पोलीस खात्यातील मी एक आहे.
पोलीसशिपाई ते पोलीस महासंचालक. कोणीही !
माझे काम कायदा राबवणे आहे. कायद्या समोर सर्व सामान आहेत हे बाळकडू मला मिळाले आहे. “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” हे माझे ब्रिदवाक्य आहे. माझा रुबाब वाढवणारी व डोळ्यात भरणारी ‘खाकी वर्दी’ हे माझे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे जनतेचे सदैव माझ्याकडे लक्ष असते याची मला जाणीव आहे. ब्रिटीश काळापासून पोलिसांपासून दूरच राहण्याची समाजाची मानसिकता असल्याने गमतीखातर कोणी पोलिसांकडे येत नाही हे देखील मला माहित आहे. अगदी स्वराज्यात देखील! अपरिहार्य परिस्थितीत व शेवटचा उपाय म्हणूनच जनता पोलिसाकडे येत असते हा पोलीस – जनता संबंधातील ‘गाभा’ आहे.
माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची विनाविलंब दखल घेउन कायदेशीर मार्गाने त्याचे निवारण करणे व तक्रारीचे स्वरूप पोलिसांच्या अधिकारक्षेत्रा बाहेरील असल्यास तसे तक्रारदारास लेखीस्वरुपात कळविणे हे माझे कर्तव्य आहे.
मला कायद्याने ‘अधिकारी’ हा दर्जा दिलेला आहे. माझ्या शिरपेचावर तीन सिंहांचे, माझ्या देशाचे, मानचिन्ह आहे. जनतेला मदत करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कायद्याने मला व्यापक अधिकार दिलेले आहेत व हे मी विसरून चालणार नाही.
शिस्त ही पोलीस खात्याची जान व शान आहे. पोलिसांचे शिस्तबध्द संचलन हे नेहमीच नेत्रदिपक असते. पोलीस म्हणून मी कायम शारीरिकदृष्ट्या सक्षम व मानसिकदृष्ट्याही अतिशय खंबीर असलो पाहिजे. माझ्या वरिष्ठांचा वैध आदेश हा माझ्यासाठी अखेरचा शब्द आहे.
पोलिसांची कर्तव्ये व अधिकार हे ‘कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर’ मध्ये नेमून दिलेले आहेत. पोलीस संहितेत बद्ध केलेले आहे. माझे कर्तव्य पालन करताना मी जे-जे काही करतो त्याची पोलीस दैनंदिनी तसेंच माझ्या वैयक्तिक दैनंदिनीत नोंद करणे माझेवर बंधन करक आहे. त्या नोंदींना कायदेशीर महत्व असून न्यायालयामध्ये तो एक महत्वाचा पुरावा मानल्या जातो. ती माझ्या बचावाची ‘ढाल’ आहे.
देशात आराजक माजू नये म्हणून कायदा व सुरक्षा राखणे हे माझे प्रमुख कर्तव्य आहे. मोठी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी प्रसंगी मला योग्य बळ वापरण्याची मुभा आहे व त्यासाठी मला शस्त्र बाळगण्याचे व चालवण्याचे कायद्याने अधिकार दिलेले आहेत. अतिशय व्यापक अधिकार मला प्राप्त झाले असल्याने माझ्या समोर प्रलोभनेही मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या अधिकाराचा ‘खल रक्षणाय’ असा उलटा वापर होणार नाही याची मी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
राजकारणी वा शासनकर्ते त्यांचे फायद्यासाठी माझा उपयोग करून घेतात असे म्हणणे ही एक पळवाट आहे. कोणाकडे बोट दाखवून मी माझ्या जबाबदारीतून सुटका करून घेऊ शकत नाही. माझ्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही. मी माझ्या मतलबासाठी, राजकीय वरदहस्त प्राप्त करण्याच्या उद्देशाने, माझा हवा तसा उपयोग तर करू देत नाहीना याचे आत्मपरीक्षण व्हावयास हवे. ज्याला हवा तसा माझा उपयोग मी करू देऊ लागलो तर ते कोणास नको आहे? राजकारणी स्वत:च्या हातात सत्ता ठेवण्यासाठी माझा उपयोग करून घेणे क्रम प्राप्त आहे. मी त्यांच्या हातातील बाहुले असणे ही त्यांचेसाठी फार मोठी उपलब्द्धी असते. त्यावरून त्यांचेदृष्टीने असणारे माझे महत्वच अधोरेखित होते.
कोणाच्या हातातील मी बाहुले व्हावे की नाही हे पूर्णपणे माझेवर अवलंबून आहे. मला जी कायद्याने चौकट आखून दिलेली आहे त्याच्या बाहेर मी जाणार नाही याची खबरदारी मीच घ्यावयाची आहे. मी हे पक्के ध्यानात ठेवावयास हवे की जर मी कायद्याची चौकट कोणत्याही कारणाने मोडली तर माझ्या पदरी लाचारी, मानहानी, ससेहोलपट व प्रसंगी माझ्या समोर मला व माझ्या कुटुंबास होरपळून काढणारा जनतेच्या रोषाचा व कायद्याच्या आगीचा फुफाटा आहे. दिसणाऱ्या प्रलोभनांना बळी पडून क्षणिक फायद्यासाठी आयुष्यभर लाचारी पत्करून मानहानीकारक जीवन कंठायचे की आलेल्या संकटांचा धीराने मुकाबला करून मानाने जगावयाचे? निर्णय सर्वस्वी मलाच घ्यावयाचा आहे.
माझा निर्णय ठाम आहे. मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणार नाही. कोणालाही त्यांच्या स्वार्थासाठी माझा उपयोग करू देणार नाही. कोणाच्या हातातले खेळणे होणार नाही. कोणाकडूनही व कितीही दबाव आला तरी मी त्यास बळी बडणार नाही. माझ्या मतलबासाठी मी कोणालाही लाच देणार नाही वा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाकडूनही लाच घेणार नाही. ही केवळ नोकरी नसून मी घेतलेला ‘वसा’ आहे. उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही. मला हे माहित आहे की माझ्या या निग्रहाचा बऱ्याच लोकांना त्रास होणार आहे. त्यांच्या मार्गातील मी एक अडसर ठरणार आहे. हर तऱ्हेने मला मुद्दाम त्रास दिल्या जाईल. माझ्या विरुध्द कुभांड रचून वरचेवर माझ्या बदल्या करण्यात येतील. पण आता हे पक्के आहे की माझ्या जागी ज्याची नियुक्ती होईल त्याची भूमिका देखील माझ्या पेक्षा वेगळी असणार नाही. मला कोठेही नोकरीच करावयाची आहे. माझ्या नोकरीचा मला पगार मिळणार आहे. सनदी अधिकारी असल्यास चांगला पगार, प्रशस्त सरकारी निवास-स्थान, अर्द्ली व सरकारी गाडी मिळणार आहे. त्यामुळे मी कोठेही नोकरी केली तरी मला काहीच फरक पडणार नाही. राज्यात सरकार पाठवेल तेथे बदलीवर जाणे हा तर माझ्या सेवा-शर्तींचा एक भागच आहे. बदल्या करून करून बदल्या करणारे थकतील पण माझ्यावर काहीच प्रभाव पाडू शकणार नाहीत. बदलीचा बागुलबुवा दाखवून मला कोणी बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडू शकणार नाहीत. माझ्यावर लाचारीचे जीवन कोणी लादू शकणार नाही. माझ्याशी अदबीने वागतील. आदराने वागवतील.हा केवळ आशावादच न राहता एक वास्तव होईल.पोलीस हे एक सन्माननीय बिरूद होईल.
स्वाभिमानाने, सन्मानाने व ताठ मानेने जगण्याचा, कायद्याचा व त्या योगे पोलिसांचा दरारा कायम राखण्याचा माझ्यापाशी हाच एक गौरवशाली पर्याय आहे व त्याचीच मी निवड केली आहे.केल्यानेच होत आहे रे, आत्ताच केले पाहिजे.
— अविनाश यशवंत गद्रे
Leave a Reply