मी रमणबागेत अकरावीला असताना आमची सहल गोवा, गोकर्ण महाबळेश्वरला गेली होती. तेव्हा पहिल्यांदा गणपती पुळेला गेलो. तिथल्या मुक्कामी आम्हा सर्वांना केळीच्या पानावर जेवण मिळाले. गोकर्ण महाबळेश्वरला देखील केळीच्या पानावरचं जेवण केले. फारच अनुभव फारच छान होता. त्यानंतर केळीच्या पानावर जेवण्याचा प्रसंग काही आला नाही.
मध्यंतरी एक लेख वाचनात आला. त्यामध्ये लिहिलं होतं की, केळीच्या बुंध्यातील, केळफुलातील, पानातील जो चिकट द्रवपदार्थ असतो तो खाल्ल्यावर कॅन्सर वाढविणारी ग्रंथी हळूहळू निष्क्रीय होत जाते. त्यासाठीच जुन्या पिढीतील माणसं केळीच्या पानावर जेवायची. त्या पानावर गरम भात वाढला की, जेवताना तो चिकट द्रव अन्नातून पोटात जायचा.
चालू पिढीमध्ये केळीची पानं, पत्रावळी जाऊन थर्मोकोलच्या, प्लॅस्टिकच्या डिशेस आल्या. त्यातून खाणे हे शरीराला घातक तर आहेच शिवाय त्यांचा होणारा कचरा निसर्गालाही धोकादायक आहे.
आजकाल शहराबरोबरच खेड्यातही सार्वजनिक जेवणाच्या पंगतीमध्ये प्लॅस्टिकचे कोटींग असलेल्या पत्रावळी व द्रोण वापरतात, ज्याच्यामुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ शकतो. पण त्याचा कोणीही विचार करीत नाही.
‘जुनं ते सोनं’ असूनही या स्वस्तात मिळणाऱ्या केळीच्या पानांवर अलीकडे कोणी जेवत नाही. खरं पाहता त्याचे फायदे कुणाला माहितही नाहीत. केळीच्या पानावर खोबरेल तेल लावून ते गुंडाळल्यास आपल्या अंगावरील डाग, पुरळ, फोड अशा समस्या दूर होतात. शिवाय आपली त्वचा दिर्घकाळ तरुण राहते.
दक्षिण भारतात केळीच्या पानाचा स्वयंपाकात सर्रास वापर केला जातो. कोणतेही अन्न शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचे पान ठेवले जाते. त्यामुळे पदार्थ करपत नाही व पानांचा गंध त्या पदार्थाची चव वाढवतो. या पानांचा जेवणासाठी उपयोग फक्त भारतातच न होता इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्यम अमेरिकेतही होतो.
पूर्वीची माणसं दिर्घायुषी असण्याचे कारण देखील त्यांनी जेवणासाठी केलेला केळीच्या पानाचा वापर हेच होतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताट वाटी वापरुन ती घासणे-धुण्याचे श्रम वाचतात, पाण्याची बचत होते. जेवण झाल्यानंतर हीच पानं गाई, म्हशी खात असत. निसर्गाचा तोल राखला जात असे.
आता देखील आपण जेवणासाठी केळीच्या पानाचा वापर करु शकतो. रोज नाही जमलं तर सुट्टीच्या दिवशी तर नक्कीच करु शकतो. ही पानं दहा रुपयाला चार इतकी स्वस्त मिळतात. अशा खरेदीमुळे त्या शेतकऱ्यांनाही रोजगार मिळेल. आपले आरोग्यही सांभाळले जाईल…बघा, पटतंय का?
– सुरेश नावडकर २-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply