे लोकही धावत आले. मग पोलीस वगैरे सर्व सोपस्कार झाले आणि अपघात म्हणून सर्व संपलं! गोष्ट संपेपर्यंत नऊ वाजायला आले होते. पाव्हणा भान हरपून गोष्ट ऐकत होता. व्हरांड्याच्या कठड्यांवर कावळे जमायला लागले होते. भानावर आल्यावर पाव्हण्याचे तिकडे लक्ष गेले. मी म्हणाले, “पाव्हणे, आजही अमावास्या आहे! वासंतीची यायची वेळ झाली आहे तिला भेटूनच जा!”

एखादा जबरदस्त विजेचा झटका बसावा तसा पाव्हणा खुर्चीतून उठला! मी म्हणतोय, “अहो थांबा, थांबा थोडा चहा तरी घ्या!” पण माझ्या बोलण्याकडे पाव्हण्याचे लक्ष कुठे होते? तो तर केव्हाच बंगल्याच्या फाटकातून धूम पळत सुटला होता! एकदाही ढुंकून सुद्धा मागे न पाहता! माझी हसता हसता अगदी मुरकुंडी वळाली!

मंडळी, आता अगदी खरी गोष्ट ऐकायचीच का? बरं ऐका तर.

हा बंगला आमच्या वडिलांचा! आम्ही एकूण आठ भाऊ आणि आठ बहिणी! त्या काळी, वराहगिरी वेंकटगिरी हा कुटुंब वत्सल गृहस्थांचा आदर्श! तर या आठ भाऊ आणि आठ बहिणींपैकी मी एक ब्रह्मचारी सोडल्यास बाकी सर्वांना तीन तीन, चार चार मुलं आणि त्यांना आणखी दोन दोन, तीन तीन मुलं म्हणजे आमची नातवंडं असा आमचा सुमारे शंभर वारसांचा कुटुंब कबिला!

आमचा सर्वांचा हा बंगला फार आवडता! मी जंगल खात्यातून जंगल अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर एकटाच असल्यामुळे इथे रहायला आलो. बाकी सगळे आपापल्या काम धंद्यामुळे दूर दूर पसरलेले. तर कोणी बिल्डर आला तर आम्ही त्याला सांगतो, बाबा रे आमचा हा बंगला, ही जागा अगदी फुकट घे. पण अट एकच. आमच्या या शंभर वारसांना एक एक छोटा अगदी फार नाही पण कमीत कमी एक बेडरूमचा फ्लॅट दे! या शंभर कौरवांच्या कचाट्यात पडण्यापेक्षा संन्यास घेणे बरे असे वाटून तो जो गायब होतो तो पुन्हा आपलं तोंड दाखवतच नाही! चुकूनमाकून आलाच समोर तर भूत बघितल्यासारखं घाबरून तोंड फिरवतो!

आता एक बरे झाले आहे. महानगरपालिकेने आमचा बंगला जुन्या वास्तुकलेचा नमुना म्हणून जतन करायच्या इमारतीच्या यादीत टाकावयाचे ठरविले आहे. पुढच्या वर्षी बंगल्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. मग एकदा का तो यादीत गेला की त्याच्याकडे वाकडा डोळा करून कुणी पाहणार नाही!

दरवर्षी दिवाळीला आम्ही सर्व कुटुंबीय भाऊ, बहिणी, मुलं, नातवंडं. चार दिवस या बंगल्यात जमतो.

शेकडो पणत्या झाडांवर रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांच्या माळा, जागोजागी आमच्या नातवंडांनी केलेले आकाशकंदील, त-हेत-हेच्या सुंदर रांगोळ्या यांनी हा सारा बंगला आणि परिसर नंदनवनासारखा सजवतो. आसपासच्या सर्व परिसरात इतका चांगला देखावा नसतो. खूप लोक ही गंमत पाहायला येतात.

या चार दिवसात आम्ही खूप धमाल करतो. एक दिवस सगळ्यांनी गच्चीवर जमून धमाल करायचा असते. तेव्हा गप्पा, गाणी, खेळ, नकला अशा खूप गमतीजमती असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी करावेच लागते. अगदी माझ्यासारख्या सत्तरीच्या म्हाताऱ्यांचीही त्यातून सुटका नसते. माझा आयटेम सर्वात शेवटी असतो. सगळ्यांचे झाल्यावर सगळे माझ्याभोवती गिल्ला करून म्हणतात, अप्पा! वासंतीची नवीन गोष्ट सांगा ना पण ती कावळ्याची नाही हां, यावर्षी अगदी नवी हवी! मी जरा आढेवेढे घेतो. मग सगळे कोरसमध्ये ओरडायला लागतात, वासंतीची गोष्ट! वासंतीची गोष्ट!! वासंतीची गोष्ट!!!

मग मी म्हणतो, अरे…. हो…. हो…. सांगतो, सांगतो जरा आवाज तरी कमी करा! आणि काय रे पोरांनो! वासंती, वासंती काय? ती तुमची आजी ना? एकेरी नावाने हाक मारता तिला? आणि मोठ्ठा हशा पिकतो!

मी गोष्ट सुरू करतो, हं ऐका रे- ती समोर भिंतीवर मांजर…..

अरे, पण तुम्ही कान का टवकारलेत? ही गोष्ट आज आमच्या खास घरगुती कार्यक्रमासाठी आहे. तुमच्यासाठी याच ठिकाणी, याच वेळी, याच अंकात पण पुढच्या वर्षीच्या दिवाळीत! तोपर्यंत घेऊ या एक वर्षाचा एक छोऽऽऽ टा सा ब्रेक!!

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..