
घरच्या बागेत फेरी मारायचं काम माझं अगदी आवडीचं..निसर्गरम्य स्थळी जाण्याचा योग सारखा येत नाही मात्र आमची बाग याची उणीव भासु देत नाही कधीच. विविध फूल आणि फळ झाडांच्या सान्निध्यात वेळ अगदी छान जातो.
बाग आपल्या करता रोज सरप्रायझेस घेऊन येते..सकाळी डोकवावं तर फुलांनी पूर्ण बहरलेली असते. जास्वंद, तगर, सोन चाफा, सोनटक्का , लिली , गुलाब, कणेर, गोकर्ण…जणू काही रोज भेट द्यायला सज्ज असते. फळ झाडांमध्ये सद्ध्या केळ्याचा मौसम असल्यामुळे अलीकडेच नव्यानेच झाडाला एक केळ फूल फुटलं..
शब्दच किती अनोखा ..केळ फूल …लागतं फळ झाडाला, पण दिसतं फुलासारखं..जस जसं वाढत जातं, तसे त्याचे एक एक पदर उलगडायला सुरुवात होते आणि त्यातून अगदी तान्ह्या आकाराची केळी बाहेर दिसू लागतात.. हळू हळू केळफुलाचे पदर गळून खाली पडायल लागतात. आणि केळी आकार घेऊ लागतात.
निसर्ग मुळातच आपल्या माणसांसारखे कुणाचे पाय ओढत नाही. केळफुलाने जर फूल होऊन राहण्याचा हट्ट धरला तर त्याला केळी कधी लागणारच नाहीत की! ..त्यामुळे एक एक पदर खाली टाकत केळ्यांना वाढण्यासाठी प्रोत्साहन देत हे फूल आकुंचन पावतं. त्या केळफूलाला हे पक्क माहिती असतं की आपलं काम केळ्याला ऊर्जा देणं, ती सुद्धा मर्यादा राखून. बाजूला व्हायची वेळ आली कि तितकंच gracefully बाजुला झालं पाहिजे हे सुद्धा त्या केळ फुलाला समजतं.
माणसाला मात्र काहीही केल्या हे जमत नाही. जिथे तिथे त्याचं असणं आड येतं ..आपल्या असण्याचं प्रयोजन हे, सतत आपलं असणं इतरांच्या माथी मारायचं, का इतरांनाही काही अस्तित्व आहे याची जाणीव ठेवून वागायचं? हा विचार कुठल्या एका वयापुरता मर्यादित नाही..प्रत्येक माणसाने हा विचार करायची गरज आहे.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कसं , कधी घट्ट रोवून उभं राहावं आणि कधी gracefully बाजूला व्हावं हे निसर्गाकडूनच घेण्यासारखं आहे. आपण सदैव कुठे असण्याची आणि कुठे नसण्याची गरज आहे याचं चिंतन होत राहिलं तरंच एक सशक्त पीढी व समाज व्यवस्था आपोआप निर्माण होईल.
मूळ विचार, संस्कार प्रक्षेपित करत नवीन विचारांचं पांघरुण अलगद सरकवणं हेच निसर्ग करत आलेला आहे. हेच या केळफुलाकडूनही शिकता येतं .
केळी वाढावी याकरता ते खरंतर बाजूला होतं पण त्यातूनही सौंदर्य निर्मिती करतं . केळी पूर्ण वाढल्यावरही केळफुलाचं लहानसं का होईना अस्तित्व राहतं की! ..पण आधी उठून दिसणारं केळफूल आता मात्र ती सूत्र केळ्याकडे कडे सुपूर्द करतं . त्यामुळेच आपण राहिलेल्या केळफुलाची भाजी सुद्धा करू शकतो आणि तितक्याच आनंदाने केळी सुद्धा खाऊ शकतो.
एका केळफूलाकडून एवढा सुंदर धडा मिळाला, तो त्याच्याशी मैत्री करता आली म्हणून बरं का! आज ज्येष्ठ साहित्यिक व. पु काळे यांचं वाक्य वाचलं. ‘संवादाचंच दुसरं नाव म्हणजे मैत्री’. निसर्ग सतत आपल्याशी संवाद साधत असतो. रोज मैत्री च्या नावाखाली फक्त फॉर्वर्डस पाठवणाऱ्या व कधीही संवाद न साधू इच्छिणाऱ्या मित्रांपेक्षा रोज संवाद साधणाऱ्या निसर्गाशी दोस्ती करायचा प्रयत्न करूया. काँटॅक्ट मध्ये राहणं म्हणजे संवाद साधायची इच्छा असणं. जे निसर्ग रोज करतो. त्याच्याकडे डोळसपणे पाहता आलं आणि त्याच्याशी मैत्री करता आली की हा संवाद आपोआप घडू शकेल व या संवादातूनच खूप काही शिकता येईल…नाही का?
– गौरी
Leave a Reply