पहिली गोष्ट म्हणजे पोलीस म्हणजे भ्रष्टच असणार हे गृहीत धरणे. काही पोलीस वा अधिकारी तसे असतीलही. पण या विद्यार्थ्यांनी कधी सामान्य पोलीसांच्या चाळीत जाऊन ते कसे जगतात हे पाहिले आहे काय? ते कोणत्या परिस्थितीत काम करतात हे त्यांना माहित आहे काय? कायद्याचे विद्यार्थी असूनही ते या गोष्टी कशा गृहीत धरू शकतात?
दुर्दैवाने पोलीसांची प्रतिमाच चुकीची बनली आहे. मिडीयामध्ये बढती आणि बदलीच्या बातम्या चवीने रंगवल्या जातात. बाहेरही आपला संबंध येतो तो फक्त ट्रॅफिक पोलीसाशी. त्यावरून आपण आपले मत बनवून मोकळे होतो. पण आपण सिग्नल तोडल्यावर ट्रॅफिक पोलिसाने पावतीपुस्तक काढल्यावर मांडवलीची विनंती आपणच करणार आणि वर ‘पोलीस काय पैसे खातात हो’ म्हणून नावे ठेवणार. आणि एखादा पोलीस पावतीसाठी अडून बसला तर त्याला खडूसही ठरवणार. ज्या मुलांनी ती पाटी त्या मुलाच्या गळ्यात अडकवली ती मुले पुण्यातील होती. त्यातील काही जणांकडे तरी मोटरसायकल नक्की असेल आणि तेच लोक अशी मांडवली करण्यात देखील पुढे असतील. कारण तरूण मोटरसाकलस्वारांना सिग्नल पाळणे बहुधा मागासलेपणाचे लक्षण वाटते. (पुण्यातल्या दुचाकिस्वार मुली तर खूपच हुशार. रस्ता त्यांच्या आजोबांचा असल्याच्या थाटात त्या दुचाकी चालवतात.रस्त्याच्या डाव्या कडेला उभे राहून उजवे वळण घेण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही! )
दुसरी गोष्ट म्हणजे जे ‘शौर्य’ त्या विद्यार्थ्यांनी पोलिसाच्या मुलाच्या बाबतीत दाखवले ते त्यांनी एखाद्या राजकारण्याच्या मुलाच्या बाबतीत दाखवले असते का? आणि आज कुठले क्षेत्र भ्रष्टाचारापासून मुक्त आहे? ते विद्यार्थी ज्या न्यायक्षेत्रात जाणार आहेत ते तरी कुठे सोवळे आहे? तिथेही थोडीफार लागण झालेली आहेच की. ज्या क्षेत्रात ते सध्या आहेत ते शिक्षणक्षेत्र तरी चांगले राहिले आहे काय? आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची गंगोत्री असणार्या राजकारणाच्या क्षेत्राबद्दल त्यांचे काय मत आहे? इथे भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचा हेतू नाही पण कायद्याचे विद्यार्थी असून असा एकांगी विचार जर ते करीत असतील तर जिच्याकडे आपण अजूनही शेवटची आशा म्हणून बघतो त्या आपल्या न्यायव्यवस्थेचे भवितव्य काय ?
आज भ्रष्टाचाराच्या जागतिक क्रमवारीत आपला क्रमांक तळाच्या काही देशात लागतो. हे जे ‘यश’ (?) आपण मिळवलेले आहे ते केवळ काही पोलीसांच्या पैसे खाण्यामुळेच फक्त नाही. आपण सर्वच क्षेत्रात जे ‘कर्तृत्व’ गाजवलेले आहे त्याचा हा परीणाम आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी हे रॅगिंग केले त्यांना खरंच जर भ्रष्टाचाराबद्दल तिटकारा असेल तर सर्वप्रथम त्यांनी आपण केलेल्या कृत्याबद्दल जी शिक्षा होईल ती निमूटपणे भोगावी. आपल्या पालकांना त्यांचे वजन वापरायचा आग्रह करू नये. दुसरे म्हणजे पुढील आयुष्यात त्यातील काही जणांनी राजकारणात येऊन त्याच्या शुध्दीकरणासाठी प्रयत्न करावेत. (वाचा माझा लेख – लढा किंवा झोप काढा ) त्यातील काही जणांनी माहितीचा अधिकार, जनहित याचिका यासारख्या गोष्टींचा उपयोग करून भ्रष्टाचाराविरूध्द आवाज उठवावा. कमीतकमी थोडेफार तरी सामाजिक भान जपावे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकतर सिग्नल तोडू नये किंवा तोडल्यास पूर्ण दंड भरावा. त्याने भ्रष्टाचार कमी करण्यास थोडाफार हातभार लागू शकेल.
— कालिदास वांजपे
Leave a Reply