तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे गुरु, वाई येथील प्राज्ञपाठशाळचे संस्थापक केवलानंद सरस्वती उदयशंकर यांचा जन्म ८ डिसेंबर १८७७ रायगड जिल्ह्यातील सुडकोली गावी झाला.
त्यांचे मूळ नाव नारायण सदाशिव मराठे असे होते. केवलानंद सरस्वती उदयशंकर हे महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित होते. ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्मयय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत. शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले. नव्य-न्यायाचे व शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन, १८९५ मध्ये वाई येथे आल्यावर झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी झाले. वाई येथे स्वतःची पाठशाळा १९०१ पासून सुरू केली. त्याच पाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा’ असे नामकरण १९१६ साली केले.
दिनकरशास्त्री कानडे, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इ. त्यांचे नामवंत शिष्य होते. १९२० साली प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. त्यातून अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले. यशवंतराव चव्हाण यांचाही त्यांचेशी संपर्क होता. कृष्णा घाटावर त्यांचे वास्तव्य होते. १९२५ साली धर्मकोशाच्या कार्यास प्रारंभ केला. संस्कृतमध्ये मीमांसाकोश (७ खंड, १९५२ – ६६) संपादन केला.
हिंदुधर्मसुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता १९३४ साली म. म. डॉ. पां. वा. काणे, रघुनाथ शास्त्री कोकजे, केशव लक्ष्मण दप्तरी, ना. गो. चापेकर, ज.र. घारपुरे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक इ. विद्वानांच्या साहाय्याने, धर्मनिर्णयमंडळ स्थापिले. ब्रह्मचर्यातूनच १९३१ साली त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर बद्रीनाथची पायी यात्रा केली.
करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे ते निधन पावले. त्यांचे तेथे स्मारकमंदिर उभारले असून तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५ पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली.
केवलानंद सरस्वती उदयशंकर यांचे १ मार्च १९५५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply