काय करावे परिधान
कसे असावे साधन
कशास करावे विधान
कर्म साधण्यासाठी!!
अर्थ–
कर्म- धर्म-मर्म यांना सुयोग्य दिशेस जर न्यायचे असेल तर काही गोष्टींना प्रधान्य दिले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला आपले कर्म आणि आपले शब्द यांनी जर हातात हात घातले नाहीत तर कर्म असले थोर जरी वाचा फुटत नाही, जेव्हा फुटते वाचा तेथे कर्म टिकत नाही,
यातून सांगायचे ते एवढेच की ज्याचे कामाचे साधन योग्य आहे ज्यात लबाडी नाही, दुसऱ्यास फसवून काही मिळवण्याची शक्यता नाही, ज्याच्या कामामुळे इतर लोकांचा प्रपंच चालण्यासाठी हातभार लागतो अशा दैवी कार्यकर्त्याला जर कुठे काय बोलावे, कसे बोलावे कळत नसेल तर ते कर्म देवासमोरच्या निर्माल्यात अर्पण करून पाण्यात सोडून द्यावे. कारण शब्द हे प्रमाण आहे माणसाच्या चांगले पणाचे.
प्रपंच चालवण्यासाठी माणसाने काय साधन वापरले पाहिजे यावरही समर्थ म्हणतात की ज्याचा मार्ग असेल सरळ, ज्याचा कोणास नहोईल भार, ज्याला कष्ट असतील फार, तोचि मार्ग निवडावा!
आम्हाला १०वित शाळेत स्मशानातील सोने नावाचा पाठ शिकायला होता. त्यातला व्यक्ती प्रपंच सुरू ठेवण्यासाठी जे कर्म करतो त्यातून त्याला द्रव्य मिळत जरी असले तरी समाधान मिळत असेल का? त्याच्या घरच्यांना त्याने कमावलेल्या पैशाने बनलेल्या अन्नाचा घास गोड लागत असेल का? असे अनेक प्रश्न मनात उभे रहातात. तसेच आपल्या रोजच्या व्यवसायात, नोकरीचे असे काही क्षण येतात का की जे कर्म साधण्यासाठी चुकीचे आहेत. जर तसे होत असेल तर मार्ग बदलावा असे समर्थ सांगतात. जेथे कष्ट आहेत तेथे समाधान नक्की असणार पण त्याला शब्दांचा पाठिंबा हवा. नाहीतर नुसते चांगले कपडे घालून, चांगल्या ऑफिसमध्ये बसून वाणी स्वच्छ होत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply