शनिवारचा दिवस होता, मी नेहमी प्रमाणे आॅफिसला जायला तयार झालो होतो. आज सुनील, माझा चक्रधर रजेवर असल्याने रिक्षानेच आॅफिसवर जायचं मी ठरवलं होतं..
निघतानाच एक फोन आल्यामुळे मी पत्नीला हातानेच ‘निघतो’ असे खुणावून बाहेर पडलो. समोर आलेल्या रिक्षात बसलो व आॅफिसच्या इमारतीखाली उतरलो. खिशात हात घातला तर, आॅफिसची किल्ली काही हाताला लागेना.. ती सकाळी फोनच्या गडबडीत मी घ्यायलाच विसरलेलो होतो..
आज शनिवार असल्यामुळे तसंही खास महत्त्वाचं असं काम नव्हतंच. माझी सेक्रेटरी पायल, ती देखील आज रजेवर होती…
गेल्या बरेच वर्षांत मी स्वतःसाठी असा कधी वेळ काढलाच नव्हता. सतत कामामध्येच गुंतून राहिलो होतो. वीस वर्षांत दिवसरात्र एक करुन व्यवसायात यशस्वी झालो होतो. या कालावधीत मला फक्त घरातच नव्हे तर बाहेरही कधी कुणाशी, निवांत बोलता आलं नव्हतं. मी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..
घड्याळात पाहिलं तर सकाळचे दहाच वाजलेले होते, मी पहिल्यांदा माझ्या मित्राच्या रेडिमेड ड्रेसच्या दुकानात गेलो. बऱ्याच वर्षांनी सचिन समोर मी उभा राहिल्यावर, तो तीनताड उडालाच.. आम्ही काॅलेजला एकाच बाकावर बसायचो. त्याने काॅफी मागवली. मी त्याला लेटेस्ट फॅशनचे शर्ट व पॅन्ट दाखवायला सांगितले. त्याने समोर मांडलेल्या व्हरायटी मधून मी एक मस्त डिझाईनचा शर्ट व एक जीनची पॅन्ट निवडली. ट्रायल रुममधून मी बाहेर पडल्यावर खुद्द सचिननेही मला ओळखले नाही.. मी माझा सूट त्याच्याकडेच ठेवून, बिल पेड करुन बाहेर पडलो..
तिथून मी माझ्या नेहमीच्या हेअर ड्रेसरकडे गेलो. त्यानं देखील मला ओळखलं नाही.. मी त्याला माझी हेअरस्टाईल जरा बदलायला सांगितली.. त्याने इमानेइतबारे अलीकडच्या फॅशननुसार उलटा भांग करुन, कडेने साईडकट केला. आरशात पाहिलं, तर मी वीस वर्षांनी तरुण दिसत होतो.. त्याचं मानधन देऊन मी बाहेर पडलो..
सकाळी खाल्लेली चहा टोस्टची जागा, आत्ता साडे अकरा वाजता पूर्ण रिकामी झालेली होती. पलीकडच्या चौकातच माझी शाळा होती. शाळेच्या गेटवरचा वडापाववाला मला आठवला.. मी तिथं पोहोचलो तर सकाळचे वर्ग सुटलेले होते. वडापावच्या गाडीभोवती मुलांची, ही गर्दी होती. मला माझे शाळेचे दिवस आठवले.. वडापाववाले काका आता बरेच वयस्कर झाले होते. ते वडे तळत होते व माई पैसे घेऊन मुलांना वडापाव कागदात गुंडाळून देत होत्या. थोड्या वेळातच गर्दी ओसरली. माईंना मी दोन वडापाव मागितले. त्यांनी ते दिले, मी तीच पूर्वीची चव पुन्हा अनुभवत होतो. मिरचीमुळे तोंडात हवीहवीशी आग उठत होती. कोरडा पाव खाल्ला की, ती विझत होती. इतक्यात शाळेची घंटा वाजली.. दुपारची शाळा भरली व राष्ट्रगीत सुरु झालं.. मी वडापाव खाणं थांबवून सवयीप्रमाणे ताठ उभा राहिलो.. ते संपल्यावर ‘विश्राम’ करुन वडापाव संपवला. मी पाकीट काढून पैसे देऊ लागलो तर माईंनी ते घेतले नाहीत. त्यांनी मला पंचवीस वर्षांनंतरही ओळखलेलं होतं.. मी काकांना पैसे घेण्याची विनवणी केली, तर त्यांनीही नकार दिला. मी पाहिलं माईंची साडी फारच जीर्ण झाली होती. मी रोडच्या पलिकडे असलेल्या एका साडीच्या दुकानात गेलो व एक छानशी साडी माईंसाठी खरेदी केली.
पुन्हा माईंच्या समोर येऊन उभा राहिलो व म्हणालो, ‘माई, तुमच्या मुलाच्या या ‘भेटी’ला प्लीज नाही म्हणू नका.’ माईंनी ती पिशवी हातात घेतली व मायेने माझ्या गालावरुन हात फिरवून स्वतःच्या कानाजवळ बोटांचा कडाकड आवाज काढला. त्यांचे डोळे भरुन आले होते.. काकांना ही काय बोलावे हे सुचत नव्हतं.. मी देखील काकांच्या पाठीवर थोपटण्याचे निमित्त करुन अश्रू लपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होतो…
मी रस्त्यावरुन जाताना वाटेत झाडाखाली, एक स्पीकर ठेवून गाणी गाणारा युवक दिसला. तो ट्रॅकवर मुकेशचं ‘चल री सजनी अब क्या सोचे..’ गाणं होता. येणारे जाणारे त्याला ऐकत होते, पहात होते.. मात्र त्यानं ठेवलेल्या रुमालावर पैसे क्वचितच पडत होते. मी त्याचं गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर, पायल दिसू लागली.. गाणं तर माझं आवडतं होतच, मी त्या युवकाजवळ गेलो व त्याला विचारले, ‘तुझा आवाज इतका चांगला आहे, तर एखाद्या आॅर्केस्ट्रामध्ये का गात नाहीस?’ तो म्हणाला, ‘कौतुक सगळेच करतात, संधी कोणीही देत नाही.’ मी त्याला माझ्या आॅर्केस्ट्रावाल्या मित्राचा नंबर दिला व त्याच्या खिशात दोनशेची एक नोट घातली..
त्या गाण्यामुळे मला पायलची आठवण अशासाठी झाली की, तिचं लग्न हुंड्यासाठी अडलं होतं. तिच्या भावी सासूला एक लाख हवे होते, तरच ती पायलला सून म्हणून स्वीकारण्यास तयार होती..
पायलने एकदा सांगितलेला पत्ता आठवून, मी त्या बिल्डिंगपाशी पोहोचलो. दारावरची बेल वाजवली, तेव्हा एका पन्नाशी उलटलेल्या स्त्रीने दरवाजा उघडला. मी तिला पायलचा काका असल्याचे सांगितले. तिने मला बसायला खुर्ची दिली. ती पायलबद्दल भरभरून बोलत होती, पण मधेच पैशाची अपेक्षाही सांगत होती. चहा देताना तिने मला विचारले, ‘पायलने तुमचा कधीही उल्लेख कसा केला नाही?’ मी लगेचच ठोकून दिले, ‘मी लहानपणीच घरातून पळून गेलो होतो. आत्ता मी तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही पायलला सून करुन घ्याल?’ सासू खुष झाली. मी तिच्या मोबाईलवर रक्कम ट्रान्सफर केली आणि बजावले, ‘मी पैसे दिले हे पायलला सांगायचं नाही आणि याच महिन्यात बार उडवून द्यायचा.’ मी तिचा निरोप घेऊन बाहेर पडताना आंतरपाटामागे नववधूच्या वेषात सजलेली, पायल माझ्या डोळ्यासमोर तरळत होती…
दुपारचे तीन वाजले होते. माझे शाळेतले सर जवळच रहात होते. ते निवृत्त झाल्यानंतर बरीच वर्षे आमची भेट झालेली नव्हती.. मी त्या जुन्या वाड्यातील दि. मा. जोशी अशी पाटी असलेल्या दारावर टकटक केले. काकूंनी दार उघडले. ‘ये सतीश, बऱ्याच दिवसांनी सरांची आठवण आली काय रे तुला?’ काकूंनी मला इतक्या दिवसांनीही बरोब्बर ओळखलं होतं. सर खाटेवर झोपून होते. काकू सांगत होत्या, ‘गेले वर्षभर आजारी आहेत, डाॅक्टर म्हणतात आॅपरेशन करावं लागेल. यांच्या पेन्शन मध्ये कसंतरी भागतंय, आॅपरेशनला पैसे कुठून आणायचे?’ मला सरांचे शाळेतील दिवस आठवले. माझं गणित कच्चं होतं म्हणून त्यांनी मला घरी बोलावून ते माझ्याकडून पक्कं करुन घेतलं. वार्षिक परीक्षेत मी पास झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त झाला होता.. माझ्या डाॅक्टर मित्राला मी फोन केला व सरांच्या आजारांवर माझ्या खर्चाने उपचार करायला सांगितलं. काकूंना मी त्या डाॅक्टर मित्राचा पत्ता व फोन नंबर लिहून दिला. एव्हाना सर जागे झाले होते. काकूंनी केलेला चहा घेतला व दोघांच्याही पायाला स्पर्श करुन मी निघालो.
आता चार वाजले होते. वाटेतच एक नगरपालिकेची बाग होती. बागेच्या गेटपाशी भेळीच्या गाड्या ओळीने उभ्या होत्या. बरीच वर्षे मी ओली भेळ खाल्लेली नव्हती. त्या भेळवाल्याला एका चटपटीत भेळीची आॅर्डर दिली. त्याने भांड्याचा बराच वेळ आवाज करत एक द्रोण भरुन हातात दिला. मी पहिलाच घास घेतला आणि भूतकाळात गेलो. स्मिताला, माझ्या पत्नीला ओली भेळ म्हणजे जीव की प्राण! लग्नापूर्वींच्या आमच्या अनेक भेटी या भेळ खाण्यानेच साजऱ्या होत असत.. भेळीचे पैसे मी ‘गुगल पे’ केले व बागेत प्रवेश केला. काही बाकांवर ज्येष्ठ नागरिक बसलेले होते. गवतावर तरुण जोडपी बसलेली होती. लहान मुलं फुगे उडवत होती. मला एकाच नजरेत आयुष्यातील सगळे टप्पे पहायला मिळत होते.. अगदी बाबा गाडीतील बाळापासून ते नव्वदीच्या आजोबांपर्यंत!! मी तर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होतो..
तेवढ्यात एक गजरेवाला समोर येऊन उभा राहिला.. त्याला मी नजरेनेच विचारले, केवढ्याला? त्याने दहा रुपयाला एक, असे सांगितले. त्याच्याकडे चाळीसेक गजरे होते. मी त्याची चौकशी केली. तो शाळा सुटल्यानंतर गजरे विकून घरखर्चाला हातभार लावत होता.. मला माझं लहानपण आठवलं.. मी त्याचे सर्व गजरे एका पुड्यात बांधून घेतले व त्याला पाचशेची नोट दिली.. मला मोगऱ्याचा सुगंध मिळाला होता व त्याच्या खिशातील नोटेने त्याची स्वप्नं सुगंधीत झाली होती..
अंधार पडू लागला होता.. मी रिक्षा केली व घरी पोहोचलो. बेल वाजवल्यावर स्मिताने दरवाजा उघडला व माझ्या अवताराकडे पहातच राहिली.. मी खुर्चीवर बसताना तिच्या हातात गजऱ्यांचं पुडकं दिलं.. त्या मोहक वासाने ती आश्र्चर्यचकीत झाली. मी तिला त्या मुलाबद्दल सांगितले.. तिला देखील माझी कृती पटली. उद्याच्या रविवारीच तिच्या मैत्रिणी एकत्र जमणार होत्या, त्यांना हे गजरे देता येणार होते..
तिने मला विचारले, ‘सकाळी आॅफिसची किल्ली कशी काय विसरलात?’ मी तोंडाशी आलेले उत्तर गिळून टाकले.. त्या किल्ली विसरण्यामुळे माझा आजचा दिवस अविस्मरणीय झाला होता.. मी खऱ्या अर्थाने आज मुक्तपणे जगलो होतो.. माझ्या मनाला वाटेल ते मी बिनधास्तपणे केलं होतं… मला भेटलेल्या माणसांमुळे मी माणसांत आलो होतो..
आयुष्यात कधीतरी अशीच आपण आपली ‘किल्ली’ विसरावी व मनातील माणुसकीची, आपुलकीची कवाडं सताड ‘खुली’ करावीत..
मी तर जमवलं… पहा बरं, तुम्हाला जमतंय का?…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२३-१०-२१.
Leave a Reply